Posts

Showing posts from 2023
 ।।श्री राम।। युवामर्श तर्फे लेखन स्पर्धा विषय- श्रीरामासंबंधी आपल्या आवडीचा इतर विषय     *रामभक्ती*  ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी        रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः।।          निळ्या कमळपाकळ्यांसारखे मोठे डोळे, ते तुडूंब भरलेल्या जलाशयासारखे सुंदर, दाट पापण्या, भव्य भालप्रदेश, कपाळावर उभं गंध, कानात सुवर्ण कुंडले, अतिसरळ नासिका,सुंदर लालसर ओठ, त्यात स्फटिकासमान सुंदर दंतपंक्ती, रक्तिमा पसरलेले गाल, सुंदर नाजुक हनुवटी, मदनालाही लाजवेल असे सुंदर प्रसन्न हास्य हे वर्णनही जिथे फिकेच पडावे असा माझा राम...त्याची तुलना मदनाशी करावी तर सौंदर्यात तोही मागेच रहातो असे रूप..नुसताच रूपाची खाण नाही बरं माझा राम तर गुणांचीही खाण आहे. हजारो राक्षसांना एकसाथ मारण्याचे शरलाघव ज्याला अवगत आहे असा वीर, धनुर्धर रामचंद्र..तोच माझा स्वामी श्री राम..त्याचं गुणगान करतांना जिथे वेदही फिके पडले तिथे पामर जीवाची काय कथा..     कौसल्येचा राम, दशरथनंदन राम, सीतापती राम, लक्ष्मणाचा राम, हनुमंताचा राम आणि साऱ्या...
 ।।श्री राम समर्थ।। मना सज्जना भक्तीपंथेची जावे... ✍🏻 सौ.स्वरूपा कुलकर्णी        सकाळची प्रसन्न वेळ ...सडारांगोळीने शृंगारलेले अंगण...त्या अंगणातील तुळशीच्या पवित्र वृंदावनाजवळ समर्थांसारखा तेजःपुंज,वैराग्यसंपन्न, योगिराज जेंव्हा मेघासारख्या करूणगंभीर स्वरात मनाच्या श्लोकांची साद घालत असेल तेंव्हा आजूबाजूचा प्रत्येक व्यक्ती स्वधर्माच्या स्वाभिमानाने,आत्महिताच्या प्रेरणेने खडबडून जागा होत असेल आणि त्याचबरोबर कोणत्याही त्यागाला सिद्ध होत असेल.       समर्थांनी निर्मिलेले मनाचे श्लोक किंवा मनोबोध किंवा मनाची शते हे भूजंगप्रयात वृत्तात आहेत.प्रत्येक ओळीत १२ अक्षरे व ४ य गण असतात.३ अक्षरांच्या गटाचा एकेक य गण असतो.या रचनाविशेषामूळे भूजंगप्रयातातील काव्याला एक आकर्षक खटका,ठेका व ताल प्राप्त होतो.त्यामुळे ऐकणाराही विशेष प्रभावीत होतो.समर्थांचे हे मनाचे श्लोक २०५ असून समर्थांनी यात मानवी मनाला ईशचिंतनाचा महत्वाचा उपदेश केला आहे.तसेच यात भक्तीमार्ग निवेदिला आहे.          "मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः।।" असे शास्त्रकार सांगतात...
 **काव्यबंध समुह आयोजित, काव्यलतिका स्पर्धा,*   *विषय- गौराई आली घरा*   *शिर्षक- आली आली गौराई माझी*  आली आली गौराई माझी, सोनपावलांनी आली, घेऊन मांगल्याची किरणे, उजळली घरदारं अवघी... ज्येष्ठा आणि कनिष्ठा रूपे तुझी,  बहु गोड ती मना भावली, भक्त प्रेमासाठी घेतसे रूप, आवड देवी तुला लेकरांची.. आगमने तुझ्या चैतन्य पसरले, मन हे माझे आनंदून गेले, धूप, दीप, नैवेद्य, आरती, सुगंध  दरवळला दिशा दाही.. तीन दिसांची माहेरवाशीण तू, पुत्र गणेशासवे घरा येशी, घरातल्या लेकीबाळींसवे, मनोमन आनंदून जाशी.... तुझ्या आवडीचे फराळ केले, शुध्द तुपात लाडू मी वळले, अनारसे करंजा पोटी मी घातले, तूझ्यासाठी पंचपक्वान्न बनवले... सोळा भाज्या सोळा चटण्या, तुझ्यासाठी गोड जिन्नसही केले, फळ,फुले दक्षिणा समोर ठेवली, मनोभावे मी ओटी भरली... तुझी पुजा मी भक्तीभावे करते, माझी मनोकामना पूर्ण कर हे माते, तुझ्या लेकीस सुखी ठेव आई, विनंती चरणी वारंवार करते...  *- सौ.स्वरूपा कुलकर्णी,*  राहाता, अहमदनगर
 *गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला *  गणनायका तू महागणपती विघ्नेश्वरा तू मंगलमूर्ती, भक्तांची तू इष्टदेवता मोरेश्वरा मी नमीले तुजसी।। जास्वंदीची फुले वाहिली वरी दुर्वांकुरे शोभली, मोदक प्रिय बहू तूजला देवा मखरी बैसला तू गणराया।। विनायका तू घरा येसी दहा दिवस ती आनंदाची, भक्ती-सुमने तुला वाहिली लंबोदरा तू विघ्ने हरशी ।। आरती पुष्पांजली गाती सारी नवचैतन्याची सळसळ झाली, मने ही सारी भक्तीत नाहली बाप्पा आगमने चिंब भिजली।। भक्ती शक्ती दाता गणपती रिद्धी सिद्धी वरदायक तुची, लक्ष्मीदेवी तुझ्या संगती विद्यादेवी प्रसन्न हसली।। वंदितो महागणेशा तुजसी तुझी छत्रछाया मजवरी, वरदहस्त राहो माथी गणराया हे आशिष देशी।। जागर तुझ्या नामाचा अन् घरोघरी गीतगायने, आबालवृद्ध रंगून गेले कसे कळेना दिस हे सरले।। तू निघाला परतण्यासी किती कासाविशी मजला होई, मन झाले अनावर आता आठवण ठेव बाप्पा आमुची ।। तू आला धूमधडाक्यात तू चाललास धूमधडाक्यात, निरोप देतांना मात्र तुला बाप्पा गलबलले मी मनात।। पाऊस हजर तुझ्या समोरी जणू भेटण्या आतूर तोही, कसे नी किती गुंतलो देवा ताशा नी वाद्ये नाचती समोरी।। तू भक्तवत्सल देवा गणेश...

