गुरूमहिमा




✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी



       गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वरः।

गुरूःसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।


       अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज महाराज अशा परमआदरणीय सद्गुरूंना आजच्या गुरूपौर्णिमेच्या पावन पर्वावर कोटी कोटी प्रणाम!

              माझ्या अल्पमतीने सद्गुरूंविषयी समर्थ काय सांगतात ते लिहिण्याचा प्रयत्न करते.समर्थ रामदासस्वामींनी दासबोधात सद्गुरूस्तवन समासात सद्गुरूमहिमा वर्णन केला आहे.त्यात समर्थ म्हणतात की सद्गुरूंचे अंतिम लक्ष्य शिष्याला आपल्यासारखेच बनवणे हे आहे.म्हणजेच सद्गुरू शिष्याला स्वतःइतके सक्षम बनवून सोडतात.अशी कृपा खरोखर या संपूर्ण ब्रम्हांडात कोणीही करू शकत नाही.ही किती थोर कृपा आहे की ज्यामुळे शिष्य सद्गुरूंसारखच सद्गुरूपद प्राप्त करू शकतो.उदार अंतःकरणाच्या या परमेशाचे वर्णन करायला समर्थ सांगतात की मी अपुर्ण आहे.या मायेच्या आधाराने मी सद्गुरूमहिमान वर्णन करू शकत नाही,कारण पृथ्वी जवळ क्षमा व आधाराचा गुण आहे.परंतू तिची उपमा सद्गुरूंना लागू होत नाही कारण सृष्टीच्या अंतकाळी तीचाही धिर सुटतो व ती पाण्यात विलीन होते.सुर्याची उपमा दिली तर तीही अपुरीच आहे कारण सुर्य त्याच्यासमोर वस्तू आल्यानंतरच प्रकाश देतो .इतकेच काय ज्या अंतराळात तो विराजमान आहे तेथे सर्वत्र अंधारच आहे.परंतु सद्गुरू आपल्या ज्ञानरूपी प्रकाशाने शिष्याला पूर्णज्ञान देतात व अंती स्वतःसारखेच बनवतात.सद्गुरू हे स्वसंवेद्य तत्व आहे.ते स्वयंप्रकाशी आहेत.कल्पवृक्ष किंवा चिंतामणी तसेच स्वर्ग ,कामधेनु या सगळ्यांची उपमा सद्गुरूला अपूर्णच आहे कारण, या सगळ्या गोष्टी मायेच्या प्रांतातील आहे आणि सद्गुरू हे मायेच्या पलिकडे स्थित असलेले परब्रह्म आहे.त्या परब्रह्माला मायेच्या आधाराने दिलेली कोणतिही उपमा थिटीच पडते.समर्थ सांगतात की अंतरनिष्ठ साधूच सद्गुरूला समजू शकतात.यासाठी सद्गूरूला सद्गुरू बनुनच समजुन घ्यावे लागेल असे ते सांगतात.

                सद्गुरूमहिमा वर्णन करणे ही समर्थांनाही अशक्यप्राय गोष्ट वाटते तेथे तुम्हा आम्हा सामान्यांची कथा ती काय असणार.आपण सद्गुरूमहिमान वर्णन करणे केवळ अशक्यच आहे.परंतूू, समर्थांनी आपल्या प्रेमळ अंतःकरणातून सद्गुरूला जी स्तवनरूपात सुमनांजली वाहीली आहे तीच आपली पुंजी व तेच खरे सद्गुरूस्तवन.सद्गुरू समजणे हे मायेच्या अखत्यारीत राहून शक्य नसून ते परब्रह्म त्या पलिकडचं आहे हेच आपण समजुन घ्यायचं आहे.

        शेवटी अशा शांत, स्थिर, निर्गुण, निराकार,अनुपमेय सद्गुरू तत्वाला शरण जाते व तूझे वर्णन करायला तूच बुद्धी दे हीच मागणी आज सद्गुरूंना मागते.तुझी कृपा सदैव राहो ही प्रार्थना करते .सद्गुरू माझ्या पाठीशी सदैव राहोत व  हा प्रवास सद्गुरूकृपेने  सायुज्यमुक्तीला प्राप्त होवो हीच कळकळीची प्रार्थना करते!

जय सद्गुरू।

जय जय रघुवीर समर्थ।

जय श्री राम।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न