प्रिय अमुची भारतमाता
कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी
हिरवा- निळा शालू पांघरून,
धरती सजली नवरंगांनी,
तिच्या भाळी जणू विराजे,
प्रियतम अमुची भारतमाता
वसुधेला अलंकार नवनवे,
परंतू शोभे कुंकवाने ते,
धरती बनली सौभाग्यशालिनी,
भारतमातेच्या अस्तित्वाने
रंग भगवा त्यागाचा हा,
शुभ्र रंग हा सात्विकतेचा,
हिरवा रंग सृजनाचा हा,
निळ्या चक्राने सजला तिरंगा सारा
धन्य धन्य ही धरा अमुची,
राम-कृष्णांची जन्मभूमी,
स्वातंत्र्य लाभले बलिदानाने,
राखू आम्ही प्राणपणाने
आसेतूहिमाचल ऋतू वेगळे,
निसर्गाचे अनेक सोहळे,
संगित इथल्या कणाकणातले,
गातो आम्ही भक्तीभावे
प्रियतम अमुची भारतभूमी,
असे देवांनी निर्मित भूमी,
हिच्या आश्रयाने जीवन सारे,
झाले मंगल झाले सुंदर
Comments
Post a Comment