सौंदर्य
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
हे संपूर्ण विश्वच ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती आहे..डोळसपणे पहाणार्याला हे जाणवल्याशिवाय रहाणार नाही..किती रंग,किती रूपं,किती जाती,किती प्रजाती,केव्हडा मोठा विस्तार..सगळंच अचंबित करणारं..या जगाकडे बघायला माणूस म्हणून मला दोनच डोळे का मिळाले असं नेहमीच वाटतं..शब्द,रूप,रस,गंध,स्पर्श अशा विविध मार्गाने आपण भोवतालचा परिसर अनुभवतो..पावसाळ्यातला पाऊस,उन्हाळ्यातलं ऊन,हिवाळ्यातली गुलाबी थंडी सगळं सगळं अनुभवतो..निसर्गाचे सहाही ऋुतूंचे सहा सोहळे आपण दरवर्षी अनुभवतो..ही ऋतुंची किमया कशी नी किती खोल मनावर परिणाम करते ते सांगायलाच नको..त्यांचं सौंदर्य वर्णनापलिकडचं..
मला आवडतो तो पावसाळा... माझी सौंदर्यदृष्टी नेहमीच वळते ती पावसावर..पावसाळ्यातल्या पावसाचं स्वतःचं असं एक खास संगित असतं..तो कोसळतो तेंव्हा दिशा निःशब्द होतात..तो बरसतो तेंव्हा तन मनाचा ताबा घेतो..तो रिमझीम येतो तेंव्हा प्रेमी युगूलांची रस्त्यावर गर्दी होते..
ये रे घना ,ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना..
किंवा
श्रावणात घननीळा बरसला..
रिमझीम रेशीमधारा..
उलगडला,रानातुन अवचित
हिरवा मोर पिसारा...
असा हा ऋतू हिरवा ,ऋतू बरवा..सर्वांचाच लाडका!!..
या रंगवैभवी ऋतुचं वर्णन करावं तेव्हडं कमीच..किती रंगात ,किती ढंगात हा धरतीचा प्रियकर मनाला नुसतं वेडं लावतो..
मी तुम्हाला खरं सांगू,माझं नी या पावसाचं एक वेगळं नातंय ...राधा कृष्णाचं...तो श्यामसावळाच जणू पावसाच्या रूपात मला भेटायला येतो..राधेसारखी मी पहिल्या पावसात "पाऊस आला ,पाऊस आला" करत त्या निळ्यासावळ्या श्यामसुंदराला घट्ट मिठीत घेते...किती अब्द अब्द बोलतो आम्ही ..दोघंही तृप्त होतो..तेंव्हा दिशाही गहिवरतात..मंद वारा सुटतो.मला हसत हसत रडतांना बघुन वाराही थांबतो..अवकाशात मेघांची गर्दी झाली की मधुनच वीज लख्खकन चमकुन जाते..जणू काही कान्हाचा व माझाफोटोच काढते..रंगवैभवी मोरपीस ल्यायलेला,गळ्यात भरगच्च वैजंयती धारण केलेला..गालावर खळी पडलेला सावळा पहायला घनही आतुर होतो..व सुरू होतो अविरत बरसणारा जलवर्षाव..माझी मी न राहीले असे द्वैताचे मिलन होते.मग मी व तो वेगळे रहातच नाहीत...अशीही प्रत्येक पावसाळ्यात जन्म घेणारी नवलकथा विराम पावते पुन्हा जन्मास येण्यासाठी..पुन्हा पुढचा पावसाळा अनुभवण्यासाठी..
प्रत्येक पावसाळा येतो नवी तगमग घेऊन..ज्येष्ठाची कळकळ सुरू झाली की मनात विचारांची गर्दी व्हायला लागते..तो पहिल्या पावसाचा धरतीला झालेला पहिला स्पर्श व त्या मिलनानंतर आसंमतभर पसरलेला मृदगंध ...अहाहा!!..अंगभर रोमांच निर्माण करतो..जणू जलवर्षावासाठी तळमळणार्या धरतीला तीचा प्रिय पाऊस बरसत येऊन चिंब चिंब करतो...मग ती त्याच्यासाठी झुरणारी वसुंधरा त्या स्पर्शाने मोहरते, दरवळते,चिंब चिंब ओली होत तृप्त होत जाते..तिच्या नद्या,डोंगर,दर्यात पाऊस आल्याचा सोहळाच जणू सुरू होतो..पक्षी पंख फडफडवत,सुंदर कुजन करत झाडांतील कोटरात आनंद साजरा करतात..आसंमंतात उडणारे पक्षी जवळच्या झाडावर आश्रयाला येतात,तेही चिंब भिजून..त्या पक्ष्यांचा किलबिलाट पाऊस पडण्याच्या आवाजात एकरूप होतो..शेतकरी अतिव समाधानाने शेतातील भिजणार्या काळ्या मातीकडे पहात असतो..भूई तापलेली होती ती आता निवते..थोड्याच दिवसात नवे कोंब फुटतात..सृजनाचा हा अनोखा सण सूरू होतो..निसर्ग मानव एकत्वाचा सण सुरू होतो..
श्रावणातल्या मंगळागौरी,नागपंचमीचे झोके,नारळी पौर्णिमेत समुद्राला आलेले उधाण..किती नी काय..पाऊस माणसाला त्याच्या मागचे सगळे व्याप टाकून उत्सवाला प्रवृत्त करतो..
ही धरती सुजलाम सुफलाम होण्यासाठी पावसाची किती गरज असते ते सांगायलाच नको..पाण्याशिवाय धरती वैराण वाळवंट बनते..मरूभूमी बनते..पावसाची चाहूल तिला स्वप्नांचे धुमारे पुरवते..ती हरितवसना श्यामला पृथ्वी प्रत्येक उन्हाळ्यानंतर जलवर्षांवाची प्रतिक्षा करते..ती व तो यांचा हा सुरेल प्रवास माझ्यासारख्या पाऊसवेडीला सौंदर्याचे नवे आयाम देतो..ती सस्यशामला धरती म्हणजे जणू प्रतिकातली मीच बनते..
माझी,
नववधू प्रिया मी बावरते..
अशी अवस्था होते...
असा हा मनमोहक पाऊस व त्याच्या दरवेळी तयार होणार्या स्मृती केवळ अवर्णनीयच..
Comments
Post a Comment