गीता अध्याय ५


-सौ स्वरूपा कुलकर्णी


    या अध्यायाचे नाव कर्मसंन्यासयोग अर्थात सर्व कर्म भगवंताला अर्पण करणे किंवा कृष्णभावनेने कर्मरत असणे.इथे गीतेचे मुख्य सुत्रच सापडल्यासारखे मला  वाटते.अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो,हे भगवन्, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करायला सांगता आणि पुन्हा भक्तियुक्त कर्माची प्रशंसा करता हे कसे?तेंव्हा भगवंत अर्जुनाला भक्तियुक्त कर्म किती महत्वाचे व कसे साध्य करायचे ते सविस्तर सांगतात. कर्माचा संन्यास व भक्तियुक्त कर्म हे एकाचवेळी भगवंत सांगतात त्याचा अर्थ जे कर्म भगवंताप्रित्यर्थ घडते ते कर्म नसुन भक्तीयुक्त कर्म आहे जे भगवंताला अतिव प्रिय आहे.भक्तिमध्ये युक्त असणारा तत्काळ ब्रम्हाची प्राप्ती करतो असे भगवंत सांगतात.संतांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास ज्याने आपले मन भगवंतालाच वाहून टाकले त्याला वेगळा मोक्षच नाही तो स्वतःच भगवतमय झाला म्हणजेच बाह्यरूपात नाही तर अंतरंगातून तो व भगवंत एकरूपच असतात.हीच भक्ति व हाच मोक्ष आहे असे सर्व संत सांगतात.भक्ताची बाह्य परिस्थिती जरी वेगळी असली म्हणजे तो खातपीत असेल,बोलत असेल,काहीही करतांना दिसत असेल तरी प्रत्यक्षात तो अखंडपणे मुक्ती भोगत असतो.कारण तो यथार्थपणे जाणत असतो की कर्ता करविता भगवंत आहे मी तर निमित्त आहे.याच त्या धारणेमुळे भक्त विषयसुख उपभोगत राहुनही कमळ जसे चिखलात राहुनही त्यापासुन अलिप्तअसते तसे भक्ताचे सुकोमल मनही संसारापासुन अलिप्त रहाते.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न