प्रेममुर्ती- गोदावरी माताजी
- सौ.स्वरूपा कुलकर्णी
साकुरीला प्रथम आले तेंव्हा उपासनी बाबा व माताजींकडे लोहचुंबक जसे लोखंडाला खेचते तशी माझी अवस्था झाली.पहिल्यांदा उपासनी बाबांची मूर्ती पाहिली तेंव्हा ती थोडीशी गंभीर पण तितकीच प्रेमळ आहे याची जाणीव झाली.आणि माताजींना जेंव्हा पाहिलं तेंव्हा तर साक्षात महालक्ष्मीच समोर विराजमान आहे असे जाणवले.ती नुसती मुर्ती नाही तर प्रत्यक्ष माताजींचे अस्तित्वच आहे.किती शालीन, सोज्वळ,प्रसन्न रूप ते! मन तिथेच नतमस्तक झाले.प्रत्यक्ष महालक्ष्मीचे दर्शन करतांना मनात जसे भाव असतील तसे भावतरंग उमटत होते.प्रथमदर्शनीच मनाचा ठाव घेणारी ती मूर्ती जणू आईच्या वत्सलतेने मला न्याहाळत होती.किती किती बोलल्या माताजी माझ्याशी! नुसत्या दर्शनानेच त्रिविध ताप शांत करण्याची शक्ती त्या महामायेत आहे हे समजले.'जगाच्या कल्याणा संतांच्या राशी' हे वाक्य शतशः खरे आहे.जगनियंता स्वतः जाऊ शकत नाही तिथे आपल्या विभूती पाठवून आपले कार्य करून घेतो, हे माताजींना पाहून प्रकर्षाने जाणवले.
माताजींचे नाव गोदावरी, गोदामां...किती सार्थ! गोदावरी म्हणजे गंगाच.साक्षात नारायणाच्या चरणातून प्रवाहीत झालेली देवी गंगा शिवशंकरांनी मस्तकी धारण केली.तिच्या प्रवाहातून युगानुयुगे पापी लोक पुण्यवंत होऊन मोक्षाला मिळाले.ह्या गंगेचीच प्रतिमूर्ती म्हणजे गोदावरी.त्र्यंबकेश्वरला उगम पाऊन साऱ्या महाराष्ट्रभर जल घेऊन जाणारी व सर्व पापांचे क्षालन करणारी गोदावरी- गंगा म्हणजे महाराष्ट्राची जलदेवता..आई गोदावरी म्हणजेच माताजी ह्यासुद्धा जणू गोदावरीसारखाच पावन अवतार आहेत.त्याच्या अवतार कार्यात व आजही अनेक पतितांचा त्यांनी उद्धार केला.माताजी असतांना त्यांनी केलेली आपल्या सद्गुरूंची सेवा व तप फार मोठे होते. त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा व समाजकंटकांनी केलेले आरोप सारून अनेक दिनदुबळ्यांसाठी आई होऊन त्यांनी केलेले कार्य फार थोर आहे. खरंच आई हा शब्द त्यांना का लागू पडतो ते इथे येऊनच समजेल.माताजींचा वावर त्या सभामंडपात,झोपडीत, दत्त मंदिरात किती होता हे त्या भुमीतील स्पंदनातूनच जाणवते.माताजींनी अत्यंत कष्टातून ही जागा फुलवली, सांभाळली.त्यांचा झोपडीतील फोटो व इतरही अनेक फोटोंमध्ये उपासनी बाबा त्यांना किती जवळचा सत्शिष्य मानत होते हे जाणवते.आईंची तपःश्चर्या मोठी म्हणूनच त्यांना उपासनी बाबांनी आपली प्रथम शिष्या म्हणून गौरवले.त्यांना दिक्षा दिली.अनुग्रहीत करून अनेक इतर कन्यांनाही वेदवेदांगांचे शिक्षण दिले.स्त्रियांनाही यज्ञ करण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिला.बाबांनी चालू केलेल्या सत्कार्याला माताजींनी भारतभर नेले.अनेक मोठमोठे उत्सव करून साकुरीचे नाव सर्वत्र पोहोचवले.माताजींसारख्या तेजस्वी कन्याकुमारीने आपली भारतीय परंपरा, सत्य, न्याय, निष्ठा तसेच सहनशीलता, नैष्टीक ब्रह्मचर्याचे पालन या सर्व गोष्टींचे कसोशीने पालन केले.
बाबा म्हणायचे वरून जरी माझी गोदा कृष्णाची भक्त वाटत असली तरी तिचे वागणे बोलणे सर्व रामासारखेच आदर्श आहे.खरोखर त्या प्रेममूर्ती, वात्सल्यमुर्तीच होत्या अगदी राम-कृष्णासारख्याच.रामाचे सर्व आदर्श ग्रहण केलेल्या त्या स्वतः मात्र फार मोठ्या कृष्ण भक्त होत्या.बाबांनी दिलेल्या कृष्णाची सेवा त्या फार प्रेमाने करत असत.गुरूनिष्ठा व गुरूसेवेच्या जोरावर त्यांचे कार्य प्रातःस्मरणीय ठरले.
गोदावरी माताजी ह्यांचे जीवनकार्य म्हणजे गुरूकृपा ,निष्ठा, सचोटी यांचा संगम आहे.त्यांचे कार्य सतत स्मरणात ठेऊन वागूया. त्यांची आठवण ठेऊन चालूया.त्या नेहमी म्हणायच्या कोणी कोणत्याही भावे मला नमस्कार केला तरी त्याला सांभाळण्याची जबाबदारी ही माझी.संतांचे संतत्व कसे असते हे इथल्या कणाकणातून समजते.इथे लावलेली आशिर्वचने जगण्याला बळ देतात.क्षमा हा गूण खूप मोठा आहे हे त्या सांगतात.तसेच संयम अंगी ठेवा असेही सांगतात.
या तपोनिधीला माझे कोटी कोटी वंदन!!
Comments
Post a Comment