भक्ती
#
लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी
प्रेमातून भक्ती निर्माण होते की भक्तीतून प्रेम निर्माण होतं याचं उत्तर कोंबडी आधी की अंड असं आहे.पण भक्ती म्हंटलं की ती देवाचीच असं साधारण समिकरण समोर येतं. व ते आहेही समर्पक.
प्रेम ही जर भक्तीची सुरूवात मानली तर ते खरंच आहे शिवाय भक्तीतून प्रेमाचा महापूर वहातो हेही खरंय.
का भक्ती करावी? किंवा का प्रेम करावं हा प्रश्न असेल तर उत्तर फार सुंदर आहे. ते असं थोडंसं वेगळं-प्रेम कधी केलं जात नाही ते होतंच -असतंच किंवा अध्यात्मात प्रेम म्हणजे ईश्वराचे सत्य अस्तित्व!जे Omnipresent आहे..अर्थात सर्वत्र आहे.मग ही भक्ती म्हणतात ती काय? - ती तर प्रेमाची परिपक्व अवस्था! सहज सुंदर व निरागस भाव म्हणजे भक्ती!ती मुख्यतः ईश्वरावर होते.परमात्मा व आत्मा एकरूप अवस्था जेंव्हा अनुभवतात त्यालाच भक्ती म्हणतात.भक्ती प्रेम निर्माणही करते नी प्रेमाला परम पदापर्यंतही नेते.दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू.प्रेमाशिवाय भक्ती अपूर्ण व भक्तीशिवाय प्रेमही अपूर्ण!किती अभेद्य हे नातं तसेच गहिरंही..भक्तीत रस आला की प्रेमतरंग तयार होतात व देवही भक्ताच्या अश्रूधारांमध्ये चिंब चिंब भिजतो.
विठ्ठलाचे भजन गातांना खरा भक्त हा वेगळा रहातच नाही तो विठ्ठलच होऊन जातो."विठ्ठल,विठ्ठल" म्हणतांना ' मी तू पणाची झाली बोळवण' असा अनुभव येतो.तो अनुभवच सर्वांगसुंदर आहे.जो प्रत्येकाने अनुभवावा व कृतार्थ व्हावे.
मन लयास गेले ही अवस्था म्हणजे खरी भक्ती.ज्याला ती साधते तो देहरूपाने फक्त वेगळा उरतो अंतर्यामी तर तो विठ्ठलच!जगाला न कळणारे कोडे हेच की भक्तीत लोक एव्हडे वेडे का होतात? पण हे वेड काही सर्वसामान्य वेड नसून परमात्मा आपल्या भक्तावर करत असलेलं प्रेमच आहे.परमात्मा आपल्या दासाचा दास कधी होऊन जातो ते त्यालाही कळत नाही.प्रेमाची हीच गम्मत की भलेभले आडवे होऊन जातात.आपल्या दासाची चाकरी करणारा विठ्ठल आपण अनेक संतसाहित्यात वाचतो.ती खरी गोड प्रेममय भक्ती..एकमेकांविषयीचा जिव्हाळा, माया, आपुलकी, स्नेह, एकरूपता हे सगळं प्रेमाचं व भक्तीचं खरं रसायन..
माना अथवा मानू नका प्रेम ही जितकी सामान्य प्राण्यांची गरज असते तितकीच किंवा त्याहूनही अधिक ती ईश्वराची Lifeline आहे.तो खरा" जिवंत "असतो ते भक्तीनेच.म्हणूनच प्रत्येक जीवाची ही जबाबदारी आहे की भक्ती करावी..त्यानेच ईश्वर प्रसन्न होतो व अंतिमतः मोक्ष प्रदान करतो.कारण तोही आपल्या भक्ताशिवाय अलग राहू शकत नाही.
'देव भावाचा भुकेला' हे त्रिवार सत्य आहे.भक्तीनेच जीवननौका पार होते.मुक्ती मिळते.धन्य ते भक्त जे ईश्वराची सहज भक्ती करतात..धन्य त्यांचे माता- पिता व धन्य त्यांचा जन्म!!
Comments
Post a Comment