श्री दासबोध ग्रंथाचे सार
जय जय रघुवीर समर्थ।
-सौ.स्वरूपा कुलकर्णी
कुठल्याही ग्रंथाची सुरूवात गजाननाच्या स्तुतीशिवाय होत नाही हे खरेच! परंतू, समर्थांचा दासबोध ग्रंथ मात्र अपवाद आहे.ग्रंथाची सुरूवातच हा ग्रंथ कोणता? कशासाठी निर्मीला?म्हणजे कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला किंवा चिकीत्सकाला ग्रंथ उचलतांनाच जो साधा प्रश्न पडेल त्या मुलभूत प्रश्नांनी सुरूवात केलिये. तसेच लागोलाग उत्तरही येथे समर्थांनी दिले आहे.खरंच समर्थ किती मनकवडे व दुरदर्शी विचारांचे होते.कोणालाही नविन ग्रंथ वाचायला घेतांना हमखास असे प्रश्न पडतातच.म्हणजेच सुरूवातीलाच वाचकाचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी त्यांनी ही अभूतपूर्व ग्रंथरचना केली आहे हे जाणवते. समर्थांची ही मनोवेध घेऊन आत्मानुभूतीचा प्रवास करवणारी लेखनकला अजोड आहे.
बघा हं ,आईला बरोबर कळतं बाळाने कितीही नाटक केलं तरी की खरा problem काय आहे.बाळ कितीही खोडकरपणा करत असलं तरी आई बेमालूमपणे बाळाला ताळ्यावर आणतेच आणते.तसेच संतही सामान्य जीवाला भगवंताकडे नेण्यासाठी अनेक युक्त्या प्रयुक्त्या करत असतात.कधी गोड बोलून ,कधी रागावून तर कधी कठोरपणे संत व सद्गुरू जीवाला योग्य रस्त्यावर आणतातच! कारण ती गुरूमाऊली अथांग प्रेमाचा सागर आहे.बाळ चुकेल, त्याला लागेल, ठोकर बसेल ,त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून गुरूमाऊली अखंड धडपडत असते.ही गुरूमाऊलीची काळजी कधिच अकारण नसते बरं! तिला तुमच्या पुढचे व मागचे सगळे दिसत असते.
समर्थांचा हा दासबोध म्हणजे अंधारात मिळालेला दिव्याचा प्रकाशच आहे.जो आपल्याला वेळोवेळी रस्ता दाखवतो.चुका दाखवतो.समर्थांचे लेकरू कधिच एकटे नसते.दासबोधासारखा ग्रंथ दासाला अध्यात्मातली सखोलता व खाचाखोचा सांगतो.ही खरी गुरूकिल्ली!!दासबोधातील प्रत्येक समास वेगळे सूत्र देऊन सामान्य माणसाचे मुमूक्षूमध्ये तर मुमूक्षूचे साधकात रूपांतर करतो.दासबोधाच्या प्रत्येक ओवीत रामच अर्थसार असल्यामुळे मनात सारासारविचार पटकन येतो. व मनाची एकाग्रताही लवकर होते.समर्थ कृपा लवकर झाली तर मनातील शंकाकुशंका लवकर मावळतात.मन निःशंक होत जाते.दासबोधाचे फळ हे आत्मज्ञान व आत्मप्रचितीचे असल्याने मनाचे उन्मनी अवस्थेत रूपांतर होते.ज्ञान व भक्तीचा संगम म्हणजे दासबोध! राम हे तत्व ,राम हेच दैवत , राम हाच पूर्णपुरूषोत्तम,राम हाच ईश्वर,राम हा आनंदरूप अशी रामाची विविध अंगे असली तरी तोच सगुण व निर्गूण परमात्मा आहे ही ओळख समर्थ करून देतात.तो नित्यनिरंजन प्रभू व आत्मा यांच्यात यत्किंचीतही भेद नसून ते एकच आहेत ही सुलभ ओळख समर्थ या ग्रंथातून करून देतात.
"तो मीच आहे" हे ज्ञान तसेच इतरही महावाक्यांचा परामर्श येथे घेतला आहे.
समर्थांच्या दासबोधरूपी प्रकाशात प्रपंच व परमार्थ दोन्हीही साधतो हे खरेच..ही केवळ गुरूकृपाच जी भवभय पळवून लावते व नौका भवसागर पार करते.
।। जय जय रघुवीर समर्थ।।
।। जय श्री राम।।
Comments
Post a Comment