#गोवा
#आठवणी
- सौ. स्वरूपा कुलकर्णी
मला लहानपणापासूनच प्रवासाची आवड. आई बाबांसोबत अनेकदा प्रवास घडले. आजवर काही तिर्थयात्रा , काही सहली नातेवाईक तर काही नवऱ्यासोबत अनुभवल्या. पण एकट्याने प्रवासाचे योग तसे कमीच आले. प्रवासांमध्ये सुंदर हिंदी व मराठी गाणी ऐकणे किंवा भेंड्या खेळणे हे माझं अत्यंत आवडतं काम असायचं व आजही आहे. त्यामुळे प्रवास सुंदर होतोच पण मनाच्या सुंदर सुंदर अवस्थाही कळायला लागतात व अधिकच प्रसन्नता अनुभवायला मिळते.
कॉलेजमध्ये असतांना एकदा अचानक गोव्याला जाण्याचा योग आला.कॉलेजची ट्रीप होती.अतिशय सुंदर नियोजन करून कॉलेज लेकिचरर व मित्र मैत्रिणींसोबत ट्रीपला जाण्याची जय्यत तयारी केली. गोव्याला जाण्यापूर्वी मनात गोव्याच्या बीचबद्दल, तिथल्या माश्यांबद्दल,चर्चेसबद्दल, टूरिस्टचा हॉटस्पॉट असल्याबद्दल खूप ऐकलेलं होतं. कोकणसारखी तिथेही लाल माती आहे हे नुसतं ऐकून होते. पण जेंव्हा गोव्यात प्रवेश केला तेंव्हाचा अनुभव हा केवळ शब्दातीत! तिथल्या हवेतच झिंग आहे..ती कदाचीत तिथला माणूस दारू प्रिय आहे किंवा इतरही बऱ्याच गोष्टी असतिल पण गोव्यात पार्टी किंवा मांसाहार ह्या गोष्टी फार सहज केल्या जातात असं दृष्य दिसले. काही नावडत्या बाजू असतिलही पण गोव्याचा निसर्ग मनाला भूल पाडतो हे मात्रं मान्यच! तुम्ही कितीही दूर रहायचं ठरवलं तरी इथली हवा, पाणी, माणसं व एकुणच निसर्ग तुम्हाला तुमच्याही नकळत आपल्या बरोबर थिरकायला लावतो.
कॉलेजमधल्या मित्र मैत्रिणींसोबतचा गोव्याचा अनुभव अत्यंत खासच होता कारण, आम्ही ज्या ' सनकिस्ड' रेसॉर्टमध्ये उतरलो होतो तो जणू एखाद्या सुंदर वास्तूशिल्पाचा नमुना होता. अत्यंत सुंदर रूम्स्, मध्ये स्विमींग टॅंक, आजुबाजूला नारळाची झाडी, सुंदर जेवण व आतिथ्य हे केवळ अप्रतिमच! जगतांना काही क्षण समाधानाचे व अद्भूत देऊन जाणारे असतात तश्या सुंदर अनुभवांपैकी एक म्हणजे गोव्याचा समुद्रकिनारा! सतत खळाळणाऱ्या लाटांचा खेळ खेळणारा निळाशार समुद्र जणू त्याच्या विशाल ह्रदयात मलाही खेळवू पहात होता. त्याचे सुंदर रूप हे केवळ काही दैवी अनुभवासारखंच अलौकीक..इथला समुद्र बोलतो खूप आपल्याशी निःशब्द राहून. दिवसा सुंदर सुर्यकिरणांनी चमचमत्या लाटांत हिंदकळणारा तो संध्याकाळी तर नुसता जीवनाचं तत्वज्ञान उलगडत नेतो. आम्ही सारेजण समुद्राच्या बरंच आत गेलो व एकमेकांचे हात धरून खूप चिंब भिजलो. माघारी फिरावं वाटत नव्हतं पण रात्रं होतिये म्हणून नाईलाजाने बाहेर आलो. समुद्र तुमचं दुःख तुमचं मन हलकं करतो. त्या तरूण वयात नकळत मी समुद्राच्या प्रेमात पडले. आजही स्मृतीत त्याला पहाते. हा खारा आहे खरा पण तितकाच "खरा" आहे हे मी जाणलंय. माणसाचे मन समजून घेऊ शकतो व त्यावर इलाजही करू शकतो असा जाणता वैद्यही आहे.
रात्री किनाऱ्यावरच्या बोटहाऊस पार्टीतही मजा आली. दारू बीरू न पीताही जुन्या गोवन गीतात सगळे मस्तं नाचलो. आजही ते फोटो जपून ठेवलेत. नंतर गोवा फिरतांना तिथला किंगफिशर कंपनीचा दारूचा कारखाना पाहिला. तिथेही दारू या गोष्टीबद्दलच कुतूहल म्हणून दारू कशी बनते ते समजून घेतलं. काहिंना तिथली unfiltered दारू पिऊन पहाता आली. मला मात्र प्यायची हिम्मत झाली नाही. गोव्याची लाल माती, तिथली आधुनिक माणसं, निळ्या आकाशात चमकणारा सुर्य, समुद्रकिनाऱ्यामुळे होणारा उकाडा, विकायला ठेवलेल्या माश्यांचा भयानक वास, सुंदर चर्चेस, त्यांच्या घंटा, अगौडा फोर्ट ( जिथे दिल चाहता है फिल्मचं शुटिंग झालेलं) सोबत धमाल मित्र मैत्रिणी व शिक्षक या सर्वांमुळे सहल अविस्मरणीय ठरली.
परत परत आठवला तो निळाशार समुद्र आणि लाल मातीतील गगनचुंबी नारळाची झाडं, हा निसर्ग येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मोहात पाडतो व झिंगवतो.कवी बोरकर म्हणतात ते अगदी खरंय,
माझ्या गोव्याच्या भूमीतं
गड्या नारळ मधाचे
कड्या कपरीमधूनी
घट फुटती दुधाचे...
Comments
Post a Comment