आज कालचा लग्नाचा थाट

 



लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी

वैचारिक लेख


       आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न किंवा विवाह हा मानवी आयुष्यातील महत्वाचा संस्कार आहे.तो १६ संस्कारांपैकी एक आहे.वेद ऋचांच्या साथीने विवाहवेदीवर नवदांपत्य आजन्म सोबत रहाण्याच्या आणाभाका घेतात.मंत्राग्नीच्या समवेत लग्न सोहळा धुमधडाक्यात पार पडतो.खरं तर लग्न ही दोन्ही जीवांचा आनंद सोहळाच आहे परंतू ,अलिकडच्या काळात लग्न हा एक "इव्हेंट" झालाय! माझं असं मुळीच म्हणनं नाही की लग्नात वेगवेगळ्या प्रथांची जोपासना होण्यासाठी त्या नियोजनबद्ध व सुंदर सादर व्हाव्यात.पण प्रश्न असा आहे की आपल्या सुंदर चालीरीती,प्रथा परंपरा ह्या केवळ "शो" साठी  नसून मनामनांची रेशीमगाठ बांधण्यासाठीची ती एक सात्विक, सुंदर पद्धती आहे.त्यातून दोन जीवांसोबतच दोन परिवार एक होणार असल्याची ती मुहूर्तमेढ आहे.आपल्या सर्व चालीरीतींना सखोल अर्थ आहेत व ते फक्त दिखावा किंवा उंची डामडौल किंवा पैशाची उधळमपट्टी हा नसून मनामनांना जोडण्याचा तो सेतू आहे.

       आजचे आई वडिल खूप खर्चिक वाटा निवडून मुलांसाठी वाट्टेल ते करण्याच्या भानगडीत मूळ सूत्रच विसरून जातात की लग्न हे केवळ चालीरीती मानण्यासाठी रचलेला घाट नसून ती दोन शरीरं व मने जोडून त्यांचा संसार पूढे सुखाचा व्हावा म्हणून केली गेलेली तजवीज आहे.ज्या पालकांकडे पैसा कमी असतो त्यांना लग्न धुमधडाक्यात करता येत नाही म्हणून कमीपणा वाटतो.ते मनाने नाराज होतात.ज्यांच्याजवळ खूप पैसा आहे ते बडेजाव करण्याचा प्रयत्न करतात व जगात मोठेपणा मिरवतात.या सगळ्यात माझे म्हणने हे आहे की लग्न शाही करा किंवा साधे करा ,तुमच्या ऐपतीप्रमाणे करा पण मुख्य मुद्दा हा विसरू नका की लग्न कशासाठी केले जातेय.विचार करा की लग्नाआधीच समोरच्या पक्षाला नामोहरम करण्यासाठी केले जात नाही ना किंवा  स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी तर नाही ना ?

       लग्न ही दोन जीवांची रेशीमगाठ बांधण्यासाठी व त्या बंधनाला परमेश्वरी कृपाशिर्वाद लाभण्यासाठी केली जाणारी परमपवित्र योजना आहे.तीचा उद्देश लग्न करून २ जीव व २ कुटूंब सुखासमाधानाने एकरूप व्हावेत म्हणून ती परंपरा आहे.त्या पवित्र संस्काराला बाजूला ठेवून हौशी मंडळी जेंव्हा बिभत्स रूप त्याला देतात तेंव्हा कपाळाला हात मारायची वेळ येते.

