घरचे लग्न


#_विवाह_शृंखला

साहित्य प्रकार - संवाद लेखन

विषय - घरचे लग्न ( लगीन घाई)

लेखिका - सौ.स्वरूपा कुलकर्णी

                          


    (  होणारी वधू- साक्षी, होणारा वर- सौरभ, वराची आई- माधवी, वराचे बाबा- मुकूंद)


मुलाकडील लग्नाघरचा संवाद...


माधवी-  अहो, साक्षी फारच सुंदर होती नै साखरपूड्यात...बघता बघता एकच आठवडा राहीला हो लग्नाला...मी तर फार उत्सूक आहे तिला नववधूच्या वेशात पहायला..


मुकूंद- अगं हो हो, जरा श्वास घेशिल बोलतांना...(हसून) खरंय तुझं सौरभला अगदी सुंदर, सुशिल बायको मिळणारे...भाग्यवान तो व आपणही...


माधवी- तुम्हाला सांगते, सुनेसाठी आईंच्या पाटल्या व कुड्या जपून ठेवल्यात इतके वर्ष..मी माझ्या लग्नात त्या घातल्या..आता साक्षीला देईन..म्हणजे एक मोठी जबाबदारी पूर्ण होईल माझी..


मुकूंद- हो नक्की..पण खरं सांग तीला आवडतील नं त्या जुन्या डिझाईन?..हल्लीच्या मुली फारच मॉडर्न विचारांच्या आहेत..त्यांची आवडनिवड वेगळीच..सौरभशी बोललीस का?


माधवी- अहो, हा मुद्दा तर माझ्या डोक्यात आलाच नाही हो..किती मी वेंधळी..थांबा सौरभलाच बोलावते..सौरभ, ए सौरभ..(माधवी सौरभला हॉलमध्ये बोलावते.)


सौरभ-  (सौरभ, एका हातात मोबाईल घेऊन प्रवेशतो)

       काय गं आई, काय झालं?


माधवी- अरे बेटा , बाबांना व मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय..


सौरभ- बोला नं..


माधवी- सौरभ, अरे मी माझे सासूबाईंनी मला माझ्या लग्नात घातलेल्या सोन्याच्या पाटल्या व कुड्या साक्षीला देईन म्हणतेय ..


सौरभ- हो का...मग चांगलच्चे ना.


माधवी- हो रे बेटा, पण तीला त्याचे डिझाईन आवडले नाही तर?


सौरभ- आई, तू हा विचार नको करूस.मला खात्री आहे ती खूप खूश होईल दागिने बघून..


माधवी- अरे पण समजा ती नाही म्हणाली तर..


सौरभ- आई, एक काम करतो, तिला व्हिडीओ कॉल करतो किंवा घरीच बोलवायचं का आपण?


मुकूंद- तिला घरी बोलावणे ही उत्तम आयडिया आहे..म्हणजे एका दगडात दोन पक्षी, हो की नाही रे सौरभ बेटा?(मुकूंदने हसत हसत सौरभला कोपरखळी मारली)


सौरभ(लाजून)- काय हो बाबा तुम्ही..मी तर तुमचं काम सोप्प करतोय तर तुम्ही मलाच कोपरखळ्या मारताय.


माधवी- काय हो हे, सौरभ , हे बघ आज संध्याकाळी तीला घरी घेऊन ये..मला बोलायचंय तिच्याशी...


सौरभ- ( येस्स म्हणून पटकन जीभ चावून आपल्या रूमकडे पळाला)


मुकूंद व माधवी  खळखळून हसले.

संध्याकाळी साक्षीला घेऊन सौरभ दरवाज्यात पोहोचतो..माधवी दोघांना आत घेते..


माधवी- (गंभीरपणे)साक्षी, ये तुझीच वाट पहात होतो..

 मुकूंद-(हळू आवाजात)सौरभ, तू बोललास ना साक्षीशी सगळं व्यावस्थित..

सौरभ- आई-बाबा, काही गंभीर झालंय का? तुम्ही इतके टेंशनमध्ये का?

माधवी-(गंभीरपणे) काही नाही.मला साक्षीशी महत्वाचं बोलायचंय..


वातावरण गंभीर झालं.सौरभ काकूळतीला येऊन एकदा आई व एकदा बाबांकडे पाहू लागला.त्याच्या मनात नाना विचार येऊ लागले.एक तर साक्षी त्याला जोडीदार म्हणून खूप आवडली होती.त्यामुळे वातावरण गरम पाहून तो

 मनातून घाबरून गेला...