नवरात्री

 आश्विन शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस आहे अगदी खास चहू बाजूला पसरला पहा दिव्य सुगंधी कस्तुरीचा वास घटस्थापनेचे मंगल पूजन नवरात्रीचे हे पर्व शुभंकर देवीची पूजा करूनी आता लावू  देवघरात अखंड ज्योत नऊ दिवस देवीची आपण करूया मनोभावे आराधना पूर्ण करेल देवी भक्तांची भोळीभाबडी मनोकामना दुर्गा सप्तशतीचे पाठ नित्य मनोभावे देवीसमोर करूया होता पाठाच्या सांगतेने देवीची आरतीही करूया नऊ धान्य एकत्र करूनी घटस्थापना करू आईची दिव्य पुष्पमाला अर्पूनी नैवद्य दाखवू खिरीचा देवी दुर्गा दशप्रहरणधारीणी चंडिका तू माताभवानी करते नमन देवी अंबिकेसी बल दे लढाया तुझ्या लेकरांसी यश दे बुद्धी दे माताभवानी स्तविते मी तुजला परोपरी देई प्रतिसाद लेकराला गे आर्त गीत तुझेच गाई
 *शिर्षक- गुरूजी तुम्ही होतात म्हणून...*  मी वाचली बाराखडी सारी तुमच्या काळ्या फळ्यातुनी रेखिली अक्षरे वळणदार तुमच्यामुळे पाटीवरी... तुम्ही होतात म्हणूनी पुस्तके आम्हा समजली त्या शेकडो पानांतुनी  विषयांची ओळख झाली... शिकून मोठे कसे व्हावे हे गणित मजला उमगले गुरूजी तुमच्या बक्षिसाने स्वर्गच ठेंगणे वाटले.... मराठीशी गट्टी झाली निबंध कविता धड्यातुनी मी सदा वाचत गेलो भाषेची अद्भूत सफर न्यारी... इतिहास मजला शिवरायांचा कायम स्मरला जीवनातही तुम्ही रूजवला भगवा झेंडा महिमा स्वधर्म क्रांतीचाही ... इंग्रजी न वाटली कधी परकी तुम्ही रूजवली गोडी भारी मी बघा आज सहज बोलतो बोली जगाची नव्या युगाची... जरी बोलतो अनेक भाषा  तरी संस्कृत ही देवभाषा तुमच्या प्रयत्नाने झाले संस्कार तियेचे अजोड तेंव्हा.. विज्ञानाची कास धरूनी सावध ऐकून पुढल्या हाका मी उभा नवयुगासमोरी हा गुरूजी ही तुमचीच मनिषा! भूगोल सारा मजला वाटतो तळहाती ठेवला तुम्ही सारा मी पहातो लखलख चंद्र तारे ओळख त्यांची अचूक मला... कसे नी केंव्हा फिटतील हे ऋण तुमचे गुरूजी सारे मी होतो नतमस्तक आता शिल्पकार  तुम्ही जीवनाचे..
 काव्यबंध समुह आयोजित,  काव्यलतिका स्पर्धा, विषय- ह्रदयी वसंत फुलतांना शीर्षक- अनोळखी प्रिती अनोळखी या वाटेवरती फुले उमलली सहज सुगंधी, सहवासाचे ऋतू कोवळे अलगत आले तारूण्यात ते मी संकोचून पहिल्यांदा प्रश्न विचारी जगावेगळे, तूही हसूनच बोलत राही उत्तर देई अवखळ मज ते कशी मी गुंतले तुझ्याभोवती नकळे भान सुटले अवघे, भूत भविष्य सारे विसरून समीप आलो प्रेमऋतुते.. कसे कधी न काही कळले एव्हडे अंतर क्षणात सरले, तुम्ही तुम्ही करता करता तू तूझी मी बनले सख्या रे बोलते तुझ्याशी शब्द ह्रदयीचे, राहू न शकले मन्मनी ते, किती अनोळखी होता पूर्वी, आज आहेस मत्प्रिय सखा रे जग हे माझे एकरंगी रे, झाले सप्तरंगी इंद्रधनू हे, कशी सावरू भान स्वतःचे, उरला तूच, तूच आता रे सावध होते इतुके साल मी विसरले माझे सुर वेगळे आता आळवते सूर मखमली तुझी नी माझी प्रित नवीनवी... -सौ.स्वरूपा कुलकर्णी राहाता,अहमदनगर
 आलंय माझ्या राशीला... - सौ. स्वरूपा कुलकर्णी           मैत्रिणींनो, माझी रास धनु! राशीचक्रातील नववी रास! गुरू ग्रह हा राशी स्वामी! अत्यंत उत्साही, धाडसी, द्विस्वभावी व अध्यात्मिक रास म्हणून धनू राशीकडे पाहिलं जातं.या राशीचे अनेक पैलू आहेत.प्रपंचासोबत अध्यात्माचाही शिवधनुष्य पेलणारी ही गुरू ग्रहाची लाडकी रास...मी खरोखर भाग्यवान आहे की याचा प्रत्यय मला पावलो पावली येतो. सद्गुरूंचे आशिर्वाद व कृपा ही माझ्या जीवनाची सर्वात मोठी संपत्ती आहे.        मंडळी, माझ्या राशीच्या व्यक्ती साधारणपणे Happy go lucky असतात.थोड्या मेहनतीनंतर भरपूर यश त्यांना मिळतं. परंतू, माझ्या राशीचा अवगूण हा की ती द्विस्वभावी रास आहे.पटकन निर्णय घेता येत नाही.त्यामुळे निर्णायक क्षणी फार फजिती होते.मी बऱ्याचदा महत्वाच्या क्षणाला Confusion मध्ये असते.ह्यातुन अनेक विनोदी किस्से निर्माण होतात. भिडस्तपणामुळे कधीकधी फसगत होते.लोकांची पारख करतांना चुका होतात.भोळसटपणा हा राशीचा गुणधर्म.त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.    मैत्री करणे हे ह्या राशीचे वैशिष्ट्य.अ...
 मला समजलेला पांडूरंग - सौ. स्वरूपा कुलकर्णी       विठ्ठल, पांडूरंग, पंढरीनाथ, विठू, सावळा, अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा विठोबा म्हणजे आपलं आवडतं दैवत!! किती सहजपणे आपण त्याला अरे विठ्ठला, सख्या पांडूरंगा अशी साद घालतो.तोही तितक्याच तत्परतेने भक्ताच्या हाकेला ओ देत आलाय.अगदी युगानुयुगे कमरेवर हात ठेवून दर्शन देत राहणारा विठ्ठल म्हणजे आपल्या सुखदुःखांचा साक्षिदार!त्यातून सोडवणारा सखाही तोच..मानवाला त्रस्त करणारी ती माया म्हणजे त्याची अखंड दासी! माणसाला कर्मबंधनातुन विठ्ठलाचे स्मरण करून देणारी ती मायादेवी म्हणजे त्याची चरणदासी! देवाच्या तालावर नर्तन करणारी ही माया ही आपली परिक्षाच घेत असते.पण त्याला एकदा आपलंसं करून घेतलं की माया नष्ट होते.उरतो तो फक्त भगवंत! सगुण- निर्गुण परमात्मा कळायला भाग्य लागतं.संतांनी ते जाणलं..हे पंढरीचं सावळं ध्यान त्यांनी तनमनात मुरवलं..सखा पांडूरंगाला कडकडून मिठी मारली नी ऋषीमुनींनाही दुर्लभ ते परमात्म तत्व याची देही याची डोळा अनुभवलं..कसं होतं ते रूप? सावळे चरणकमल..त्यावर चंदनाची उटी, पायघोळ पितांबर नेसलेला, निळंशार उत्तरीय घेतलेला, नाभी...
 थेंब पावसाचे - सौ.स्वरूपा कुलकर्णी होऊनी चातक पाहीन मी, वाट नभात त्या मेघाची, तृषार्त मन माझे होईल शांत, पिऊन थेंब अमृताची स्वर्गामधले अमृतथेंब ते, जणू धरेवर सरसर येते, अलगद तिच्या देहावर करते, सिंचन भरभरून प्रेमाचे तीही उन्हाने तहानलेली , माझ्यासम कासावीस अवघी, बरसती रिमझीम पाऊसधारा, मला शांत करूनी तिला शांतवीती... मी होतो पिऊनी गाढ निवांत, धरा सारी भिजते ओली, एकाच वेळी मी नी सृष्टी, पाऊस करतो तृप्त दोन्ही...
 आयुष्यावर बोलू काही.. -सौ.स्वरूपा कुलकर्णी आयुष्य सुंदर आहे खरे रे, डोळे उघडून पहा जरा, उमललेली कळी कालची,  फुल बनले कसे अहा!!... काळ्याशार मातीमधुनी, रंग किती साकारती, हिरव्या हिरव्या माळरानी, सूख डोलते वाऱ्याशी... रंग जाई-जुईचा निर्मळ, गुलाब- बकुळीचा तो पहा, गंध-रूप किती वेगळे, निसर्ग नटला किती अहा!!... सुंदर पाखरे किती पहावी, जाती त्यांच्या किती किती, प्रत्येकाचे ध्येय निराळे, त्यांच्यासवे तू होई पक्षी ... समुद्र लाटा असती अनंत, तरी न ओलांडी कधी बंधन, मनुष्य प्राणी किती लहानसा, विशाल त्याच्यासमोर पहा... पाऊस येई घेऊन साऱ्या, मनमुक्त त्या सरीवर सरी, मनमोकळे भिजून घेशी, निसर्गाची किमया सारी... निरागस ते बाळ चिमुकले, बोल बोबडे त्याचे सुंदर, मन होई किती अनावर, घ्याया पापी त्याची सत्वर.... तरूण -तरूणींची कुजबूज, प्रेम तयांचे किती अलवार, तूही घे शोध जगात ह्या, खरे प्रेम ते कुठले भूवर... आयुष्य हे सरते भरभर, काळवेळ ती जाई लवकर, तूच जीवनाचा शिल्पकार, जीवन करी तू एक महोत्सव...
 🌼सूपर हिरो बाबा🌼 -सौ.स्वरूपा कुलकर्णी बाबा असतो मुलांचा सुपर हिरो न्यारा, जीवनभर जगतो फक्त मुलांसाठीच खरा... तो आणि मुले दंगा करतात घरी खूप, आई म्हणते बाबाला बस झाली धुडगूस... बाबा रंगात आला की कॅरमही आवडतो खूप, कारमध्ये फिरवतांना हसवतो भरपूर.. बाबाला नी मला आवडते पाणीपुरी भारी, तो वळवतो गाडी तिकडे नी मजा येते खरी... त्याला असते नेहमी काम ऑफिसचे जास्त, पण म्हणून नाही चुकवली कधी रात्रीची गोष्ट... त्याला आवडतात गाणी नी पिक्चर जुने नवे, मीही ऐकत रहातो लता रफीचे तराणे.... तो किती जगतो भरभरून आमच्यासोबत, मजा येते त्याच्या गप्पात सगळं वाटतं सोप्पं... तो कितीही मोठा वयाने पण मारत नाही कधिही, म्हणून पिल्लं आम्ही त्याला मानतो नेहमी... त्याची नी आमची नाळ बाप लेकरांची, जणू बाबा भासतो मला देवाचाच दूत भारी..
 *अंगण*          - सौ.स्वरूपा कुलकर्णी      कोकणातली ती लाल माती...जवळच निळा निळा समुद्र......आकाशही निळेच पण तरीही समुद्राचे निळेपण जपणारे.....जवळच नारळी- पोफळीच्या बागा..केळी- सुपारीच्या रांगा..खाऱ्या वाऱ्याची किनाऱ्याला जुनी सवय!.. जवळच भातशेतीची लगबग..उन्हाळा घामाघूम करणारा तर पावसाळा यथेच्छ चिखल करणारा..हिवाळ्यात तर निसर्ग गोठवून टाकणारा...खरंच निसर्गाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे कोकण..!!         या कोकणातली घरही फार सुरेख ...उतरत्या छपरांची,ऐसपैस..गोतावळा सहज सामावणारी!..घर मोठंसं, तसं अंगणही भलंमोठं...केळीची कुंपणं ..कोपऱ्यात माडाची उंचच उंच सावली...वाऱ्याने डोलणाऱ्या सुंदर सुंदर फुलांची रेलचेल...जाई-जुई- केवड्याचा अत्तरगंध प्रत्येक सकाळ सुगंधित करणारा...मोठ्या अंगणात तांदळाच्या पिठीने रेखलेली सुरेख अल्पना(रांगोळी)..त्या सारवलेल्या भुईवर ती पांढऱ्यास्वच्छ ठिपक्यांनी रेखलेली अल्पना म्हणजे त्या घरातली समृद्धी व संस्कृती टिकवणारी कलाकुसरच..भोवती चिल्ल्या- पिल्ल्यांचा वावर, ...सांडलवंड करत अंगणात रमलेली बाळं..घरातल्या सु...
