गुलमोहर


✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी


     भिशी संपवून अपर्णा ताईला  सोडायला तिच्या घरी निघाले.तीला माझ्या गाडीवरून घेऊन जातांना मस्त हवा सुटली होती.संध्याकाळची ती वेळ खूप बरं वाटत होतं.ती बोलता बोलता सहजच म्हणाली,"ह्या गुलमोहरावरती लिही नं गं स्वरूपा, भर उन्हाळ्यातही किती बहरलेला असतो..तू छान लिहितेस म्हणून म्हणतीये" तिचे शब्द मला एकदम थंड झुळूकीसारखे वाटले.कारण त्यात माझ्या लिखानाचं कौतूक होतंच पण मला ती गुलमोहरावर लिहायला सांगत होती म्हणूनही!तिला माहीत नव्हतं माझं लाडकं झाड गुलमोहर आहे ते!

         भर उन्हाळ्यात रखरखीत डांबरी रस्त्यावरून चालतांना आपण सावलीच्या शोधात असतो.सावली म्हंटलं की झाडं शोधतो.खरंय झाडांच्या परोपकारी वृत्तीचं द्योतक हेच की ती स्वतः उन्हात थांबतात पण आपल्याला सावली देतात. दूरदूरपर्यंत जर झाडंच न दिसता नुसत्या कॉंन्क्रीटच्या इमारती पाहील्या की माझं मन कासावीस होतं.ऊन मी म्हणत असतांना सावलीच मिळाली नाही तर वैतागण्याशिवाय पर्याय नसतो.नुसत्या घामाच्या धारा.चालता चालता पुढं गेल्यावर अचानक एक लाल केशरी साज चढवलेला, वाऱ्याच्या झुळकीने मंद मंद डोलणारा गुलमोहर पाहिला की रखरखणारे ऊन शितल होऊन जाते.गुलमोहराचा बहर पाहून हा सगळ्यात किती आगळा वेगळाये , असं मन म्हणतच.आपल्या दाट सावलीने तो प्रत्येक पांथस्थाला आश्रय देतो.वैशाखात एकही पानं नसलेला, केशरी-लाल फुलांची दाटी असलेला हा वृक्ष पेंटिंग करणाऱ्या पेंटरला स्वतःकडे आकर्षित करून घेतो.गुलमोहर लांबूनच ओळखू येतो कारण त्याचा साजच वेगळा!!.भर उन्हातही सुखद रंगश्रीमंती मिरवणारा हा गुलमोहर मनाला सुखद गारवा व तितकच सावलीने शांत करून जातो.चांगल्या सोसायटींमध्ये हा असतोच असतो.जणू त्याने आपल्या रंगवैभवाने ही जागा पटकावलीये.पुर्वीपासूनच श्रीमंत कॉलन्यांची श्रीमंती वाढवणारा हा वृक्ष रस्त्यातल्या वळवणावर सापडला की नकळतच उन्हाळ्यातही सुखद अनुभव देऊन जातो. गुलमोहराचे रूपडे त्याच्या पानांनी व त्याहीपेक्षा फुलांनी जास्त खूलवले आहे. कलाश्रीमंत वृक्षाची ओळख ही त्याच्या रंगरूपावरून  तर होतेच तसेच भर उन्हातही आपल्या अस्तित्वाने आसऱ्याला आलेल्या पांथस्थाला आश्रय देऊन जाणे या त्याच्या गुणामुळेही होते.

 हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो. झाडाखाली याच्या अनुभवलेली दाट सावली येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रसन्न करून जातात.

     खरंच आपल्या आयुष्यातही काही माणसं अशिच भेटतात गुलमोहरासारखी! स्वतःच्या वेगळेपणाने आपल्याला श्रीमंत करणारी.भर उन्हातही सावली देणारी.अशी माणसं काळाच्या ओघात नष्ट झाली तरी मनात मात्र आपलं स्थान कायम ठेवून जातात.अगदी हक्कानं आपलं स्थान पटकवतात. दिसायला,रहायला अगदी रूबाबदार व परोपकारी माणसांची ऐट अगदी या गुलमोहरासारखीच.वैशाखातही बहरणारी ह्यांची जगण्यातील श्रीमंती खरोखर भारावून टाकते.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न