 सौरभ- आई- बाबा काय झालं , तुम्ही साक्षीवर चिडलाय का? की माझा राग आलाय..असे गंभीर का?


मुकूंद- त्याचं काये बेटा काही गोष्टी ह्या लग्नाआधीच स्पष्ट केलेल्या बऱ्या..


माधवी- हो मलाही ते पटलंय...


आता मात्र सौरभ रडकुंडिला आला..

सौरभ- अहो बाबा पण पटकन सांगा ना काय झालं ..मी जाम टेंशनमध्ये आलोय..


माधवी-(रागावून) साक्षी, तूला पाटल्या आवडल्या नाहीत हे मी तुझं दुर्दैव समजते...


साक्षी- (बेफिकीरपणे)काकू, मी इतक्या ओल्ड फॅशन्ड ज्वेलरी घालत नाही...तुम्ही नविन ज्वेलरी का नाही बघत...

साक्षीचे बोलणे ऐकून सौरभच्या पायाखालची जमीनच सरकली..इतके दिवस तो तीला फार साधी सोज्वळ समजत होता.पण ज्याप्रकारे तीने दागिन्यांना नकार दिला  तो हबकलाच...

तरी पण तोल राखत तो आईची समजूत घालू लागला..


माधवी- हे बघ सौरभ, ती जर दागिने घालणार नसेल तर हे लग्न मोडलंच म्हणून समजा..


आता मात्र सौरभचे इंडिकेटर लागले..त्याला मनःस्ताप झाला...देवा हे माझ्यासोबतच का?


सौरभ- साक्षी, तू का समजून घेत नाहीयेस नी आई तू तरी समजून घे..


सौरभ अक्षरक्ष:  दोघिंना गयावया करू लागला...


त्यावर साक्षी रूसून बसली..माधवीही फुगली..

मुकूंद मात्र न रहावून खो खो हसत सुटला...


सौरभ चक्रावून बघत बसला..तेव्हड्यात साक्षी नी आई ही एकमेकांकडे पाहून हसू लागले..


माधवी- अरे वेड्या आम्ही तुझी मजा घेत होतो..


मुकूंद- अरे आम्हीच तिघांनी दुपारी हा प्लॅन केला..साक्षीला आमच्यात घेतलं..ती तयार होत नव्हती पण मीच तिला सांगितलं सौरभला समजावण्याची जबाबदारी माझी..


सौरभ- काय?..म्हणजे हा सगळा ड्रामा होता तर...बापरे मी तर हादरलोच...


माधवी- अरे वेड्या मी तीला दुपारीच दागिने फोनवर दाखवले व तीलाही ते खूप आवडलेत..तुझी बायको तयारे लग्नात घालायला...


सौरभ- साक्षी,अगं तू तरी सांगायचंस ना मला, मी किती घाबरलो तूझा अवतार बघून..


साक्षी- सॉरी सौरभ, तूला त्रास द्यायची ही आयडिया बाबांची..मी फक्त प्रतिसाद दिला..मनापासून सॉरी ..


सौरभ- म्हणजे लग्नाआधीच मला तुमच्या पार्टितून कटाप केलंय तुम्ही लोकांनी..Not fair


मुकूंद- अरे तूझी जरा गम्मत केली रे..तू तर लग्नाआधीच सासू सुनांमध्ये वाटला गेलास बाळा..पुढे कसं होणार तुझं...


सौरभ- काय हो बाबा, किती खेचता माझी...पण बाबा खरं सांगा तुम्ही पण आईला घाबरता ना आजही??


मुकूंद- अरे बेटा, माझी अवस्था लग्नापुर्वी व  आजही त्या शिकाऱ्यासारखीये जो शिकार करण्याआधीच शिकार होतो..जसा मी तसाच तू माझा लेक..


हे ऐकून सगळे खोखो हसू लागले..साक्षी लाजून चूर झाली व सौरभ साक्षीला बघतच राहिला..


अरे, खरंच की "शिकारी शिकार करायच्या आधीच स्वतःच शिकार झाला"...


थोड्याच दिवसात हे लग्न धुमधडाक्यात पार पडले..साक्षी सौरभची झाली..सर्वांनी आशिर्वाद दिले, नांदा सौख्य भरे!!

Comments

Popular posts from this blog