 *दिवाळी आनंदाची*  ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी        प्रसन्न पहाट...हवेतला गारवा...अवकाशाचा काळा रंग पण त्यावर चांदण्यांची लूकलूकणारी शीतल ,नेत्रदिपक कलाकुसर..घराघरांवर सुंदर लाईटींग..आकाशदिव्यांचे असंख्य रंग व शेड्स...त्यातुन झिरपणारा नितांतसुंदर प्रकाश..दिव्यांची घराघरांवर आरास..मधुनच येणारा फटाक्यांचा आवाज..आकाशात उडणारे रॉकेट्स...खरोखर दिवाळीचे हे पहाटरंग अतिशय मनभावन व  सर्वांचे आवडते, हो ना?        दिवाळीला वसुबारस,गुरूद्वादशी, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपुजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या सर्व पवित्र उत्सवांची नांदीच असते. हे सर्व उत्सव साजरे करतांना आपल्या संस्कृतीत त्या सणांचे महत्व मानवी जीवनात किती प्रेरणादायी आहे हे सांगून जाते. अत्यंत विचारपुर्वक ह्या सणांची योजना आपल्या पुर्वजांनी केली आहे.    वसुबारसेला सवत्स गायीचे पूजन ..गुरूद्वादशीचे गुरूस्मरण...धनत्रयोदशीला अमृतकुंभ धारण केलेल्या आयुर्वेदाचार्य धन्वंतरींचे पूजन..नरकचतुर्दशीला नरकासुराचा वध करणाऱ्या गोपाळकृष्णांची आठवण व  स्मरण,पहाटेचे अभ्यंगस्नान..लक्ष्म...
 *विषय- नवरात्री* नवरात्रीत या करूया जागर देवी अंबेचा। पाहूनी तीचे रूप मनोहर खुंटली वाचा।। शैलपुत्री ती हिमालय सुता देवी महामाया। पूजन करू प्रथम दिनी कर दीनांवर दया।।   द्वितीय दिनी प्रेममयी माता ब्रम्हचारिणी  । कमंडलू शोभे हाती शुभ्र वस्त्रधारिणी।।   तृतीय दिनी करु वंदन देवी चंद्रघंटेला । सुवर्ण कांती अतिसुंदर देवी महाबला ।।   चतुर्थ दिनी करु पूजन कूष्माण्डा मातेला। अष्टभुजा देवी शोभे सुंदर कुमारी बाला।।   पंचम दिनी करु नमन स्कंद मातेचे । स्वार झाली सिंहावरी करिते पुजन तिचे।।   सहावे दिनी स्मरु कात्यायनी सुंदरी। चतुर्भुज मुर्ती शोभे सुंदर साजिरी।। कृष्ण वर्ण कालरात्री पूजावी सातवे दिनी। तम दाटले जगती ते दूर करीशी झणी।।   महागौरी ती गौर वर्णा पुजा अष्टम दिनी। अर्धांगिनी ती शिवशंभूंची शोभे जगतजननी।। नवम दिनी स्मरु माता सिद्धिदात्री। यश ,बल, किर्ती, धन देई माता जगधात्री।।  *- सौ. स्वरूपा कुलकर्णी*     *राहाता, अहमदनगर*
 आठवणी  सुखदुःखांच्या.. -सौ. स्वरूपा कुलकर्णी    आठवणी ह्या कधी कधी फार चिवट असतात.मनाच्या कुपीत घट्ट घट्ट रूतून बसतात नी आपल्या परवानगीशिवाय मनावर अधिराज्य गाजवतात.मन त्यामुळे अस्वस्थ सैरभैर होतं.टचकन् डोळ्यात पाणी येतं.काहूर करणारे वादळ वाहू लागतात.मनाची नौका त्या वादळात आधार शोधू लागते.तो आधार त्याला नेहमीच मिळतो असेही नाही.. मिळाला तर एखादी कलाच मदतीला धावत येते..संगीत, नृत्य, नाट्य,  चित्र, लेखन, गायन...कितीतरी..कला हाच बऱ्याचदा आधार होतो.बैचेन मन आपल्या कलेला साद घालते.तेंव्हा त्यातुन नवनिर्मिती होते.या आठवणी कडू गोड कशाही असल्या तरी जेंव्हा कलेतून मनाला आधार शोधला जातो तेंव्हा कलेच्या प्रांगणात अनेक चमत्कार होतात.       आठवणींनी मनात घरोबा केला की पावसाळा नसतांनाही मन पावसात भिजतं, थंडी नसतांनाही हुडहूडतं... किंवा उन्हाळा नसतांनाही चटका बसावा अशी अवस्था होते.मनाला आठवणींचा विरंगूळा कधीकधी हवासा वाटतो.पण नकोशा आठवणी मात्र अजूनच कठोर परिक्षा पहातात.दुःखद आठवणींपेक्षाही नकोशा स्मृती अजूनच अस्वस्थ करतात.मनुष्य कायम या विरहाच्या किंवा मृत व्यक्त...
 तूझी आणि माझी मैत्री  ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी जसे फुलपाखरू उडे दोन पंखांनी तशी मैत्री तुझ्या माझ्यातली एकमेकांसवे घेई  मकरंद तो कुसूमातूनी... मन तुझे नी माझे  बागडे अवखळ उनाड ते फुलाफुलांचा गंध घेत जीवनाची मजा अनुभवे तू मित्र युगायुगांचा मी श्वास तू निश्वास रे कसे सावलीपरी राहे मैत्र दृढ हे विश्वासाचे तूझी नी माझी मैत्री सख्या पौर्णिमेतली तू चंद्र पूर्ण अवकाशी मी सागर तवसमोरी तू आर्त भाबडा मेघ मी धरा तहानलेली तूझ्या मैत्रीत सापडे रे क्षण विसावणारा नेहमी तूझ्या माझ्या मैत्रीत सख्या भावना चिंब चिंब नाहती काटा टोचता मज पाऊली अन् अश्रू झरे तव नयनातुनी किती आठवतो डबा सुट्टीतला जो तू न खाई मजला सोडूनी माझ्या आवडीचे लोणचे तू आनी रोज मजसाठी किती आवडे तूला गुळांबा मी काढून ठेवी तूजसाठी मन हळवे होई तेंव्हा तू हसून पहात राही तूझी आवडती भैरवी ती मी आळवे सायंकाळी तू दाराशीच ऐकत राही आलापी मन लावूनी ती संगीत असे तुझा प्राण  मीही सूरांची त्या वेडी तो सूर निरागस व्हावा हे दान मागे देवाशी रात्री सापडे जागा  चंद्र चांदण्यासोबतीला गिटार काढूनी तू होई मग्न तारांशी तूझा नी माझा...
*विषय :-रक्षाबंधन...* *शीर्षक :-रेशमाचे बंध...* रेशीम धाग्यांनी गुंफले नाते तुझे नी माझे रक्षण्या मजला देवाने तुजला जगी पाठवले... सण रेशमी सुखाचा बंध  हे मायेचे प्रेमाचे धाग्या-धाग्यातून ओसंडते बहिण-भावाचे विश्व सारे... श्रावण आला जवळी लागे माहेराची ओढ रक्षाबंधनाचा सण मनी स्मृतींची रूणझूण... तू केंव्हा रे येशिल  दारी चारदा पहाते गाडी पाहून लांबून मनोमनी सुखावते... तूझे रूपडे प्रेमळ माझ्या डोळा पाणी येते तूला आनंदी पाहून मनापासून सुखावते... पिल्ला भाचरांचा दंगा आत्या आली हे बघून जणू वाटते गोकूळ झाले माहेर हे सारे... निरांजन तेजाची मांगल्याचे कुंकू घेते सुपारी सौख्याची घेते अक्षता प्रेमाची... औक्षवंत होण्या तुजला मी औक्षण हे करीते किती प्रेम बहिणीसाठी हे तुझ्या डोळ्यात वाचते.... तू तृप्त मी तृप्त क्षणभरी रेशमी बंध मी बांधिते जणू सूख हे स्वर्गिचे त्या धाग्याने अनुभवते... नाते हे भावविभोर आई- बाबा दुरून पहाती पाहून बंधूभगिनी प्रेम आशिर्वाद लाख देती.... तू मायेनं आणली  साडी मजसाठी भाऊराया नाही सर तिची कशाला आवडीने जपेन तिजला... सोहळा हा सौख्याचा अनुभवते सानंदाने मी मागते देवाक...
  श्रावण💚 ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी         काही गोष्टींचा, रंगांचा आपल्या मनावर विशेष प्रभाव असतो. जसे पावसाचे पाणी, हिरवा निसर्ग, चंद्र- चांदणे, ओल्या मातीचा सुवास, विविध सुगंधी फुलांचे गंध..कधी कधी या गंधांसोबत मनात चिटकलेली गोष्ट किंवा प्रसंग..निसर्गातील विविध रंगसंगती आपल्या मनाला कधी उत्साह देतात,उर्जा देतात तर कधी संध्याछाया भिवविती ह्रदया असाही अनुभव देतात.पण खरं सांगू हे जगणं सुसह्य होतं या रंगांमुळे निसर्गातल्या संगीतामुळे..हे रंग उमटतात निसर्गचक्रामूळे...त्याच्या अनोख्या कार्यकुशलतेने..     काही महिने असेच अनोखे..निसर्गाच्या भव्य पटलावर एक एक नक्षी अशा काही रेखाटतात की मानवी मन व त्याच्या अनुभव विश्वाला खूप सुखद अनुभव देतात..समृद्ध करतात..त्या निसर्ग सोहळ्यातून प्रसवलेली गाणी,कविता,कथा, गीत, संगित मानवी जन्माची श्रीमंती वाढवतात..हे समृद्ध जगणं परमेश्वराची कृपाच आहे..     अवखळ दरीखोऱ्यातून वाहणारे पाणी जेंव्हा अधिकच वेगवान वहाते...जेंव्हा धरतीवर ओल्या नक्षी सतत पडायला लागतात..जेंव्हा वारा आपल्याच तोऱ्यात गाणी गाऊ लागतो,जेंव्हा निसर्गा...
 विरह     - सौ.स्वरूपा कुलकर्णी मैत्री तुझी नी माझी  आहे सुखद भाववेडी मन बावरे कसे रे गुंतले जसे मधाशी तू ऋतू पावसाळी ओला मी चिंब संध्या पश्चिमेची गाणे आर्त विरहाचे मिळे आतूर भैरवीशी तूला गाता सुरांतुनी मी रे कणकण व्यक्त होते तू मित्र युगायुगांचा  सौख्य हे नित्य स्मरते राहशी दूर मित्रा मजपासूनी दूर देशी का वहावे अश्रू खारे तव आठवांनी नित्य दिवशी नकळे भान जाते स्मरता मनी तूला रे काहूर उठते अनावर  मी होते मुकी स्वतःशी विरह हा तुझा मला रे  छळतो तुलाही का असा रे मैत्र दोन जीवांचे भाबडे हे न साहवे अंतर मिलनातले तू आठवतो नित्य दिवशी जसा सुर्य येतो दारापाशी मी वेचते किरण अलगद जणू वेचते क्षण भेटीतले धरित्री ही नित्य फिरते रवीच्या कक्षेभोवती मन तसेच माझे फिरते  तुझ्याच आठवांभोवती नको दुरावा हा असह्य ये ये फिरूनी घरकुलाशी मी तुझीच कालही होते  सखी तुझीच प्रिया आजही
 आठवणींच्या लहरी ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी पुन्हा पावसाने बरसून यावे, पुन्हा मेघ सारे दिशांना भरावे, पुन्हा गार वारा हळूच हा  वहावा, रस्ते आणि फिरस्ते भिजून चिंब व्हावे... अशा  सांजवेळी कितीदा तूला आठवावे, निमीषात पापणीने भिजूनही जावे, तू यायचा चिंब होऊन सरीतून, मी मुग्ध व्हायचे तूला चिंब पाहून.. कितीदा दिला तू वाफाळता चहा माझ्या हाती, कितीदा मी प्यायले  ते तृप्त क्षण त्यातुनी, तुझ्या पाणीदार नेत्रात मी पाहिले सारे, तारूण्य ते अवखळ बेधूंद सप्तरंगी.. मी नेहमीच स्मरते ऋतू पावसाचा, तू आजही मनी ताजा, वेडा भाबडासा, तूझी नी माझी मैत्री पावसाळी, करते आकाश  नी धरा तृप्त सारी... ये बरसत,बेधूंद आता पावसा रे, सखा माझा यावा फिरूनी माझ्या घरी रे, मी होऊदे पुन्हा चिंब त्याच्या कटाक्षाने, नको अंत पाहू पुन्हा ये सख्या रे...