      प्रीवेडींग फोटो शूट हा त्यातीलच एक प्रकार.माझ्या ओळखीच्या काकूंकडे मी गेले होते.तिथे ह्या प्रीवेडिंगची सीडी बघितली व खोटं सांगत नाही पण ते पाहून मला इतकं किळसवाणं वाटलं जे शब्दातही वर्णन होऊ शकत नाही.कोणी किती लाज सोडावी ह्याचे ते उत्तम उदाहरण होते.स्वतःच्या आनंदाचा "शो " करण्यासाठी इतका थिल्लर प्रकार पाहून आजचे हिंदी चित्रपट व गाणीच आठवली.किती ओंगळवाणं चित्र आहे की ज्या व्यक्तीशी अजून लग्न व्हायचंय त्याच्याशी फिल्मी शुटींग करून कमी कपडे घालून जगाला फालतू प्रदर्शन करायचं! ही फार  भयानक व तितकीच गंभीर गोष्ट आजकाल खूप लग्नांमध्ये दिसत आहे.परवा एका लग्नाला गेलो.लग्न खूप प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मुलीचं होतं.पण गम्मत अशी की मुलीला मेकअप करायला उशिर झाला.त्या वेळात गुरूजींनी नवऱ्या मुलासमोर मंगलाष्टकंही म्हणून घेतली व शेवटचं मंगलाष्टक उरलं तेंव्हा ती नववधू आली.जणू एकट्या मुलाचेच लग्न लागले.किती बेशिस्त व वेळकाळेचं भान नसणारी वधूकडील मंडळी.प्रश्न हा रहातो की लग्नात खूप फोटोसेशन करायचंय,रील्स बनवायच्या आहेत म्हणून मेक अपमध्येच जर ती वधू वेळ घेत असेल तर अशांसाठी लग्न हा फक्त एक इव्हेटच रहातो तो विवाहसोहळा होत नाही.सोशल मिडीयावर झळकता यावं म्हणून लग्नाचा शो करायचा हा अत्यंत चीड आणनारा प्रकार आहे.मूळ संकल्पनांना तडे देणारा प्रकार आहे.


           लग्नविधीला जोपर्यंत एक संस्कार म्हणून त्याकडे पाहिलं जात नाही तोपर्यंत असे अकलेचे तारे तोडणे चालूच राहिल.जगाला नकली आनंद दाखवून समाधान मिळवणारी आजची पिढी रामसीतेसारखे आदर्श निर्माण करू शकतील का?रामासोबत १४ वर्षाचा वनवासही जीने सहज स्विकारला ती सीता आजही होईल का? किंवा सीतेच्या सोडवणूकीसाठी वनावनात भटकून रावणासारख्या महाभयंकर दानवाशी लढणारा राम होईल का?मला असं नाही म्हणायचं की रामायण हे कृतयुगात घडलं आज तसं कसं घडेल? पण म्हणून जीवनाचे आदर्श जोडप्याचे निकष तर बदलत नाहीत ना!२ जीवांचे एकमेकांवर प्रेम हे कालही व आजही तितकेच महत्वाचे आहे. २ शरीर एक मन ही विवाहानंतरची अवस्था झाली तरच आदर्श जोडपं तयार होतील.नुसत्या छानछोकीवर पैसा उधळून कुठलेच आदर्श जीवनमुल्य सापडू शकत नाहीत.त्यासाठी विवाह संस्कारांची गरज व सुसंस्कृतपणाचा अवलंब हे समजून घेतले पाहिजे.लाखो रूपयांची उधळपट्टी फक्त काही तासांसाठी करणारी पालक मंडळी तोच पैसा नवदांपत्यासाठी गुंतवणूक करून चांगले आदर्श निर्माण करू शकतात.लग्नात अन्नाची प्रचंड नासाडी करण्यापेक्षा गोरगरीबांना दान करावे हा आदर्श घालू शकतात.पैशाचे योग्य नियोजन करून मुलाला व मुलीला चांगली शिकवण देऊ शकतात.

        लग्नात हौसमौज करू नये असा हेतू नसून लग्न हा संस्कार म्हणूनच पहावा व चांगल्या गोष्टी जरूर कराव्यात.केवळ हौसेने लग्न करण्याच्या नादात मूळ संस्कारांना फाटा देणे कधीही योग्य नाही. ती स्वतःहून पायावर धोंडा मारण्याची गोष्ट होईल.लग्नातील थाटमाट हा कोणासाठी आयुष्यभराचा फास तर नाही ना हा विचार होणे फार गरजेचे आहे.वराप्रमाणे वधूपक्षाचीही तितकीच काळजी घेतली जावी असे वाटते.लग्नातील होम करतांना तसेच सप्तपदीच्या वेळी घेतले जाणारे फेरे व आणाभाका ह्या डोळसपणे अवलंबणे ही खरी वर वधूची जबाबदारी आहे.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न