सूर्यदेवता
-©️®️सौ. स्वरूपा कुलकर्णी
आदिदेव नमस्तुभ्यम् प्रसीद मम भास्कर।
दिवाकर नमस्तुभ्यम् आदिदेव नमोस्तुते।।
दररोज सकाळी देवपूजा झाली की तुळस पूजन आणि नंतर सूर्यदेवाला नमस्कार करतांना हा श्लोक मी म्हणते.खरंच सांगते रोज उगवणारा तोच सूर्य मला नित्य नवाच वाटतो. नवी स्फुर्ती,ताजेपणा, उत्साह, सकारात्मकता, प्रसन्नता हे सगळं त्या सुर्यदर्शनाने प्राप्त होतं.१ ते २ मिनीटं मी स्वतःभोवती प्रदक्षिणा घेऊन सूर्याला वंदन करते. पण तो दर्शनाचा सुखद अनुभव मी अंतःकरणापासून अनुभवते. किती आनंद मिळतो ते शब्दात बांधता येणार नाही. ती तेजस्वी आभा मनावरील मळभ क्षणात दूर करते.त्या सकाळच्या तेजस्वी तरिही तितक्याच उबदार सूर्यदर्शनाने दिवसाची सुरूवात फार प्रसन्न होते. सूर्याला पाहिलं की माझं मन श्रद्धा व भक्तीने भरून जातं. किती निरपेक्षपणे जगाचा व्यापार चालवणारा हा जगाचा मालक आपल्या केवळ असण्याने जगाची सर्व यंत्रणा सांभाळतो. सूक्ष्म जीवांपासून ते मानवापर्यंत सर्वच सजिव सूर्यामुळेच जिवंत रहातात. सूर्य नसता तर असा विचार केला की कळतं सूर्य काय गोष्ट आहे ते. तो नसेल तर जग अंधःकाराच्या साम्राज्यात ढकलले जाईल व सर्वत्र निराशा व भिती पसरेल. सजिव जग नष्ट व्हायला सुरूवात होईल नी होत्याचं नव्हतं होईल. एकुणच जगाचा चालक म्हणूनच सूर्यनारायणाचं महत्त्व असामान्य व अतुलनिय आहे.
सूर्य हा जगत्पालक आहे पण तो आपला मित्रही आहे ही आपली भारतीय सनातन संस्कृती सांगते. ते अगदी खरंय. मनावर, शरिरामध्ये आलेले निराशेचे ढग सहज दूर करणारी सूर्यदर्शनाची महती शब्दात सांगू शकत नाही.नित्य सकाळी सूर्यदर्शन करणारी व्यक्ती सूर्याचे तेज, किरणांमधील उब सहज ग्रहण करते. त्याबरोबरच देवता म्हणूनही सूर्य आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे हे कधिही विसरता कामा नये. रथसप्तमीला आपण सूर्यजयंती साजरी करतो. सूर्यस्मरण करून तिळ गुळाच्या पोळ्या करतो. सूर्यासमोर सप्तधान्यांची पूजा होते. दूध ऊतू जाऊ दिले जाते.सूर्य आपल्याला देतो भरभरून पण घेतांना मात्र आपला सच्चा भाव पहातो. त्याची तशी आपल्याकडून कोणतीच अपेक्षा नाही.आपले दिवस व रात्रही सूर्य असल्यामुळेच असतात. विज्ञान व तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी सूर्याचे कार्य थांबणार नाही. व त्याची महती संपणार नाही.
सूर्य हे मुळातच तेजस्वी श्रीमंत दैवत आहे. संपूर्ण विश्वाचा आत्मा सूर्यनारायणच आहेत. तो भगवंताचा चक्षूही आहे. सूर्य अखिल जिवसृष्टीचा पिता आहे. संपूर्ण सृष्टीचे संचलन सूर्यामुळेच चालू शकते. इतकं महत्वाचं हे दैवत अनावधानाने आपण दूर्लक्षित करतो. पण नित्य सूर्यउपासना केली तर जीवनातील अंधःकार नष्ट होऊन आत्मज्ञानाचा दिप प्रकाशित होतो. अख्ख जीवन झळाळून उठतं. मानवजातीचे कल्याण सूर्यउपासनेत आहे.अशा सवितृसुर्यनारायणाला मनःपूर्वक वंदन🙏
Comments
Post a Comment