आम्रवेलीतील श्री बाबा🙏
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
लेकीला माहेरी जाण्याची जशी ओढ असावी तशी मला बाबांच्या या आम्रवेलीतील दर्शनाची ओढ वाटते.कसं नी काय शब्दबद्ध करावं हे दर्शन..मनाला स्थावर सूख मिळवून देणारं हे बाबांचं स्थान म्हणजे साकुरीचं वैकुंठच आहे जणू! बाबांनी स्वतः तसं सांगितलं सुद्धा! पण खरं सांगू, ही जागा म्हणजे केवळ तिचे श्रेष्ठत्व सांगण्यासाठी नाही बरं का, तर ती आहे अनुभव घेण्याची.या जागेच्या दर्शनात किती नी काय सापडलंय मला हे मी स्वतःसुद्धा कधी मोजू शकले नाही.कारण मिळतं ते केवळ गाढ प्रेम!अनंत, अपार, अलभ्य, अस्फुट,अनिर्वचनिय,आध्यात्मिक,अलौकीक ..शब्दांनाही न सांगता येणारं असं..गोष्टी माणसाच्या कल्पनेतील असतात तोपर्यंत शब्द साथ देतील पण ..पण त्यापलिकडे? ते सुंदर, पवित्र, अत्यंत साधं, तपःपूत, मनाला गाढ शांती देणारं आश्रयस्थान म्हणजे आम्रवेली...मी जितक्या वेळा गेली असेल तितक्या वेळा हा अनुभव घेऊनच वापस येते.परत मायिक जगात येते जणू.तिथे लावलेलं ध्यान किंवा जप हा इतर कुठेही लावलेल्या ध्यानापेक्षा वेगळाच असतो.बाबा अत्यंत वत्सल भावाने आपली वाट पहात असतात..दरवाज्याची कडी काढुन आत आलं की समोरच बाबांचा गोणपाटधारी हसरा चेहरा सुखावून टाकतो.जणू बाबा म्हणत असावेत, 'ये , आलीस..तुझीच वाट पहात होतो'....बाबा कित्ती मायेने,प्रेमाने आपली विचारपूस करतात ते एक ह्रदयच जाणे..ती भेट म्हणजे जीवा शिवाची भेट!सद्गुरू माऊलीची व त्यांच्या बाळाची भेट! किती अब्द अब्द बोलतात बाबा आपल्या नजरेतून..करूणेचा पान्हाच ते नयन जणू..अमृतवर्षाव प्रेमाचा..धन्य धन्य ती गोदामां जीने आपले सर्वस्व या माऊलीवरून ओवाळून टाकले..शब्दात वर्णन होऊ शकत नाही.कितीतरी थकल्या भागलेल्यांना आधार देणारे वटवृक्ष म्हणजे बाबा!!त्यांच्या ह्रदयाकाशात प्रेमाचा जणू अथांग सागर भरलेला आहे.येणारा कोणीही असो, कसाही असो पण तो आपला आहे असे मानून वागणारे बाबा व गोदामां म्हणजे भक्तांचे शाश्वत चिरविश्रांतीधामच आहेत.
उपासनी बाबांचा फोटो लहानपणी घरात पाहिला होता,तेंव्हा तो उग्र व थोडासा रागिट भासल्याचे आठवते.खूप वेळ मी त्यांच्याकडे बघत होते.पण तेंव्हा विशेष काही ओळख पटली नाही.पण लग्न झाल्यावर वरचेवर साकुरीला येणं होतं तेंव्हा तेंव्हा बाबांचा सहवास हवाहवासा वाटत राहिला.बाबा,माताजी ही झोपडी हे चिरतरूण वैभव वैकुंठापेक्षाही अनमोल आहे.कारण इथे कोणीही आश्रयाला येऊ शकतं.कोणी कसाही असो आई बाबा त्याच्या उद्धाराची जबाबदारी घेतात..खरंच हे किती अवघड काम असेल.पण भक्तवत्सल माऊली आपल्या प्रेमळ स्वभावानुसार कोणालाही नाराज करत नाही.प्रत्येकाचे लाड,हट्ट पुरवते.जगात जर खरंच काय शाश्वत टिकत असेल तर हेच, हेच सद्गुरू प्रेम!!
गुरूबीन रहिये कौन बाटी।
मन पावना रे।।
हुशार होजा दौलत के संग।
जोरू लड़के ऐ भाई।
विपत्काल जब आय पडेगा।
सद्गुरू होय सहायी।।
जय सद्गुरू🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment