मन


✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी




मन वढाय वढाय

उभ्या पिकातलं ढोरं

किती हाकला हाकला 

फिरून येतं पिकांवर


किती मार्मिकपणे बहिणाबाईंनी मनाचा करामती स्वभाव ह्या कवितेतून उलगडत नेलाय...विचार केला तर खरंच जाणवेल की आपलं मन कोणी कधी बघितलंय का हो? कधी स्पर्श केलाय त्याला? का कधी त्याची उंची खोली मोजलीये? किती व्यापक व किती खोल ही परिमाणं तर मेंदू ठरवेल तेंव्हा कळतात.पण मन मात्र खरंच न उलगडणारं कोडंच रहातं..ना त्याला रंग रूप ना त्याला कुठले अवयव...न दिसताही स्वतःचे अस्तित्व जाणवून देणारं हे मन म्हणजे अगम्य तरीही मानवाला मिळालेली परमेश्वरी देणगीच!

   जरी मन दिसत नसलं तरी त्याचे अस्तित्व कोणताही मनुष्य नाकारू शकत नाही.ते आपल्या सोबत सतत असतं...जन्माला येतो तेंव्हापासून ते मरेपर्यंत साथ देतं...किती सुक्ष्म त्याचं असणं...लहान मुलाचे मन खरंच किती निष्पाप, कोवळं...पटकन बाहेरच जग स्विकारणारं!...तेच तरूणवयात जणू सुरवंटाचं फुलपाखरू झाल्यासारखं चंचल बनतं..किती भाव विभाव त्याला लाभतात...सुंदर,मयुरपंखी कधी इंद्रधनुष्यासारखं ..एकाच पांढऱ्या रंगातून निर्माण झालेले सप्तरंग जसे तसे मनाचे तरूणपणीचे रंग!! अहाहा!!! प्रेमात पडणाऱ्या रोमँंटिक तरूण तरूणींचे असो की लग्न झालेल्या जोडप्यांचे असो...मनातील तरल भावना किती विविध रंगांच्या!! निराश, दुःखी मनाचेही किती किती खोल ,गहन शेड्स..आनंदाने ओसंडून वहाणारे मनही तेच नी दुःखाने कधी वेडेपीसे झालेलेही मन तेच!किती अनाहूत मनाचे रूपडे...त्याला भोवतालची दुनिया वेडं म्हणतेही पण ते असतंही तितकच संवेदनशिल, भाबडं, सहज, चंचल...त्याला लगामाची आवश्यकता असते हेही खरंच...नाहीतर वहावत जाऊन जिवननौका डूबून जाईल ..

          मन संवेदनशील, भावना जपणारं, स्वच्छ, निखळ असणं ही खऱ्या माणसाची खूण...देवालाही अशी पारदर्शी माणसे आवडतात...म्हणूनच मनाला शिकवण देणारे २०५ मनाचे श्लोक समर्थांनी सांगितले ते याचसाठी...मनाचा गुंता वाढवला तेव्हडा वाढेल..पण उकलला तर सुखद परिणाम मिळेल...

    मनाचिये गुंती गुंफियला शेला।

    बापरखूमादेवीवरे विठ्ठले अर्पिला।।मोगरा फुलला।।


हे संत ज्ञानेश्वरांनीही लिहून ठेवलंय..देवालाही फुलापेक्षा ते मनचं वहा..ते त्याला विलक्षण प्रिय आहे.माणसाजवळ खरंच त्या मनाशिवाय देवाला देण्यासारखं दुसरं काय शेष रहाणार? आपणही देवाला मन देऊन टाकावं..म्हणजे त्याची शुद्धी आपोआपच होते..हरीनाम हा चिंतामणी मनात ठेवला तर मन उन्मनी अवस्थेला जाईल व शेवटी मनाचं अस्तित्व देवातच विलीन होऊन जाईल..कारण परमात्मा हा केवळ मनाने साधणार नाही तर मन जेंव्हा "न-मन" होईल तेंव्हाच तेथे आत्मप्रचिती येईल..

      मनाला चिंतनाची सवय लावून घ्यावी म्हणजे मन दिशाहीन भटकणार नाही.त्याला ईश्वराच्या चरणावर वाहीलेलं फुल जाणून रहावं..नी मग शाश्वताची भेट सुनिश्चीत होईल...नित्य सत्यसंकल्प असेल तर ही नमन अवस्था घडत राहिल..व एकदाची जीवाची शिवाशी भेट होईल...मन ते नमनचा हा प्रवास घडो व मी अंतिम स्थानी पोहोचो, हीच परमेश्वराला प्रार्थना करूया!!

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न