मन मोगरा...
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
तशी मी लहानपणापासूनच निसर्गवेडी..फुलं,पानं,झाडं,नद्या यात रमणारी...तितकीच देवभोळी..माझ्या मनाला निसर्ग व देव यात तसा फरक करताच येत नाही..निसर्ग म्हणजे किती रंगवैभवी,सहज,तरल,निरागस!! तसा माझा देवही आहेच ना सुंदर, निरागस, प्रेमळ!! देवाच्या स्वभावाच्या छटाही मला निसर्गातील रंगगंधांसारख्याच वाटतात..अगदी इंद्रधनुष्यासारख्या! सप्तरंगी!!
रात्री मुलींसोबत बाहेर फिरायला पडलं की कुठूनशी छान झुळूक येते, सोबतच तो दैवी सुगंध घेऊनच!! अहाहा!! मोगरा उमलतोय..त्या हिरव्यागार पानांमध्ये विसावलेल्या अल्लड, निरागस पांढऱ्या शुभ्र कळ्या हलकेच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात..मी क्षणभर रेंगाळते, फुलांपाशी येते व हसते..कारण सांगू? त्या फुलांना घाई उद्याच्या सुर्यनारायण भेटीची..कोवळ्या किरणांचा पसारा धरतीवर पसरला की ही फुलं अधिक टवटवीत व ताजीतवानी होतात..जणू सूर्य त्यांना नवी उर्जा देतो..पण मी मात्र या फुलांची वाट पहाते ते माझ्या देवपूजेसाठी! हो..या स्वर्गिय गंधाच्या फुलांनी माझी पूजा देवाला विशेष आवडते असे माझ्या मनीचे भाव! तसा गुलाबी व लाल जास्वंदही आमच्या दारात आहेच...पण ती फुलं गंधाळलेली नाहीत ना...म्हणूनच मोगरा पांढरा शुभ्र अगदी निर्लेप, साधा वाटला तरी त्याचा गंध व त्याचं देखणं रूप पहाणाऱ्याला परत परत आपल्या प्रेमात पाडतं...मी मी म्हणनारे फुलांचे प्रकार या मोगऱ्याच्या गंधाने पार फिके वाटायला लागतात, हे मात्र खरं..
सकाळी माझ्याघरी चहा घेतला की झाडझूड, मग आंघोळ झाली की माझा मोर्चा वळतो देवघराकडे.खंडोबा,वणीची देवी व गणपती असे आमचे कुलदैवत( शिव- पार्वती व त्यांचा पूत्र गणेश) त्यात मी मांडलाय माझा सावळा-सुंदर राम!! ही माझी इष्टदेवता..रामाचा जन्म चैत्रातला व मोगऱ्याचा बहरही याच दिवसांतला म्हणजे फार भारी कॉम्बीनेशन वाटतं मला..कारण रामाला रोज रोज ही फुलं वाहतांना किती भरभरून आनंद मिळतो ते सांगताच येणार नाही..रामाला वाहिलेली ही पांढरी शुभ्र फुले म्हणजे जणू मंतरलेल्या स्वर्गीच्या चांदण्याच साऱ्या..टपोरी टपोरी मोत्याच्या रंगाची ही गंधीत फुले म्हणजे करूणावत्सल रामचंद्राला मी माझ्या मनीचा वाहिलेला भावच सारा...अबोध,अल्लड,निरागस, शुद्ध,भावनेने ओतप्रोत भरलेला माझ्या मनीचा गहिवर ही फुले बरोबर ओळखतात व श्रीरामापर्यंत रोज पोहचवतात..मी खरोखर या फुलांची ऋणाईत आहे त्यासाठी!!
पुजेची खरी मजा ही फुलांच्या भरगच्च माळातूनच होत असते..जास्वंदीचे हार मी करतेच ..पण या छोटूकल्या मोगऱ्याच्या १५-२० फुलांची टोकरी भरली की आपसूक मी ही फुलेही गुंफते..मग काय हा छोटूकला हार श्रीरामाच्या छोट्या फोटोला बरोबर पुरतो नी मला खूप खूप समाधान देतो..जणू रामरायाच ही फुले मागवतो व माझे निमीत्त करून गळ्यात घालतो..खरंच रामराया भावनांचा भुकेला त्याला माझी ही नित्य धावपळ काही नवी नाही पण सकाळी सकाळी टोकरीत भरपूर ताजी ताजी फुले पाहिली की मला होणारा आनंद वर्णनातीत..
मला ती सकाळची वेळ मंतरलेलीच वाटते ती मोगऱ्यामुळेच...ही फुले एकदा देवाजवळ विसावली की माझा दिवस अनोख्या उर्जेने सुरू होतो..नवा दिवस नवी सुरूवात..भर उन्हाळ्यातही अनोखी मानसीक शितलता ही मोगऱ्याची देण आहे..तुम्हीही घेताय नं हा सुवास?? भरभरून??
Comments
Post a Comment