पांडुरंग

 ... विठू माऊली माझी राहाते पंढरीसी, ज्ञाना,तुका,नामा चालले वारीसी.. किती ओढ ती मिलनाची, निघाली दिंडी पायीचं, घाली रिंगण भक्तांचे, विठू पहातसे कौतुकं.. तू असे मेघ आनंदाचा, आम्ही तृषार्त चकोरं, दे बा दर्शन विठ्ठला, झालो कासाविस सर्व... जनी म्हणे चक्रपाणी, आसावला जीव भेटीसाठी, मन जाई सवेग, तुझ्या चरणांशी,चरणांशी... मी उरले न आता, भेट झाली की नाही, न उरले भान आता , पांडूरंग  भासे चराचरी.. तुचं मन गात्र माझे, लागे ब्रह्मानंदी टाळी, विठूराया माझी मीच, आहे अभेद 'मी तू 'नाही पांडूरंग,पांडूरंग पांडूरंग,पांडूरंग पांडूरंग,पांडुरंग, पांडुरंग,पांडुरंग

वारी_पंढरीची

कवयित्री-सौ.स्वरूपा कुलकर्णी विठूराया सावळ्या,लागली तहान मिलनाची कशी भागवू रे सांग,भूक माझिया नेत्रांची रंग सावळा तुझा रे, मन माझे त्यात गुंतले लागली तळमळ ह्ऱदयाला,भेटीविणा तृप्ती नसे तू उभा रे एकला, ठेऊनी कर कटावरी तूझ्या पायीची रे वीट, झाली धन्य त्रिभूवनी सावळ्या पांडूरंगा, तूझे ध्यान मनी मानसी लागला रे छंद तुझा, मी गाते तुझी गाणी रामकृष्णहरी लागला, ध्यास पदोपदी चालतांना वाट पंढरीची,देहभान न उरले काही ज्ञाना तुका मुक्ताबाई,रंगी रंगले तव नामी गोऱ्हा एका जनाबाई, गुण आळविती अभंगी संत माहेरी येतात, ऐक सावळ्या तूला भेटायासी कर तृप्त मज विठाई,ओढ लागली तव दर्शनाची

शबरीची बोरे

 जय श्रीराम। ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी सीतेच्या शोधार्थ निघाले प्रभू दक्षिण दिशेसी.. मागे लक्ष्मण पुढे प्रभू चालले अरण्यातूनी... अरण्यातून त्या चालत असता लागला एक आश्रम.... प्रभू आणि लक्ष्मण गेले पहावयास आश्रम... त्यांनी पाहिल्या सर्वच वाटा रानफुलांनी शोभल्या.. तेथे दिसली जीर्णजर्जर तपस्विनी वृद्धा ... तोंडाने घेते राम नाम ती अविरत  एकांती... राम हळूच तिजसी बोलती, हा आलो माते तूला भेटायासी.. पडले शब्द कानी तियेच्या ती आनंदून जाई... पाहूनी रामप्रभू सावळा समोरी मंत्रमुग्ध ती होई.. अनेक वर्षांची तप:साधना तियेची आज पूर्ण होई... झुकूनी रामासमोर शबरी अविरत अश्रू गाळी.. तिच्या मुखातून शब्द उमटले धन्य  धन्य मी शबरी... शतजन्मींचे पूण्य तियेचे आज फळासी येई.... तीने  बैसवियले रामप्रभूसी आसनावरती आधी.. मग धूतले आनंदाश्रूंनी चरणद्वय ती सावळी... मग दिधली उष्टी बोरे खावयासी दोघांसी.. हसून राम त्यास पाहूनी म्हणती रानमेवा आणलास तू माई... बंधू लक्ष्मण किंचीत जाहला क्रोधित ते पाहूनी.. असले कसले प्रेम प्रभूवर दिधली उष्टी फळे सारी... शबरी सांगे रानफळे ही असती कधी कडू कधी विषारी... माझ्या रा...

