"सद्गुरू"
✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी
ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमुर्तीं।
द्वंद्वातातीतम् गगनसद्रुशम् तत्वमस्यादिलक्षम्।
एकम् नित्यम् विमलमचलं । सर्वधिसाक्षीभूतम्।
भावातीतं त्रिगुण रहितं सद्गुरू तं नमामी।।
या अशाश्वत, अथांग, सतत बदलणार्या जगात मनुष्य सतत त्याच्या ध्येयाकडे आकृष्ट होत असतो... कळत - नकळत.. त्याची मुक्तीची ,मोक्षाची धाव सतत चालुच असते.. पण गंमत पहा आपल्याला याची किती कल्पना असते..? जगाच्या चित्र विचित्र महानाट्यात आपण एक बाहूलीच असतो... नाचवणारा असतो तो ईश्वर... तो बाहुल्यांचे खेळ खेळतो नी आपणही त्यात अगदी तन्मयतेने रंगून जातो... त्यात किती, कसे फसले जातो, किंवा किती विकारांचा गुंता करून बसतो ते तोच जाणे.. बघा परमात्मा सगळे खेळ खेळतो पण या सगळ्यात एक अद्रृश्य शक्ती तुमच्या पाठीशी सतत असते, जी तुम्हाला या खेळात कधीही हरू देत नाही.. ती शक्ती म्हणजे सद्गुरू...
सद्गुरू हे एक विलक्षण तत्व आहे.. ती कोणी व्यक्ती नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे... तो जगाचा उद्धारकर्ता आहे... तो नादान, असंमजस जीवांना भवरोगातून बाहेर काढणारा कर्णधार आहे... सद्गुरू ही मी मागेल ते देणारी जादू नाही तर माझ्या परिश्रमांना बळ देणारी, मला यशपूर्तीसाठी आवश्यक ते सर्व करवून घेणारी मार्गदर्शक प्रणाली आहे... सद्गुरू मोक्षदाता आहे हे आपण नेहमीच वाचलं, ऐकलं पण अनुभवलं कमी... तो मो़क्ष देतो म्हणजे काय करतो? तर तुम्हाला परमेश्वराच्या जवळ नेण्यासाठी तयार करतो.. तो आपल्याला तावून सुलाखून बघतो, विविध परिक्षा घेतो... या परिक्षा घेतांना तो भलेही मौन असेल पण डोळ्यांनी भक्ताला आश्वस्त करतो.. तो आपल्याला धीट बनवतो... जीवनाच्या लढाईला स़क्षम बनवतो.. स्वतः साधकाची ढाल बनतो... तेही साधकाच्या नकळत.. साधक परिक्षा पास होतो पण नकळत यशाचे श्रेय स्वतः कडे घेतो.. अरे जेंव्हा तू परिक्षा देत होतास, लढाई लढत होतास तेंव्हा सद्गुरूच तुझा अंगरक्षक होता.. विसरलास? त्याने कधिही तुला या लढाईत एकटं सोडलेलं नाही..
सद्गुरू स्वतः पुर्णच असुन शिष्यालाही पुर्णत्व देतो,हा त्याचा विलक्षण कृपाशिर्वाद आहे.सद्गुरूचं ह्रदय म्हणजे माऊलीचं ह्रदय...बाळ जे मागेल ते देणारं करूणामय रूप..सद्गुरू शिष्याचं पूर्ण हित करतात..कारण त्यात माऊलीची तळमळ,आर्तता असते..माझं लेकरू एक एक पाऊल माझ्याकडे कसं टाकेल यासाठी सद्गुरू सतत प्रयत्नशील असतात..लेकराच्या सर्वांगिण प्रगतिसाठी माता जशी काळजी करते तसे सद्गुरू सर्वतोपरी शिष्याचा हात धरून त्याला मोक्षाकडे प्रवृत्त करत असतात..ही गुरूमाऊलीची केव्हडी कृपा..कारण,शिष्य हे जाणत नाही की तो कोण आहे?त्याला आत्मप्रचिती देणारं महततत्व म्हणजे सद्गुरूच!शिष्याला आपल्यासारखंच बनवणारा उदार ह्रदयाचा हा परब्रम्हरूपातील जगदाधार म्हणजे आपल्या सर्व जीव सृष्टीचा पालनपोषणकर्ता व मुक्तिदाताच!
या भवसागरात सद्गुरू हा जीवाला केवळ धीरच नाही तर खूप मोठा आधार आहे.. तू कधीही एकटा नाही हे सांगणारा आधार आहे..
मी ही जीवनाच्या लढाईत एकटा नाही तर साक्षात सद्गुरू माझ्यासोबत ही लढाई लढत आहेत, माझी ढाल बनून... मा़झं चिलखत बनून.. ती लढाई लढण्याचं बळही त्यांचं असाधारण नामच देतं हेही आपण बर्याचदा विसरलेलो असतो...' कर्ताही तूच करविताही तूच मी तुला शरण आहे ',हे वाक्य ह्रदयातून निघाले की ते आपली संकटातून रक्षण करतात.. ते आपल्याला निर्भिड बनवतात.. मनाने एकदा गुरूच्या हातात आपला हात दिला की ते आपली सा़थ कधिच सोडत नाही,. ही अनेकांच्या अनुभवातील गोष्ट आहे... तो असला की मी निश्चिंतं..
अशा या भवसागरातील कर्णधाराला ,माझ्या उद्धारकर्त्या सद्गुरूला कोटी कोटी प्रणाम..हे सद्गुरू,तू कृपावंत हो.मला ह्रदयाशी घे.परत मला या भवसागरात पाठवू नकोस..मी तूला पूर्णतः शरण आहे🙏🏻
जय सद्गुरू🙏🏻
(सद्गुरूंविषयी लिहिण्याचा हा अल्प प्रयत्न, सद्गुरू माऊलीसाठी कितीही लिहिले तरी कमीच🙏काही चुकले असल्यास क्षमा असावी)
Comments
Post a Comment