"गणपती बाप्पा मोरया"


✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी


 वक्रतुंड महाकाय । सुर्यकोटी समप्रभ। 

निर्विघ्नं कुरूमे देव।सर्वकार्येषु सर्वदा।। 


       सर्व कार्यांची सुमंगल सुरूवात गणेशाच्या प्रतिष्ठापनेने होते. या मंगलमूर्तीच्या पुजनाने मन प्रसन्न होते, सर्व मनोकामना पूर्ण होतात. भक्तांचे लाडके दैवत म्हणजे गणपती. वेदांनी या गणेशाला ओंकाररूपात पाहिले. म्हणजे या जगाची सुरूवातच गणेशापासून होते असे त्यात म्हंटले आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवात करतांना  ज्ञानेश्वरांनीही याच मंगलमूर्तीची विनवणी केली आहे.प्रत्येक ग्रंथाची सुरूवात ह्याच मोरयाला स्मरून होते. याचे प्रमुख कारण ही सकल सिद्धींची, कलांची देवता आहे. गजाननाला आधी वंदन म्हणजे १४ विद्या, ६४ कलांना वंदन. या कलांना विद्यांना प्राप्त करून घ्यावयाचे असल्यास गजाननाची उपासना अत्यंत मोलाची आहे. हा सकल विद्यांचा, कलांचा स्वामी मनापासून केलेल्या उपासनेला तत्काळ फळ देतो. त्यामुळे तो भक्तप्रिय, भक्तवत्सल देव आहे. 

     गणेश म्हणजे गणांचा स्वामी, समस्त प्राणीवर्गाचा स्वामी. त्याचेच नाव गजानन, म्हणजे हत्तीचे मुख असलेला. या तुंदिलतनू मोरयाचे रूप विशालकाय आहे. एका हातात पाश, एका हातात अंकूश, एका हातात मोदक, एक हात भक्तांना अभय देणारा. ही चिन्मयमुर्ती सकल सृष्टीची देवता आहे. गणेशाचे वाहन आहे उंदिर जे मानवी मनाचे प्रतिक आहे. या मनावर बुद्धीचा अंकूश सदैव रहावा या करिता हे रूप पाहिले जाते. 

           महाराष्ट्रात भाद्रपदात  गणेश उत्सव साजरा होतो. त्याची मजा काही औरच असते. गजाननाची मिरवणूक पहाणे हा तर सगळ्या मराठी जनांचा आवडता कार्यक्रम असतो. आपल्या लाडक्या बाप्पाची १० दिवस पूजा करण्याची संधी सर्वांना मिळते. माझ्या लहानपणी आम्ही वेगवेगळे देखावे करून गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करायचो. खूप मजा यायची. समस्त जगाची देवता असणाऱ्या गजाननाची पार्थिव रूपात पूजा करण्याची संधी भक्ताला नवा उल्हास नवी उमेद देते. मनाला आलेली मरगळ त्यामुळे नाहिशी होते. 

             गजाननाची अनेक नावे, अनेक स्तोत्र, अनेक ग्रंथ आहेत. गणपती अथर्वशीर्ष हे नित्य कल्याणकारी स्तोत्र आहे. त्याच्या पठणाने सर्व क्लेश, समस्या, संकटे दूर होतात. गणपती भक्तांच्या हाकेला ओ देतोच. गजानन भक्तांची संकटे दूर करोत व या कोरोनातुन सर्वांची सुटका होवो. 


     गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न