सीतेचे स्वयंवर

  ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी जनक नृपती जनकपुरीत अपुल्या भव्य स्वयंवर मांडती... वरण्या त्या भूकन्येसी राजा भूपतीस निमंत्रित करती... मग येती अनेक भूपती  त्या सीता स्वयंवरासाठी... राजाने मांडला पण भयंकर प्रत्यंचा लावावी शिवधनूष्यासी... मगच होईल भूमीकन्या त्या राजाची स्वामीनी... ऐकूनी तो कठीण पण राजे मनी घाबरले... परंतू पाहूनी सुकूमारी सुंदरी मन्मनी मोहीत झाले... एक एक करीत राजे आले धनुष्य उचलायासी... परंतू अशक्य त्यांसी शिवधनूष्य ते साधे हलवायासी... चिंताक्रांत जनक भूपती राजांसी तेथे बोलिला... कशी केली दैवाने थट्टा माझ्या नशिबासी.. नाहीच उरला सुयोग्य वर  आता या अवनीवरती.. राहील आता माझी सीता आजन्म  अविवाहीत कुमारी... जो तो घाली माना खाली नसे बोलायासी जागा... त्यावेळी उठला लक्ष्मण जागचा  क्रोधित होऊनी जरा.. म्हणे महाराज तुम्ही न जाणले एक सत्य यावेळी.. स्वये रघूत्तम सुर्यवंशीचे येथे उपस्थित असती... तरीही तुम्ही उच्चारीले शब्द नाही उचित यास्थळी... श्री रामांसारखा नाही योद्धा या त्रिखंडातही.. एका क्षणी करतील धनूभंग ते माझे पूर्णप्रतापी स्वामी.. तत्क्षणी विश्वामित्र करीती आ...

राम व चंद्र

 दुडूदूडू धावत आला राम सज्जात कौसल्येपाशी, म्हणे हे गोल खेळणे आणून दे मजला खेळायासी...   हसून बोलली कौसल्यामाई,अरे अवकाशीचा राजा चंद्रमा खाली कसा येई?... राम सावळा धीट आग्रही म्हणे हवाच मजसी खेळायासी  दे आणून तू माई... म्हणे कौसल्या दशरथासी कसे समजवावे लेकरासी, आणून द्या म्हणतो चंद्रमा मजला खेळायासी दशरथासवे सारेच गुंगले काय करावे यासी? रात्र हळूहळू पुढे सरकली तरी न उत्तर सापडे त्यांसी.. मग हळूच कौसल्या घेऊन येई जलपात्र मोठे रामापाशी.. मग प्रतिबिंब पडले त्यात शशीचे, खूदकन हसले बाळ चिमुकले अहा!! किती सुंदर माझे खेळणे   आले मजपाशी, हसूनी कौसल्या-दशरथ पाही रामलीला  ती न्यारी....
 राम व खारूताईची गोष्ट हनुमंताची वानरसेना करत होती जयघोष  मुखे म्हणती आणि लिहीती पाषाणी श्री राम ...      करती तयार रामसेतू पोहोचावया लंकेपाशी... प्रभू श्रीराम दुरूनी बघती हे दृश्य प्रेमभरे एकांती.. तिथूनी त्यांना दिसले एक  नवलचित्र वेगळे.. एक छोटी खारू लोळते वाळूपाशी सारखी... मग लगबगीने जाते परत परत सेतूपाशी... तिथे जाऊन अंग झटकते करी येरझार सारखी... कळू न शकले तिचे खेळ ते राम तिला पाहती... मग वानरास म्हणती पूस जा तिजला का करते ती असे सारखे... वानर तिजला घेऊन आला प्रभूरामरायापाशी... घाबरून ती पहात राही प्रभू श्री रामरायाशी.... ती म्हणाली म्हणे माझीही इच्छा रामसेतू बांधायाची... परंतू नाही अंगी शक्ती मजला वानरसेनेची... परंतू इच्छा तुझ्या सेवेची करावी असे वाटते.. कण कण वाळूचा गोळा करूनी सेतूपाशी टाकते... ऐकून तियेचे वचन भाबडे राम नेत्र पाणावती... घेऊन तिजला जवळी आपुल्या  राम तिला गोंजारती... तिच्या पाठीवर तीन बोटे उमटती सावळी सावळी.... देऊनी बक्षिस तिच्या सेवेचे जन आजही बघती... खारूताईचा वाटा म्हणती आजही लोकं सारी... रामायण हे सार सांगते ठेवा निष्ठा कार्...
 चारोळी #झेप - सौ.स्वरूपा कुलकर्णी झेप तूझी उंच अवकाशी नको विसरू धरती आई तुझे विचार भेदती क्षितीज परी स्मरण ठेव जुनी नाती

Homemaker की Housewife?

 Homemaker की Housewife? 🌷-सौ.स्वरूपा कुलकर्णी        कालच एक मुलाखत ऐकली मधूरा वेलणकरची.त्यात तीला प्रश्न विचारला होता की, होममेकर व हाऊसवाईफ मधला फरक काय किंवा त्यांची व्याख्या काय? तीने खूप सुंदर उत्तर त्यात दिलं की हाऊसवाईफ ही घरात राहून घरातली कामं करणारी स्त्री असते.तर होममेकर ही स्त्रीही असू शकते किंवा पुरूषही.म्हणजे घराचा आधारस्तंभ किंवा घराला आर्थिकदृष्ट्या किंवा एकंदरीतच घर उभं करणारी किंवा करणारा स्त्री किंवा पुरूष हा होममेकर असतो.मला पटलं की होममेकर पुरूषही असतो किंवा स्त्रीही असू शकते.       आपल्या समाजात आज स्त्रीयांच्या समस्या पूर्णपणे गेल्या किंवा वाढल्या हा माझा मुद्दा नाही.पण स्त्री ज्या वेगाने सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे त्यावेगात पुरूषांनी फक्त घर सांभाळण्याकडे ओढा कमी दिसतो.म्हणजे माझा मुद्दा हाच की वर्षानुवर्षे पुरूषांनी घराबाहेर जाऊन नोकरी धंदा करावा व स्त्रीयांनी घरकाम करत आयुष्य कंठावं ही आपली जुनी रीत होती.पण काळानुसार पुरूषी वर्चस्वातून सुटून स्त्री ही मुक्त होऊ पहातीये.तीला तिचं अस्तित्व हवंय.तीही मन, बुद्धी विच...

