पावसास प्रेमपत्र.. 



✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी



प्रिय पावसा, 

     तुझ्या स्वागताचे दिवस आले. मन परत एकदा प्रसन्न झाले. तुझ्या येण्याने मनाला आलेली मरगळ क्षणात नाहीशी झाली. खरंच किती भावणारा, रोमांचित करणारा तुझा सहवास.तूझे धरतीवर आगमन म्हणजे नवचैतन्याचे आगमन. सणावारांची रेलचेल. मंगळागौरीची गाणी, झाडाला बांधलेले झोके, उपास तापासांचे लगबग, मनाला आल्हाद देणारे तुझे हे सुखसोहळे. धरती तुझ्या धारा पिऊन हरीतवसना होते. तिचे रूप खूलते. धरतीवर नद्या,सरोवरे,धबधबे उत्फुल्लतेने तुडूंब भरतात व वाहू लागतात. जणू ते तुझ्या येण्याच्या उत्सवात आनंदविभोर होतात. 

   माझ्या लहानपणापासुनचा तू सवंगडी. कागदाची होडी, शाळेत गायलेली तुझी गाणी, रस्त्यांवरून येतांना उडालेली फजिती सगळं मनात कायमसाठी केरलेलं. कॉलेजमध्ये असतांना चिंब भिजत खाल्लेला समोसा, फूरक्या मारत पिलेला चहा,स्कूटी पेपवरून केलेली यथेच्छ सैर.. लग्न झाल्यावर बावरलेली मी पहिल्या पहिल्या श्रावणसणांना किती नटले, मुरडले. पहिल्या डिलिव्हरी नंतर बाळाला सोबत घेऊन अनुभवलेली तुझी खोडकर मस्ती..किती नी काय.. तुझं वैभव अनुभवायला तसं रसिकच मनच हवं., म्हणजे तूझ्या सहवासाचा आनंद पुरेपूर अनुभवता येतो. थेंब थेंब पडणारा तू, भीजपाऊस तू, रिपरिपणारा तू, जोरदार तू, धुवाधार तू, कोसळणारा तू, गारांसह बरसणारा तू,विजांच्या कडकडाटासह बरसणारा वादळी उग्र रूप धारण केलेला अशी तुझी कितीतरी रूपं मी अनुभवलियेत. जणू मानवी मनाचीच प्रतिबिंबित रूपं ती. तूझं नी माझं नातं त्यामुळे अधिकच घट्ट होत जातं.

  मी पहिल्यापासुनच तुझी दिवानी., चाहती... तुझे बरसणारे चिंब चिंब रूप मनात कायमच साठवून ठेवत आले.तू दरवर्षी येतोस पण यायला कित्ती कित्ती उशीर करतोस?. मी तर नुसती आसुसलेली असते. तुझ्या पाणीदार ओठाला ओठ लावण्यासाठी माझ्यासारखे कितीतरी आतुर चातक वाट पहात असतात न जाणे. तुझ्या येण्याने मिळणारी तृप्ती कशाकशानेच पूर्ण होणार नाही.जग मला खूळी म्हणेल पण तुझ्या सहवासासाठी आसुसलेली मी जगाला जुमानत नाही. 

    संस्कृत भाषेत पाण्याला जीवन हा सुद्धा समानार्थी शब्द आहे. किती समर्पक आहे तो. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी तुझे येणे जीवनदानच आहे. मी व ही सारी जीवसृष्टी तुझी ऋणाईत आहे. 

 रे पावसा, आमच्यावर कधिही नाराज होऊ नकोस. आम्ही तुझे सच्चे चाहते आहोत. ये बरस नी बरसतच रहा अगदी धूंद होऊन. या धरतीच्या कलशात तुझे सुवर्ण बिंदू ओत व आम्हाला कृतकृत्य कर. 

     

       तुझीच पाऊसवेडी🌧️

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न