जय रघुनंदन जय श्री राम।
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
पंडीत भिमसेनजींचं 'राम का गुणगान करीये' ऐका की देवकी पंडीतांचं 'जय रघुनंदन जय श्री राम' ऐका किंवा 'कौसल्येचा राम बाई' किंवा संपूर्ण गीत रामायणातील कोणतेही गीत ऐका सर्वच गीतं ज्या रामप्रेमाने ओतप्रोत भरलीयेत त्याला तोडंच नाहीये.ही गीते केवळ गीते नाही तर भक्तीप्रेम व्यक्त करणारी, रामरायाला तन्मयतेने आळवणारी स्नेह कवनेच आहेत.ऐकतांना डोळ्यासमोर नकळत तो राम उभा रहातो..कसा होता राम? श्यामल तनू असलेला, ...मोठे मोठे कमळासारखे पाणीदार नेत्र असलेला,....विशाल भालप्रदेश,..... नासिका अतिसरळ,... ओठ तर लाल फुलाच्या दोन पाकळ्या एकमेकांवर ठेवाव्यात तसे सुंदर,... लालसर, पातळ ओठ,....गाल तर लालसर निळे,... कान तर शंखाकृती,...त्यात सुंदर कुंडले,... मस्तकावर सुंदर काळे केस,.... बाकी शरीराची वर्णने ही तर शब्दातीत, ...हातात धनुष्य बाण घेऊन सदैव भक्तरक्षणासाठी सज्ज असा माझा राम,... हात आजानुभूज, ...छाती भरदार व विशाल, ...अंगावर सुंदर गुलाबी उत्तरीय,...गळ्यात सुंदर सोन्याचे अलंकार, ...बाहू पिळदार,... अंगकांती निळसर सुंदर,... कमरेला शेला,.... पितांबरधारी,... लांबसडक पाय,.... भक्तांचे परम आदरणीय चरणद्वय, ....त्या चरणांशी भक्तांचे अंतःकरण कायम नतमस्तक होत असलेले...अशा या रघुनंदनाची सुंदर,सावळी,अतिलोभस,करूणेने ओतप्रोत भरलेली मुर्ती अंतर्दृष्टीने पाहिली असता राम किती किती प्रिय वाटतो ते कसे सांगावे? रामाला उपमा रामाचीच! इतका तो सात्विक, निरागस, भक्ताच्या डोळ्यातील आर्त भाव लगेच झेलणारा, आपल्या भक्तावर प्रेम करण्याची त्याची सहज प्रवृत्ती किती नी कशी वर्णावी?
तो मला नेहमी भावतो तो त्याच्या विशाल व पाणीदार डोळ्यांमुळे...ते नुसते तेजस्वी डोळे आहेत म्हणून नाही तर ते त्याच्या ह्रदयाचे दरवाजेच आहेत... तुम्ही प्रेमाने नुसतं त्याच्या डोळ्यात झाकून पाहीलं तरी तिथे ओसंडून वहाणारं करूणेचं पात्र दृष्टीस पडतं...तो दिसायला देव अवतार असला तरी मातृह्रदयी आहे...टचकन डोळ्यात पाणी येणारं ह्रदय ते!...संयम, सदाचार , संस्कार, नम्रता, वत्सलता , उच्च आदर्श या साऱ्या गुणांची तिथे जणू रासच रास पहायला मिळते.
राम रामायणात होऊन गेला नाही तर तुमच्या आमच्या घरात आजही उपस्थित आहे.रामाची श्रद्धेने उपासना करणाऱ्यांना खरोखर राम काही कमी पडू देत नाही.राम केवळ रामजन्मापुरता आठवायचा नाही तर रामाकरता राम 'जगायचा'..हो खरंच राम ' जगायचा' चारित्र्यवान, तरूण, शत्रूभंजक राम म्हणजे कुलशिलवंत, नितीमान पुरूषोत्तम आपल्यात रोज उतरावयचा..त्यासाठी राम रोज आठवायचा व चिंतनातून मनात बिंबवायचा..तो सहज मनात रेखाटला की पहिली पायरी साधते..मग हळूहळू सुखदुःखात साथ देत तो आपल्याशी अजून घट्ट नातं बनवतो..मग हटकून त्याचेच विचार मनात रूंजी घालतात..तो नित्य सहचर व परमप्रिय सखा कधी बनतो ते कळतच नाही...तीच रामप्रेमसुधा! तीची चटक लागली की मनरूपी भवरा रामरूपी कमळाला कधी सोडून जात नाही.त्याच्या अनुसंधानात, ध्यानात मन रंगून जातं..प्रेमाची, भक्तीची ती अनमोल किमया...
रामरंगी रंगले मन, रामरंगी रंगले
अशी ती भावोत्कट अवस्था!
रामाचा असा जन्म नित्य तुमच्या माझ्या ह्रदयात होत राहो हीच आजच्या दिवशी रामरायाचरणी प्रार्थना!
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सिताया पतये नमः।।
Comments
Post a Comment