आषाढी वारी

  ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी     पांडूरंगाच्या भेटीची अनावर ओढ मनी घेऊन "ज्ञानोबा- तुकाराम" च्या गजरात प्रत्येक वारकरी पंढरीची वाट चालत असतो..तिथे गेल्यावर पांडूरंगाला कडकडून भेटावं असं स्वप्न उरी घेऊन हा वारकरी संसाराला काही क्षण विसरतो नी फक्त पांडूरंगाचे स्मरण ठेवून सर्व भार त्याच्या माथी देऊन आनंदाच्या कारंजात नहात रहातो..विठ्ठल भेटावा ही आस मनी ठेवलेली, चंद्रभागेचं स्नान करून शुचिर्भूत होण्यासाठी मन तळमळत असतं..मनी वर्षभर पाहीलेली विठूच्या दर्शनाची वाट आता पूरी होणार असते.. देहाला होणारे श्रम, ऊन,पाऊस, गरमी यांना न जुमानता वारकरी प्रवास करत रहातो..देह विठ्ठलाच्या भेटीसाठी आसावला तसे मनही तळमळत असते..त्यात कोणताही खोटा नाटकी भाव नाही की खोटा दिखावा नाही..तन मन त्या विठूरायाच्या चरणी विलीन होण्याचीच वाट पहात रहाते..मैलन् मैल प्रवास होतो व अखेर कळसाला पाहून जयघोष निनादतो..         पुंडलीक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम..पंढरीनाथ महाराज की जय....विठ्ठल , विठ्ठल जय हरी विठ्ठल  अशा टाळ चपळ्यांच्या नादात गर्दीत आनंदतरंग तयार होतात..जयघोषाने परीस...
 शब्दावाचून कळले सारे... ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी                  अनुराधा त्या खिडकीजवळ एकटीच उभी होती.रेडीओवर 'शब्दावाचून कळले सारे,शब्दांच्या पलिकडले...ह्या गीताचे शब्द त्या खोलीभर ऐकू येऊ लागले..तीच्या डोळ्यासमोर सहा महिन्यापूर्वी घडलेले प्रसंग क्षणात तरळून गेले..त्या गाण्याच्या प्रत्येक शब्दावर तीचे मन विदिर्ण झाले व नकळत डोळ्यातून अखंड अश्रू झरू लागले.         तिला विनयची व तीची पहिली भेट आठवली..तो तिच्या ऑफिसमध्ये आधीपासूनच कामावर होता.तीच सहा महिन्यांपूर्वी तिथे रूजू झाली होती.अनुराधा मुळातच दिसायला देखणी, अगदी चारचौघीत उठून दिसेल अशीच!...तोही तसाच उंचपूरा, सावळा नी शांत स्वभावाचा..ऑफिसमध्ये त्याची व तिची केबिन तशी लांब ,पण दोघेही एकमेकांना दिसू शकत होते..तीचा रोजचा पेहराव अतिशय सुंदर व तिला साजेसा असाच असे..पंजाबी ड्रेस तेही हलक्या, फिकट रंगाचे तसेच कॉटनच्या साड्या त्यावर हलका मेकअप यासगळ्यामूळे तिचं मूळचं सौंदर्य अधिकच खूलून दिसायचं..तोही तितकाच कौशल्याने आपला पेहराव ठेवायचा व ऑफिसमधल्या सगळ्या मुलींचा लाडका ह...
 माझी झोप😄🤪 ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी काल उशीरा रात्री झोप आली.... उशी डोक्यावर ठेवली.... अंगाखाली पांघरून घेतले.. गाढ झोप लागली..... सकाळी जाग उशीरा आली.... झोपेत डोळे मावत नव्हते..... दाता समोर आरसा घासला..... पेस्टवर ब्रश होताच! भराभरा पाणी घेतले.... मस्त फ्रेश वाटले.... बशीतून कपात चहा फुर्रकन घेतला.... झोप थोडी गेली.... मग काय नाश्ता बनवला.... पाण्यात पोहे भिजवले..... पोह्यात कढई घातली.... चांगले हलवले.... मग गरम गरम लोणच्यासोबत गार गार  पोहे खाल्ले.... मग आंघोळ केली... पाण्याने अंग घासले.... साबण पडतच होती.... ओले कपडे घातले... मग भूक लागली... स्वयंपाक केला..... पाण्यात कणिक भिजवली...... पोळीवर तवा भाजला..... गरम गरम तवा  व भांडी खाल्ली.... मग केंव्हातरी दुपारी रात्र झाली व मी झोपले....  आता खरी काय मजा आली सांगू मी खरीखूरी झोपेतून जागे झाले...🤪पहाते तर काय अजून सूर्य उगवायचा होता व मी मात्र स्वप्नाच रममाण झाले होते.. झोप भन्नाटच म्हणायची!😄😄

