खण व आपली संस्कृती
- सौ. स्वरूपा कुलकर्णी
आपल्या महाराष्ट्रात ज्या सुंदर परंपरागत व सांस्कृतिक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पहायला मिळतात त्यात वस्त्र ही कला प्रामुख्याने पहायला मिळते. जी परंपरागत तर आहेच पण अत्यंत वैविध्यपूर्ण व सुंदर धाग्यांनी विणलेली साधी भोळी, शालीन मराठी संस्कृती देखिल आहे. त्यात रंगांचे वैविध्य, कलाकुसर,आईचा उबदार स्पर्श, मऊपणा आहे. इतर वस्त्रांपेक्षा वेगळं असल्याची खूण मिरवणारा हा 'खण' परिधान केला की मी मराठी असल्याचा एक वेगळाच अभिमान मिरवता येतो हे वैशिष्ट्यदेखिल आहे.
खणनारळानं देवीची ओटी भरली जाते हे आईचं लहानपणी खूप वेळा ऐकलेलं वाक्य व आईला प्रत्यक्ष देवीला पूजतांनाही अनेकवेळा पाहिलं होतं. तेंव्हाच ह्या 'खणाचं' महत्व माझ्या मनावर कायमचं गोंदलं गेलं होतं. लग्नानंतर अनेक प्रसंगात हा 'खण' मला भेटत गेला.पहिल्यांदा घेतलेली जांभळ्या रंगाची व लाल काठ असलेली मैत्रिणींच्या आग्रहास्तव नेसलेली खणाची साडी मी जपूनच वापरते हां. आणि हो Womenia ही आधुनिक मराठी स्त्रीचा नथीचा साज घेऊन नटलेली पिवळी व जांभळ्या काठाची खणसाडी कायमच मैत्रिणींमध्ये भाव खाऊन जाते.मला आज खणाची साडी किंवा ब्लाऊज म्हटलं की परंपरा व आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ बघायला मिळतो हे सुखावह वाटतं.
एकदा माझी मैत्रिण मुग्धाने घरी सवाष्ण म्हणून जेवायला बोलावलं होतं तेंव्हा जेवण झाल्यावर तिने माझी निळ्या रंगाच्या सुंदर खणाने ओटी भरली होती. आणि हट्टाने ह्या खणाचे ब्लाऊज शीव म्हणून गोड आग्रहही केला होता.सुंदरच होता तो व त्यानंतर तो ब्लाऊज मी खूप साड्यांवर कॉमन ब्लाऊज म्हणून वापरला. तो आजही जपलाय हे सांगायचंय तिला कधितरी. ही गोड आठवण मैत्रिणीचे प्रेम कधिही विसरू शकत नाही.
आपल्या मराठी घराघरात विविध प्रसंगात खणाची चिरचोळी ,ओटीत किंवा हौसेने हिरव्यागार रंगाच्या मऊसूत खणाची त्रिकोणी घडी बायका देत घेत असत. आजही ती प्रथा पाळणारी जुनी व नविनही घरे आहेत. सुंदर रंगाच्या कलाकुसर केलेल्या आजकालच्या नवनविन खणाच्या वस्त्रांचा ट्रेंड अगदी हटकेच आहे हे सांगायलाच नको. मुख्यतः आधुनिक मराठी तरूण मुली व मुलेदेखिल उत्साहाने सणांना व एरवीही खणाचा "फॅशन" म्हणून अवलंब करतांना दिसतात. खणाच्या अक्षरक्षः हजारो प्रकारांच्या वैविध्यपूर्ण पॅटर्नसच्या साड्या, चोळी(ब्लाऊज), ज्वेलरी,लहान मुलांचे व मुलींचे ट्रॅडिशनल कपडे जसे परकर पोलकं यात अजून खूप काही सांगता येईल हे दिवसागणिक बहरणारं मार्केट झालंय. जात्यावर दळण दळणाऱ्या आजीबाईंनी घातलेल्या त्या खणचोळीपासून ते आधुनिक खणाचे रूप पाहून स्तिमीत व्हायला होतं. " रूप पाहता लोचनी, सूख झाले हो साजणी" असं हे आपलं पारंपारीक वस्त्र असलेल्या खणालाही तितकच लागू पडतं असं वाटत रहातं.
जुन्या काळातल्या शिवरायांच्या, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकारामांच्या व इतरही ब्लॅक अँड व्हाईट सिनेमात खणाची परकर पोलकी घातलेल्या मुली,जुन्या नट्यांच्या साड्या पाहून आपला मराठी बाणा किती सोज्ज्वळ, शालिनतेची किनार असलेला व उबदार नात्यांनी विणलेला होता हे प्रकर्षाने जाणवतं.हे खरंच आपलं सांस्कृतिक वैभव होतं व आजही आपण जपत आहोत हे महत्वाचं आहे.
संस्कृती म्हणजे काय ते साध्या धाग्यातुनही कळावं इतकं अनोखं हे आपलं पुरातन वैभव आहे.संक्रांतिला सुंदर खणाची साडी व चोळी नेसलेली मराठी गृहिणी जेंव्हा सुगडं पूजते व घरधन्यासाठी देवाला प्रार्थना करते तेंव्हा तिच्या सात्विक पूजनाचे संस्कृतीबंध तिच्या वस्त्रातही उतरत जातात. मराठी वस्त्रातली साधी, तरीही सुंदर, मराठी गृहिणी रांगोळीत म मराठीचा संक्रमण 'कालावरही' रेखाटत जाते. हीच सुंदर वस्त्रपरंपरा काळाच्याही पटलावर अजरामर ठरली आहे याचा मराठी म्हणून सार्थ अभिमान वाटतो..🙏
Comments
Post a Comment