शब्दावाचून कळले सारे...
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
अनुराधा त्या खिडकीजवळ एकटीच उभी होती.रेडीओवर 'शब्दावाचून कळले सारे,शब्दांच्या पलिकडले...ह्या गीताचे शब्द त्या खोलीभर ऐकू येऊ लागले..तीच्या डोळ्यासमोर सहा महिन्यापूर्वी घडलेले प्रसंग क्षणात तरळून गेले..त्या गाण्याच्या प्रत्येक शब्दावर तीचे मन विदिर्ण झाले व नकळत डोळ्यातून अखंड अश्रू झरू लागले.
तिला विनयची व तीची पहिली भेट आठवली..तो तिच्या ऑफिसमध्ये आधीपासूनच कामावर होता.तीच सहा महिन्यांपूर्वी तिथे रूजू झाली होती.अनुराधा मुळातच दिसायला देखणी, अगदी चारचौघीत उठून दिसेल अशीच!...तोही तसाच उंचपूरा, सावळा नी शांत स्वभावाचा..ऑफिसमध्ये त्याची व तिची केबिन तशी लांब ,पण दोघेही एकमेकांना दिसू शकत होते..तीचा रोजचा पेहराव अतिशय सुंदर व तिला साजेसा असाच असे..पंजाबी ड्रेस तेही हलक्या, फिकट रंगाचे तसेच कॉटनच्या साड्या त्यावर हलका मेकअप यासगळ्यामूळे तिचं मूळचं सौंदर्य अधिकच खूलून दिसायचं..तोही तितकाच कौशल्याने आपला पेहराव ठेवायचा व ऑफिसमधल्या सगळ्या मुलींचा लाडका हिरो झाला होता..मुळातच त्याचा स्वभाव शांत पण अनुराधाला पाहून त्याची नजर त्याच्याही नकळत घायाळ झाली हे तो जाणून होता..ती ऑफिसमध्ये आली की जणू ऑफिसमध्ये चैतन्य यायचं त्याच्यासाठी..रोज तो तिची वाट पहायचा..तीला सोनचाफा फार आवडायचा..रोज कमित कमी एक तरी फुल लावल्याशिवाय ती ऑफिसमध्ये यायची नाही..ती आली की तो सोनचाफ्याचा गंध सगळीकडे पसरायचा नी वातावरण गंधाळून जायचं...तीला एव्हडं रसिक पाहून तोही त्या दिवसापासून रोज न चुकता तिच्यासाठी तिच्या टेबलवर ओंजळभर सोनचाफा ठेवून द्यायचा..प्रथम तिला कळेना की हे काम कोणाचं मग लक्षात आलं स्वतः विनय हे काम करतोय..चेहऱ्यावर तीने खोटा राग दाखवला त्याला पण मनातून तीही सुखावली होती..तो व तीची भेट आता त्या सोनचाफ्यामुळे लांबूनच होत होती..ती ऑफिसमध्ये आपल्या डेस्कवर आली की ती फुले तीची वाट पहायची...मग ती फुलं ओंजळीत घेऊन ती एक दिर्घ श्वास भरून घ्यायची...अहाहा!!...तोही लांबून ते दृश्य बघत असायचा..मग ती एक हलका कटाक्ष तिकडे टाकून त्याला smile द्यायची..तोही त्या smile ला प्रत्यूतर दाखल smile देऊन Its my pleasure असे न बोलताच चेहऱ्यावर भाव आणायचा..ती मग मनात खूश होऊन आपल्या कामात डूबून जायची..
हे असे smile देणेघेणे व ' सोनचाफा' भेट करणे रोज चालूच होते.तोही तिच्यात गुंतत चालला होता व तीही गुंतली होती..त्यांच्यात परस्पर संवाद फारसे कधी झालेच नव्हते इतके ते प्रेम अबोल,अस्फुट व संकोच करणारे नवखे होते..' शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले' अशीच तिची व त्याची अवस्था...
एकदिवस तिला टेबलवर सोनचाफा दिसलाच नाही.तिने मागे मान वळवून त्याच्या डेस्ककडे पाहिलं..तो तर जागेवरच नव्हता..'अरे आज रजाए वाटतं..' ती थोडी नाराजच झाली.तीच्याकडे त्याचा नंबर होता पण तीने तो कधी लावलाच नव्हता..आज तिचं कामात लक्ष लागेना..सारखं वाटत होतं त्याला फोन करावा..शेवटी तीने कलिगला विचारले की 'विनय सर आज का नाही आले' खरं म्हणजे हे विचारणं तिला कमालीचं अवघड वाटत होतं..पण तिने तरीही सानिकाला विचारलेच..तिही जरा आश्चर्याने अनूराधाकडे पहात म्हणाली, अनू, तू काय प्रेमात बिमात पडलीस की काय त्याच्या..अशी काय कावरीबावरी झालीयेस??' यावर तिने उडवा उडवीची उत्तरे दिली..पण आज काही म्हणा तिचे मन लागत नव्हते...रात्री घरी आल्यावर तिने पहिल्यांदा त्याला मेसेज टाईप केला...तिकडून उशीरा रिप्लाय आला...'मी दवाखान्यात गेलो होतो'..तीला वाईट वाटले की याने आज दिवसभरात आपल्याला फोन का केला नसेल ...तीने त्याच्या तब्येतीची चौकशी केली..तो म्हणाला मी येऊ शकणार नाही २-४ दिवस..ती जाम अस्वस्थ झाली..अरे, मग मी किती बोअर होणार ऑफिसमध्ये..तिला आता स्वतःचेच आश्चर्य़ वाटत राहिले..तिकडे तो आजारी पडलाय नी इकडे मी म्हणजे काहीतरी भलतेच विचार करतिये..
तीला उशिरा झोप लागली.सकाळी तिला ऑफिसमध्ये जायच़ आळस आला..कंटाळून तिने मैत्रिणीला तसा फोन केला व १ दिवसाची रजा टाकली..बॉसला मेल केला..पलिकडून सुट्टी मान्य झाली.तीने हुश्श करून दिवसभर त्याच्या आठवणीत गाणी ऐकली..तिच्या आवडत्या सोनचाफ्याला पाणी घातले..आपल्या बागेत चक्कर मारली..तीला विलक्षण वाटत होते की इतक्या कमी ओळखीतून आपण चक्क एका मुलाचा एव्हडा विचार करायला लागलो..पण तेच खरं ' प्रेम कधी ठरवून होत नसतं..ते होतं' या वाक्यावर तिचा विश्वास बसू लागला..दिवसातून कितीतरी वेळा त्याला बोलावसं वाटलं पण तिने ते टाळलं..तो लवकर बरा व्हावा ही मनोमन प्रार्थना केली..
तो दिवस उगवला ..ती सगळं आवरून ऑफिसमध्ये गेली तर सगळीकडे विनयचीच चर्चा होती..तीला काहीच कळेना काय झालंय..तो हॉस्पिटलमध्ये अॅडमीट होता..त्याची हार्ट सर्जरी होणार होती.. ते ऐकून अनुराधाला भोवळच आली..ती मैत्रिणींसोबत तडक हॉस्पीटलमध्ये गेली...तो व्हेंटीलेटरवर होता..तो असाकसा मला सोडून चाललाय ही भावना तीला अस्वस्थ करून गेली...तीने सिस्टरला मला त्यांना भेटता येईल का? हा प्रश्न विचारला...पण ...त्याला सर्जरीसाठी ओटीत नेलं होतं..अनुराधा प्रचंड घाबरून गेली..मनातून कोसळली..तो वाचलाच नाही तर??? ती कमालीची बैचेन झाली..४ तासाच्या ऑपरेशन नंतर तो जनरल रूममध्ये आणला गेला...तीला प्रत्येक क्षण अवघड वाटत होता...थोड्या वेळाने त्याला शुद्ध आली..त्याचे आई- वडील त्याच्याजवळ होते..तीला त्याला भेटायचं होतं..खूप खूप बोलायचं होतं..तो तिच्यासाठ़ किति स्पेशल आहे हे सांगायचं होतं..ती लांबूनच त्याच्याकडे पहात होती..त्याची नजर तिच्याकडे वळली नी त्यात चमक दिसली..ती त्याच्या जवळ गेली व हमसून हमसून रडू लागली...तो कसानुसा हसला..पण त्यालाही भरून आलं होतं...त्याने संकोचून तिच्या हाताला स्पर्श केला व सांत्वन केले.तो बेडवर पहूडलेला व पेशंट असल्याने तिल़ा काही बोलू शकत नव्हता...पण तो मनातून खूप प्रसन्न झाली होता..त्याला हार्ट ऑपरेशनचेही काही वाटेना...तिने त्याला लवकर बरा हो व लवकर ऑफिसला ये म्हणून विनवनी केली..तो मुकपणे ऐकत होता...ती बरंच काही बोलणार होती पण बोलू शकली नाही...एकदाच त्याच्या चेहऱ्याकडे हसून पाहून ती वळली व रूमबाहेर आली..तो यातून नक्की बरा होईल या आशेने ती खुलली व घरी आली...दुसऱ्या दिवशी मात्र तिला ती भयंकर वेदनादायी बातमी कळली..तो तिला कायमसाठी सोडून गेला होता..परत कधीच न येण्यासाठी..ती उभ्या उभ्याच कोसळली..
Comments
Post a Comment