चारोळ्या

 शब्द चारोळ्या उपक्रम -सौ.स्वरूपा कुलकर्णी १.स्वप्न            स्वप्नीचे सूख पाहिले मी डोळा            करकटावरी ठेवूनी उभा साजिरा            कळेना कोणत्या जन्मीचे हे पूण्य            कवळीला विठू प्राणसखा माझा २.सत्य             जग हे असे नाशवंत सारे             दिसे भासते ते मिथ्याच अवघे             नसे सत्य बाळा त्यात कोणतेही            असे ईश्वराची माया ही सारी ३.वाट             वाटेत आला अवचित सख्यारे             काळजात नाचले मयुर तत्क्षणी हे             मी संकोचूनी लाजले तूला पाहूनी अन्             तू उभा हाती घेऊन मेघ वर्षाऋतूचे            ४.दुःख              ...
 #निद्रादेवी  - सौ.स्वरूपा कुलकर्णी काल रात्री झोपतांना अंगावरून पांघरून घेतले.. तेव्हड्यात रातकीडे ओरडण्याचा आवाज आला.... मी हळूचकन् खिडकीतून बाहेर डोकावले.. अय्या, बाहेर मस्त चंद्र-चांदण्यांची मैफिल रंगली होती.. मी हसून त्यांना शुभ रात्री केले.. मग निद्रादेवीची आराधना केली... पण छे! आज काही ती लवकर प्रसन्न होईना... या कुशीवरून त्या कुशीवर..छे! डोळा काही लागेना.. अम्म.. काय करू काय करू... मग ठरवले मोबाईल बघावा... पण किती वेळ बघणार? तोही  मला पाहून बोअर झाला... शी बाई..आता काय करू, काय करू??..मग ठरवलं आकाशातल्या चांदण्या मोजूयात😄 मोजतांना कळलं आपली आकडेमोड फारच चुकतिये😄..आकाशातले तारे व अकलेचे तारे सेम सेम तोडतोय असं वाटलं😁 छे बाबा, हे काही आपलं काम नाही.. मग आठवलं १२ वी सायन्सला   रात्री अभ्यास करतांना पुस्तकं हातात घेतली की गाढ झोप यायची..तोच पर्याय आताही कामी येतो का म्हणून एक जाडजूड ग्रंथ हातात घेतला.. नी काय सांगू मैत्रिणींनो,  ग्रंथाची प्रस्तावना वाचताच माझ्यावर निद्रादेवी प्रसन्न झाली... डायरेक्ट सकाळीच जाग आली... मस्त फ्रेश वाटलं... एकूणच काय स्व...
 गुलमोहर ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी      भिशी संपवून अपर्णा ताईला  सोडायला तिच्या घरी निघाले.तीला माझ्या गाडीवरून घेऊन जातांना मस्त हवा सुटली होती.संध्याकाळची ती वेळ खूप बरं वाटत होतं.ती बोलता बोलता सहजच म्हणाली,"ह्या गुलमोहरावरती लिही नं गं स्वरूपा, भर उन्हाळ्यातही किती बहरलेला असतो..तू छान लिहितेस म्हणून म्हणतीये" तिचे शब्द मला एकदम थंड झुळूकीसारखे वाटले.कारण त्यात माझ्या लिखानाचं कौतूक होतंच पण मला ती गुलमोहरावर लिहायला सांगत होती म्हणूनही!तिला माहीत नव्हतं माझं लाडकं झाड गुलमोहर आहे ते!          भर उन्हाळ्यात रखरखीत डांबरी रस्त्यावरून चालतांना आपण सावलीच्या शोधात असतो.सावली म्हंटलं की झाडं शोधतो.खरंय झाडांच्या परोपकारी वृत्तीचं द्योतक हेच की ती स्वतः उन्हात थांबतात पण आपल्याला सावली देतात. दूरदूरपर्यंत जर झाडंच न दिसता नुसत्या कॉंन्क्रीटच्या इमारती पाहील्या की माझं मन कासावीस होतं.ऊन मी म्हणत असतांना सावलीच मिळाली नाही तर वैतागण्याशिवाय पर्याय नसतो.नुसत्या घामाच्या धारा.चालता चालता पुढं गेल्यावर अचानक एक लाल केशरी साज चढवलेला, वाऱ्याच्या...
 ....बस्स हरदम तेरा साथ रहे। - सौ.स्वरूपा कुलकर्णी           दिवसा सुर्य तर रात्री चंद्र असतो आपल्या साथीला...खरं तर हे ब्रह्मांडं तसं पाहिलं तर पूर्ण काळंशार पण यात चमकणाऱ्या ताऱ्यांनी,चांदण्यांनी व ग्रहांनी अवकाशाच्या ह्या भव्य पोकळीला रंग रूप दिले...बघा नं आपला दिवस असतो सूर्यनारायणामूळे व सूर्यास्तानंतर रात्र येते ती चंद्र तारकांच्या मैफिलीने सजलेली..ही सगळी मंडळी नसती तर कल्पना करा जग किती निरस असतं...माणसाच्या जन्मानंतर या भव्य सृष्टीला 'पहाणारा ' कोणीतरी भेटला..खरं तर इतर सजिव बघतातही पण त्यांना ती दृष्टी नाही ना...जी मनुष्याला आहे!         खरं तर ही सगळी चंद्र-सुर्य-ग्रहगोलांची दुनिया आपल्याला एक संदेश देते..काळ कोणताही असो सोबतीशिवाय मजा नाही..जग सतत बदलत असेलही..रंग, रूपही बदलेल , ते सतत नविन भासेल पण साथ कायम आहे...चंद्र- सुंर्य - तारे सतत आपल्यासमोर निरनिराळ्या ऋतुतही भेटतातच! ही निसर्गाची भव्य करामत तुम्ही आम्ही रोज अनुभवतो पण कधी विचार केलाय आपली वसुंधराही किती सुंदर! नेहमी सुर्याच्या कक्षेत फिरते पण तेही आपल्यासाठीच! ...
 आम्रवेलीतील श्री बाबा🙏 ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी        लेकीला माहेरी जाण्याची जशी ओढ असावी तशी मला बाबांच्या या आम्रवेलीतील दर्शनाची ओढ वाटते.कसं नी काय शब्दबद्ध करावं हे दर्शन..मनाला स्थावर सूख मिळवून देणारं हे बाबांचं स्थान म्हणजे साकुरीचं वैकुंठच आहे जणू! बाबांनी स्वतः तसं सांगितलं सुद्धा! पण खरं सांगू, ही जागा म्हणजे केवळ तिचे श्रेष्ठत्व सांगण्यासाठी नाही बरं का, तर ती आहे अनुभव घेण्याची.या जागेच्या दर्शनात किती नी काय सापडलंय मला हे मी स्वतःसुद्धा कधी मोजू शकले नाही.कारण मिळतं ते केवळ गाढ प्रेम!अनंत, अपार, अलभ्य, अस्फुट,अनिर्वचनिय,आध्यात्मिक,अलौकीक ..शब्दांनाही न सांगता येणारं असं..गोष्टी माणसाच्या कल्पनेतील असतात तोपर्यंत शब्द साथ देतील पण ..पण त्यापलिकडे? ते सुंदर, पवित्र, अत्यंत साधं, तपःपूत, मनाला गाढ शांती देणारं आश्रयस्थान म्हणजे आम्रवेली...मी जितक्या वेळा गेली असेल तितक्या वेळा हा अनुभव घेऊनच वापस येते.परत मायिक जगात येते जणू.तिथे लावलेलं ध्यान किंवा जप हा इतर कुठेही लावलेल्या ध्यानापेक्षा वेगळाच असतो.बाबा अत्यंत वत्सल भावाने आपली वाट पहात असतात..दरव...
 मन मोगरा...      ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी        तशी मी लहानपणापासूनच निसर्गवेडी..फुलं,पानं,झाडं,नद्या यात रमणारी...तितकीच देवभोळी..माझ्या मनाला निसर्ग व देव यात तसा फरक करताच येत नाही..निसर्ग म्हणजे किती रंगवैभवी,सहज,तरल,निरागस!! तसा माझा देवही आहेच ना सुंदर, निरागस, प्रेमळ!! देवाच्या स्वभावाच्या छटाही मला निसर्गातील रंगगंधांसारख्याच वाटतात..अगदी इंद्रधनुष्यासारख्या! सप्तरंगी!!          रात्री  मुलींसोबत बाहेर फिरायला पडलं की कुठूनशी छान झुळूक येते, सोबतच तो दैवी सुगंध घेऊनच!! अहाहा!! मोगरा उमलतोय..त्या हिरव्यागार पानांमध्ये विसावलेल्या अल्लड, निरागस पांढऱ्या शुभ्र कळ्या हलकेच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात..मी क्षणभर रेंगाळते, फुलांपाशी येते व हसते..कारण सांगू? त्या फुलांना घाई उद्याच्या सुर्यनारायण भेटीची..कोवळ्या किरणांचा पसारा धरतीवर पसरला की ही फुलं अधिक टवटवीत व ताजीतवानी होतात..जणू सूर्य त्यांना नवी उर्जा देतो..पण मी मात्र या फुलांची वाट पहाते ते माझ्या देवपूजेसाठी! हो..या स्वर्गिय गंधाच्या फुलांनी माझी पू...
 प्रेममुर्ती- गोदावरी माताजी - सौ.स्वरूपा कुलकर्णी     साकुरीला प्रथम आले तेंव्हा उपासनी बाबा व माताजींकडे लोहचुंबक जसे लोखंडाला खेचते तशी माझी अवस्था झाली.पहिल्यांदा उपासनी बाबांची मूर्ती  पाहिली तेंव्हा ती थोडीशी गंभीर पण तितकीच प्रेमळ आहे याची जाणीव झाली.आणि माताजींना जेंव्हा पाहिलं तेंव्हा तर साक्षात महालक्ष्मीच समोर विराजमान आहे असे जाणवले.ती नुसती मुर्ती नाही तर प्रत्यक्ष माताजींचे अस्तित्वच आहे.किती शालीन, सोज्वळ,प्रसन्न रूप ते! मन तिथेच नतमस्तक झाले.प्रत्यक्ष महालक्ष्मीचे दर्शन करतांना मनात जसे भाव असतील तसे भावतरंग उमटत होते.प्रथमदर्शनीच मनाचा ठाव घेणारी ती मूर्ती जणू आईच्या वत्सलतेने मला न्याहाळत होती.किती किती बोलल्या माताजी माझ्याशी! नुसत्या दर्शनानेच त्रिविध ताप शांत करण्याची शक्ती त्या महामायेत आहे हे समजले.'जगाच्या कल्याणा संतांच्या राशी' हे वाक्य शतशः खरे आहे.जगनियंता स्वतः जाऊ शकत नाही तिथे आपल्या विभूती पाठवून आपले कार्य करून घेतो, हे माताजींना पाहून प्रकर्षाने जाणवले.         माताजींचे नाव गोदावरी, गोदामां...किती सार्थ! गोदावरी ...
 #वसंत ✒सौ.स्वरूपा कुलकर्णी रंग कोवळा पानोपानी चहुकडे नवथर पसरला, हिरव्या पोपटी रंगांचा वसंत हा बहरला... प्रत्येक पानावर पोहोचला सुर्यकिरणांचा हस्तस्पर्श, त्या स्पर्शातुन गवसला रंग कोवळा गंध वेगळा... मोगऱ्याचा गंध ताजा पसरला नाकातून शरीरभर, तनमन पुलकीत झाले प्रणयोत्सूक ऋतू वसंत.... गुलमोहरा लालेलाल रस्ता फुटे भर उन्हात, झाडे उभी शांत शांत झुळूक ती येते पानांत... सकाळचे ऋतुरंग वेगळे दुपार शांत उष्णही सापडे, संध्याराणी मात्र आणते नक्षत्रांचे हसरे देणे.... किमया ही निसर्गाची न्यारी रंग वैभवी शृंगार अभिनव, पानोपानी उतरला मदन ऋतु सुगंधी हा सजला भूवर...
