🌸🌷🌺श्री गीता जयंती🌺🌷🌸
एखाद्या धर्मग्रंथाची जयंती साजरी व्हावी हे नवलच म्हणावे लागेल पण गीता ही स्वतः परमेश्वराच्या मुखातून ,जशी गंगा शंकराच्या जटेतूून पृथ्वीवर अवतरली तशीच प्रगटली. त्या गीतेच्या मधूर प्रवाहात अख्खी मानवजात कृतार्थ झाली. गंगा ही शरीर पवित्र करेल पण गीता मनही शुद्ध करेल ती मोक्ष देणारी भगवती व हरीप्रिया आहे. मनुष्यातील मनुष्यत्व जागवून त्याला देवत्वाकडे नेणारी ती परमपावनी माता आहे.मानवी मनावर सुसंस्कार करणारी ती गीता परमेश्वराची मानवाला मिळालेली देणगी आहे.
गीता आपल्याला काय सांगते? पहिलं सांगते ते कर्मयोग, कर्म करत रहा पण त्याचे फळ भगवंताच्या आधिन आहे त्यामुळे तू व्यर्थ आशा ठेवू नकोस. या शिकवणीतून नैराश्य आपल्यापासून दूर राहिल. कारण बरेच जण अपेक्षित यश नाही मिळाले की निराश होतात. भगवान सांगतात उठ आधि तूझे कर्तव्य कर, लढ मी सोबत आहेच. गीता आपल्याला ज्ञानही देते. ते ज्ञान ज्यातुन आपल्याला आपण देह नसुन आत्मा आहोत व आपण कधिही मरण पावत नाही. आत्मा नित्य आहे व अविनाशी आहे. गीता भगवंताच्या विराट स्वरूपाची ओळख करून देते तसेच चराचरात तो कसा सामावलेला आहे तेही सांगते. आणि सर्वात मोठं दान म्हणजे गीता आपल्याला भक्तीयोग शिकवते. भक्ती म्हणजे काय तर परमेश्वराची नित्य आठवण, नित्य स्मरण, प्रेमाने त्याला आपलेसे करणे म्हणजेच खरी भक्ती.
गीता माता जीवनात उतरवली तर मनुष्याचा देव होण्यास फार वेळ लागणार नाही. ती आयुष्य बदलून टाकते हे अनेक थोर संतांच्या उदाहरणावरून लक्षात येईल.स्वामी विवेकानंद, पूज्य विनोबा भावे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, परम पुज्य आठवले दादा, गीता स्वतःचा श्वास मानणारे असे कितीतरी संत , महात्मे, योगीजन या भारतवर्षात झाले. इतकेच नाही तर विदेशातही गीता परिवार मोठा आहे. अनेक गीता अभ्यासक तसेच विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठे गीतेचा क्रमिक पुस्तकात समावेश करून विद्यार्थी घडवत आहेत.
गीता ज्याला कळली तो खरा धन्य असे अनेक महापुरुषांनी सांगून ठेवले आहे.
या गीताजयंतीचे औचित्य साधून मनात निश्चय करा की गीता रोजच्या वाचनात ठेवू व आचरणातही आणू.
🌺🌷🌸🙏🏻 जय गीता माता, जय श्री कृष्ण🙏🏻🌸🌷🌺
✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी
Comments
Post a Comment