आषाढी वारी
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
पांडूरंगाच्या भेटीची अनावर ओढ मनी घेऊन "ज्ञानोबा- तुकाराम" च्या गजरात प्रत्येक वारकरी पंढरीची वाट चालत असतो..तिथे गेल्यावर पांडूरंगाला कडकडून भेटावं असं स्वप्न उरी घेऊन हा वारकरी संसाराला काही क्षण विसरतो नी फक्त पांडूरंगाचे स्मरण ठेवून सर्व भार त्याच्या माथी देऊन आनंदाच्या कारंजात नहात रहातो..विठ्ठल भेटावा ही आस मनी ठेवलेली, चंद्रभागेचं स्नान करून शुचिर्भूत होण्यासाठी मन तळमळत असतं..मनी वर्षभर पाहीलेली विठूच्या दर्शनाची वाट आता पूरी होणार असते.. देहाला होणारे श्रम, ऊन,पाऊस, गरमी यांना न जुमानता वारकरी प्रवास करत रहातो..देह विठ्ठलाच्या भेटीसाठी आसावला तसे मनही तळमळत असते..त्यात कोणताही खोटा नाटकी भाव नाही की खोटा दिखावा नाही..तन मन त्या विठूरायाच्या चरणी विलीन होण्याचीच वाट पहात रहाते..मैलन् मैल प्रवास होतो व अखेर कळसाला पाहून जयघोष निनादतो..
पुंडलीक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम..पंढरीनाथ महाराज की जय....विठ्ठल , विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा टाळ चपळ्यांच्या नादात गर्दीत आनंदतरंग तयार होतात..जयघोषाने परीसर दुमदूमतो..आनंदलहरी उसळू लागतात..भोवतीचा जनसागर विसरून प्रत्येक वारकरी विठूशी मनाने एकरूप होतो..पांडूरंग, पांडूरंग...अखेर अथक परिश्रमानंतर गरूडखांब दिसायला लागतो..मग विठूच्या गाभाऱ्यात प्रवेश होतो...तिथे आलेला प्रत्येक जण मनाने फार पुर्वीच तिथे पोहोचलेला असतो..विठ्ठल कर कटेवर ठेऊन युगायुगांपासून त्या विटेवर वाट पहात उभा पाहून मन सद्गतीत होते..ज्याच्या भेटीसाठी जीव आसावला तो समोर पाहून डोळे भरून वहायला लागतात..जगाचा पालन पोषण करता विठ्ठल हा बाप असला तरी त्याच्या लेकरांसाठी ती विठूमाऊलीच असते ..लेक जणू अनेक दिवसांनी माहेरी यावी तशी पांडूरंगाचीही अवस्था झालेली असते...तोही आपली तेव्हड्याच ओढीने वाट पहात असतो..त्याची मूर्ती विलक्षण भारावलेली, नित्यापेक्षा अधिक प्रसन्न भासते ..
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद...ही ओळ आठवते...
विठू माझा लेकूरवाळा, संगे गोपाळांचा मेळा..
गाभाऱ्यात दुथडी भरून वाहणारे ते चैतन्य आपण मनात साठवत रहातो...विठ्ठलाची सावळी सुंदर मूर्ती आज अधिकच सुंदर दिसत रहाते...डोळ्यांचे पारणे फिटतात..गाभाऱ्यात विठ्ठलाला केलेल्या चंदन उटीचा लेप आपला सुगंध देत रहातो...मन प्रसन्न होते..फुलांची,तुळशीमंजीरीची दाटीवाटी झालेली असते..बुक्का लावून ध्यानस्त उभा पांडूरंग म्हणजे अवघ्या जगाचे आराध्य दैवत...कितीही वेळ उभे राहून त्याला पाहिले तरी परत परत पहायची ओढ कमी होत नाही ...तो समोर साक्षात उभा आहे हे त्या भेटीत प्रत्येकाला जाणवते..आज वैकुंठच जणू पंढरीत वसतीला आले असा हा भूलोकीचा सोहळा..विठ्ठल जगजेठी भेटावा उराउरी याहून अन्य काय हवे माऊली...बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम...पंढरीनाथ महाराज की जय।
तळटीप- मी स्वतः आषाढी वारी कधी केली नाही पण वारी करणाऱ्यांच्या डोळ्यात हे सर्व वाचले आहे🙏🏻
Comments
Post a Comment