 मन ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला  फिरून येतं पिकांवर किती मार्मिकपणे बहिणाबाईंनी मनाचा करामती स्वभाव ह्या कवितेतून उलगडत नेलाय...विचार केला तर खरंच जाणवेल की आपलं मन कोणी कधी बघितलंय का हो? कधी स्पर्श केलाय त्याला? का कधी त्याची उंची खोली मोजलीये? किती व्यापक व किती खोल ही परिमाणं तर मेंदू ठरवेल तेंव्हा कळतात.पण मन मात्र खरंच न उलगडणारं कोडंच रहातं..ना त्याला रंग रूप ना त्याला कुठले अवयव...न दिसताही स्वतःचे अस्तित्व जाणवून देणारं हे मन म्हणजे अगम्य तरीही मानवाला मिळालेली परमेश्वरी देणगीच!    जरी मन दिसत नसलं तरी त्याचे अस्तित्व कोणताही मनुष्य नाकारू शकत नाही.ते आपल्या सोबत सतत असतं...जन्माला येतो तेंव्हापासून ते मरेपर्यंत साथ देतं...किती सुक्ष्म त्याचं असणं...लहान मुलाचे मन खरंच किती निष्पाप, कोवळं...पटकन बाहेरच जग स्विकारणारं!...तेच तरूणवयात जणू सुरवंटाचं फुलपाखरू झाल्यासारखं चंचल बनतं..किती भाव विभाव त्याला लाभतात...सुंदर,मयुरपंखी कधी इंद्रधनुष्यासारखं ..एकाच पांढऱ्या रंगातून निर्माण झालेले सप्तरंग जसे तसे मनाचे तरूणपणीचे ...
 *उन्हाळ्याची सुट्टी*  कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी शाळेला लागली सुट्टी-बुट्टी, चला खेळू खेळ नवनवीन, नको अभ्यास नको परिक्षा, नाचू बागडू या सगळे या... मोबाईलपासून जरा दूर व्हा, चला मैदानी खेळ खेळूया, कबड्डी,खोखो, लपाछपी, ताजेतवाने राहू नेहमी... आंबे खाऊ रोज पोटभर, लोणची करू चट्टमट्ट, पापड खाऊ तळून भाजून, जेवण करू लोळू तासभर... रोज निजूया गोष्टी ऐकत, चांदोबाची सैर करूनी, गोष्ट चेटकीणीची ऐकू परत, घाबरून झोपू आता लवकर... मग जाऊ मामाच्या गावी, आगिनगाडी धूर सोडी, आजी आजोबांच्या पडू गळ्यात, मस्ती करू भावंडांशी... अशी घालवू सुट्टी-बुट्टी, वाटे संपूच नये कधीही, आठवणीत रहाते मला नेहमी, फिरून यावी ही  सुट्टी- बुट्टी!!
 माझे पालकत्वाचे प्रयोग ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी         काही गोष्टी स्वतः अनुभवल्या व स्वतः केल्या कीच जास्त चांगल्या कळतात, असाच काहीसा हा पालक होण्याचा व मुलींना घडवण्याचा अनुभव!मला दोन्ही मुली..आजच्या काळातील पालकांना आवडणारी व प्रिय गोष्ट म्हणजे तुम्हाला "मुलगी" असणे.पहिली "ओवी" जन्माला आली तेंव्हा नवरा जाम खूश झाला होता.अख्ख्या हॉस्पिटलमध्ये जिलबी वाटली.ओवी जशी जन्मली तेंव्हा फक्त १ सेंकड रडली असेल..आणि दुसऱ्याच क्षणाला आपले मोठ्ठे मोठ्ठे काळेशार डोळे टूकटूक करत आजूबाजूचे जग पाहू लागली..ती जन्मली नी मी हुश्श केलं..कारण माझी ती नॉर्मल डिलीव्हरी...दिवसभर कळा सोसून दुपारी ३.४० ला ती जन्मली..खरं सांगते पण ओवीला घडवतांना फार त्रास कधी झालाच नाही..ती मुळातच समजुतदार,अभ्यासू,शांत...तीला आजारी पडू नये म्हणून मात्र खूप काळजी घ्यावी लागली.एकदा डेंग्यू, एकदा मलेरिया अशा आजारपणातून ती व आम्ही गेलो.तीची लहानपणापासून खूप काळजी घेत आलो..          दुसरी आर्या मात्र तब्येतीने कडक..तीची कधी काळजी नाही वाटली..तिला वाढवतांना एक गोष्ट कळाली की तिच्या अंग...
 जय रघुनंदन जय श्री राम। ✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी        पंडीत भिमसेनजींचं 'राम का गुणगान करीये' ऐका की देवकी पंडीतांचं 'जय रघुनंदन जय  श्री राम' ऐका किंवा 'कौसल्येचा राम बाई' किंवा संपूर्ण गीत रामायणातील कोणतेही गीत ऐका सर्वच गीतं ज्या रामप्रेमाने ओतप्रोत भरलीयेत त्याला तोडंच नाहीये.ही गीते केवळ गीते नाही तर भक्तीप्रेम व्यक्त करणारी, रामरायाला तन्मयतेने आळवणारी स्नेह कवनेच आहेत.ऐकतांना डोळ्यासमोर नकळत तो राम उभा रहातो..कसा होता राम? श्यामल तनू असलेला, ...मोठे मोठे कमळासारखे पाणीदार नेत्र असलेला,....विशाल भालप्रदेश,..... नासिका अतिसरळ,... ओठ तर लाल फुलाच्या दोन पाकळ्या एकमेकांवर ठेवाव्यात तसे सुंदर,... लालसर, पातळ ओठ,....गाल तर लालसर निळे,... कान तर शंखाकृती,...त्यात सुंदर कुंडले,... मस्तकावर सुंदर काळे केस,.... बाकी शरीराची वर्णने ही तर शब्दातीत, ...हातात धनुष्य बाण घेऊन सदैव भक्तरक्षणासाठी सज्ज असा माझा राम,... हात आजानुभूज, ...छाती भरदार व विशाल, ...अंगावर सुंदर गुलाबी उत्तरीय,...गळ्यात सुंदर सोन्याचे अलंकार, ...बाहू पिळदार,... अंगकांती निळसर सुंदर,... कमर...
  सौ.स्वरूपा कुलकर्णी रंगात रंग तो श्यामरंग मी पाहण्यासी आतुरले भिजलेल्या राधेची अवस्था कुणासही ना कळे कोठूनी आला कुठे लपला झाला दृष्टीआड क्षणातही मी बावरी राधा पहाते रंग चहुकडे श्याम नाही तो दिसला परत अचानक घेऊनी हाती रंग कोरडे क्षणात आला जवळी माझ्या डोळे भिडले परस्परांचे मी पाही श्याम एकटक तोही हसरा उभा तटस्थ डोळे बोलती मन्मथ साजिरे क्षण साधाया आतुर झाले रंगात बुडवूनी मज एकलीला झाला अदृश्य अचानक गेला मी उभी रंगाने भिजली उरला मनी श्यामरंग गहिरा
 'तस्मैश्री गुरवे नमः। ' ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी "गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय । बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥"      - संत कबीरांची ही वचने बर्याच जणांना माहीत असतील. याचा अर्थ गुरू व प्रत्यक्ष परमेश्वर अर्थात गोविंद जर एकाच वेळी समोर उभे राहिले तर प्रथम कोणाला वंदन करणार? मी तर गुरूंनाच वंदन करेन कारण तेच मला परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता दाखवतात. किती सुंदर ही वचने ज्यात गुरूभक्तीचे महत्त्व सहज शब्दात सांगितले आहे. गुरू या शब्दाचा अर्थ होतो अंधःकार दूर करणारा, जो आपल्या अंतःकरणातला अज्ञानाचा अंधःकार दूर करतो तो गुरू असतो. लौकिक व्यावहारात गुरू आपण करतो. म्हणजे शाळेत जातो मग शिक्षक असतात ते आपले व्यावहारातले गुरू, परंतु, अध्यात्माच्या प्रांतात गुरू कधी केला जात नाही. तो होतो. ही होण्याची प्रक्रिया प्रत्येक गुरू स्वतः साधकाच्या आयुष्यात येऊन करतो. म्हणजेच स्वतः शिष्याला अनुग्रहित करतो. त्यासाठी शिष्याला कुठेही भरकटत जायची गरज नसते. ही खरी गुरूपरंपरा. अध्यात्मात साधकाला मुक्तीच्या दिशेने नेणार्या गुरूला "सद्गुरू " असे संबोधन वापरले जाते.कारण...
 "गणपती बाप्पा मोरया" ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी  वक्रतुंड महाकाय । सुर्यकोटी समप्रभ।  निर्विघ्नं कुरूमे देव।सर्वकार्येषु सर्वदा।।         सर्व कार्यांची सुमंगल सुरूवात गणेशाच्या प्रतिष्ठापनेने होते. या मंगलमूर्तीच्या पुजनाने मन प्रसन्न होते, सर्व मनोकामना पूर्ण होतात. भक्तांचे लाडके दैवत म्हणजे गणपती. वेदांनी या गणेशाला ओंकाररूपात पाहिले. म्हणजे या जगाची सुरूवातच गणेशापासून होते असे त्यात म्हंटले आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवात करतांना  ज्ञानेश्वरांनीही याच मंगलमूर्तीची विनवणी केली आहे.प्रत्येक ग्रंथाची सुरूवात ह्याच मोरयाला स्मरून होते. याचे प्रमुख कारण ही सकल सिद्धींची, कलांची देवता आहे. गजाननाला आधी वंदन म्हणजे १४ विद्या, ६४ कलांना वंदन. या कलांना विद्यांना प्राप्त करून घ्यावयाचे असल्यास गजाननाची उपासना अत्यंत मोलाची आहे. हा सकल विद्यांचा, कलांचा स्वामी मनापासून केलेल्या उपासनेला तत्काळ फळ देतो. त्यामुळे तो भक्तप्रिय, भक्तवत्सल देव आहे.       गणेश म्हणजे गणांचा स्वामी, समस्त प्राणीवर्गाचा स्वामी. त्याचेच नाव गजानन, म्हणजे हत्त...
 🌷नमस्तेस्तु  भगवती सरस्वती🌷     ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी         या कुन्देन्दुतुषार हार धवला।  या शुभ्र वस्त्रान्विता।  या विणावरदण्डमन्डीतकरा।  या श्वेतपद्मासना।  या ब्रम्हाच्युतशंकरप्रभुतिभि्र देवै सदा वन्दिता।  सा मां पातु सरस्वती भगवती।  निशेष जाड्या पहा।।         शुभ्र वसने धारण केलेली,  चतु्रभूजा असलेली,एका हातात वेद, दुसऱ्या हातात स्फटिकांची माळ ,पुढील दोन्ही हात विणा वाजवण्यासाठी घेतलेले.. पाठीवर सुंदर मऊ केस रूळणारे, चेहर्यावर सुंदर स्मितहास्य, भाळी कुंकवाचा टिळा... अतिशय सुंदर गौर वर्ण देह, शुभ्र कमळावर बसलेली माता भगवती देवी सरस्वती ही वेदांची जननी आहे.. ही वेदमाता शब्दांना, सुरांना, वाणीला प्रसवते.. सरस्वतीचा कृपाप्रसाद असल्याशिवाय वाणी शब्दांना जन्म देऊ शकत नाही... लेखनी शब्दांना उमटवू शकत नाही.. जगाचे शाब्दिक व्यावहारही होऊ शकत नाहीत... नवनवोन्मेशषालिनी बुद्धीही आपले कार्य करू शकत नाही... अशी ही भगवती सरस्वती नित्य भक्तांना अभय देते....          दे...