श्रावण💚
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
काही गोष्टींचा, रंगांचा आपल्या मनावर विशेष प्रभाव असतो. जसे पावसाचे पाणी, हिरवा निसर्ग, चंद्र- चांदणे, ओल्या मातीचा सुवास, विविध सुगंधी फुलांचे गंध..कधी कधी या गंधांसोबत मनात चिटकलेली गोष्ट किंवा प्रसंग..निसर्गातील विविध रंगसंगती आपल्या मनाला कधी उत्साह देतात,उर्जा देतात तर कधी संध्याछाया भिवविती ह्रदया असाही अनुभव देतात.पण खरं सांगू हे जगणं सुसह्य होतं या रंगांमुळे निसर्गातल्या संगीतामुळे..हे रंग उमटतात निसर्गचक्रामूळे...त्याच्या अनोख्या कार्यकुशलतेने..
काही महिने असेच अनोखे..निसर्गाच्या भव्य पटलावर एक एक नक्षी अशा काही रेखाटतात की मानवी मन व त्याच्या अनुभव विश्वाला खूप सुखद अनुभव देतात..समृद्ध करतात..त्या निसर्ग सोहळ्यातून प्रसवलेली गाणी,कविता,कथा, गीत, संगित मानवी जन्माची श्रीमंती वाढवतात..हे समृद्ध जगणं परमेश्वराची कृपाच आहे..
अवखळ दरीखोऱ्यातून वाहणारे पाणी जेंव्हा अधिकच वेगवान वहाते...जेंव्हा धरतीवर ओल्या नक्षी सतत पडायला लागतात..जेंव्हा वारा आपल्याच तोऱ्यात गाणी गाऊ लागतो,जेंव्हा निसर्गाला हिरवाकंच शालू पांघरला जातो..,जेंव्हा पावसाला मनमुक्त बरसावं वाटतं...तेंव्हा श्रावण आला हे गुपित उलगडतं...मन पावसाळी होऊन जातं, कविताही करू लागतं...मन हिरवंगार मयुरपिसासारखं रंगवैभवी होऊन पठारावर नाचायला लागतं..प्रियाच्या ओढिनं कासाविस होतं..मानवी मन इतर जीवजंतू स्वच्छंदी होऊन आपल्याच तालात नाचू गाऊ लागतात असा हा श्रावण..निसर्गाच्या गाभाऱ्यात धूप दिपांचा घमघमाट करणारा देवभोळा महिना म्हणजे श्रावण..षोडष वर्षीय तरूणीने आपले मुक्त केश धरतीवर सोडून जणू मनमूक्त झोके घ्यावे तसा हा श्रावण...एकाच ऋतुचे किती भावविभाव...मनातील चैतन्याच्या गाभाऱ्याला उजळवणारा हा मास किती मनामनांची तृषा भागवतो..किती जिवांची तहान भागवतो...ह्रदय भरून मनमुक्त आयुष्य जगायला खाद्य पुरवणारा हा श्रावणसोहळा शंकराच्या पिंडीवरल्या बिल्वदलांसारखाच मला भासतो..तितकाच शुचिर्भूत,तितकाच पवित्र, तितकाच भक्तीश्रीमंत,तितकाच तेजस्वी,तितकाच कोवळा व टवटवित..जणू संपूर्ण सृष्टीचे मांगल्य लेवून मंदिरात पूजा करायला आलेल्या सौभाग्यवतीचे कुंकूम लेणं म्हणजे श्रावण..नित्य झरणाऱ्या पानातून अवखळ,उनाड,भिरभिरत तसेच उनपावसाचे पदन्यास करत सजिवत्वाचे दान मिळवलेला श्रावण ही मानवी जगाची सुंदर कविताच आहे..माहेरची ओढ असलेला हा,बहिण भावात रमणारा,कृष्णाच्या नटखट लीलांनी भरलेला, नागपंचमीचे झोके घेणारा, सोमवारी शिवालयात गर्दी करणारा,मंगळागौरीत रात्र जागवून गौरीला सौभाग्य मागणारा भक्तीमय श्रावण ही खरी निसर्गाची ह्रद्य ठेव..फक्त मनुष्यच नाही तर प्रत्येक सजीव- निर्जीव घटक ह्यात भिजून चिंब ओला होतो..निसर्ग सृजनशील कवी बनतो, माती सुगंधीत होते, आभाळ गाणे गाते..कोरड्या जगात नवसंजीवनी येते..
खरंच हा हिरवा सृजनोत्सव सर्वांसाठीच सुखसोहळाच आहे..निसर्गराजाच्या मुकूटावरचा मयुरपिच्छच आहे...
Comments
Post a Comment