माझे पालकत्वाचे प्रयोग
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
काही गोष्टी स्वतः अनुभवल्या व स्वतः केल्या कीच जास्त चांगल्या कळतात, असाच काहीसा हा पालक होण्याचा व मुलींना घडवण्याचा अनुभव!मला दोन्ही मुली..आजच्या काळातील पालकांना आवडणारी व प्रिय गोष्ट म्हणजे तुम्हाला "मुलगी" असणे.पहिली "ओवी" जन्माला आली तेंव्हा नवरा जाम खूश झाला होता.अख्ख्या हॉस्पिटलमध्ये जिलबी वाटली.ओवी जशी जन्मली तेंव्हा फक्त १ सेंकड रडली असेल..आणि दुसऱ्याच क्षणाला आपले मोठ्ठे मोठ्ठे काळेशार डोळे टूकटूक करत आजूबाजूचे जग पाहू लागली..ती जन्मली नी मी हुश्श केलं..कारण माझी ती नॉर्मल डिलीव्हरी...दिवसभर कळा सोसून दुपारी ३.४० ला ती जन्मली..खरं सांगते पण ओवीला घडवतांना फार त्रास कधी झालाच नाही..ती मुळातच समजुतदार,अभ्यासू,शांत...तीला आजारी पडू नये म्हणून मात्र खूप काळजी घ्यावी लागली.एकदा डेंग्यू, एकदा मलेरिया अशा आजारपणातून ती व आम्ही गेलो.तीची लहानपणापासून खूप काळजी घेत आलो..
दुसरी आर्या मात्र तब्येतीने कडक..तीची कधी काळजी नाही वाटली..तिला वाढवतांना एक गोष्ट कळाली की तिच्या अंगी बरेच मुलांचे गुण आहेत...अगदी कणखर..घरातली छोटी छोटी कामं ती वयाच्या तिसऱ्या वर्षापासून करते..आणि अगदी धिटूकली..
मुली म्हणून दोघीही समजुतदार आहेत ही पालक म्हणून मला समाधानाची बाब वाटते.मुलींची छोटी मोठी आवड जपतांना त्यांनी सात्विक, पौष्टीक अन्न खावं हा आई म्हणून माझा अट्टहास.त्या दोघींना बाहेरच्या फास्टफुडची सवय लागू नये याची मी आई म्हणून खूप काळजी घेते.त्याही बाहेरचं जास्त कधी मागत नाहीत.पोळी भाजी,मेथीचे पराठे,पुऱ्या,मोदक,साधा वरण भात हे त्यांचे आवडते पदार्थ आहेत.त्या अजुन लहान आहेत म्हणून प्रयोग यशस्वी होतात.पण भविष्यातही त्यांनी सकस अन्न खावं असं मला मनोमन वाटतं.अन्नाने मन घडते असा संस्कृत श्लोक आहे.मलाही त्यांची मने व शरीर सुदृढ व बलवान बनवायचे आहे.जगतांना येणाऱ्या चढउतारांसाठी त्यांना तयार करायचे आहे.त्यांचा अभ्यास घेतांना एक गोष्ट कळते ओवीची व आर्याची स्मरणशक्ती चांगली आहे.ओवीला ९ -१० संस्कृत श्लोक तसेच ३ मनाचे श्लोक पाठ आहेत.आर्या माझी हार्मोनियम वाजवण्याचा प्रयत्न करते.माझ्यासारखं नटण्या-मुरडण्याची हौस दोघींमध्येही उतरलेली बघून मजा वाटते.आर्या ४ वर्षाची व ओवी ७ वर्षाची...पण स्वभाव मात्र खूप वेगळे..मला आई म्हणून ओवीतला समंजसपणा व आर्यातला नटखटपणा दोन्हीही सुखावतात.त्या अस्मानीच्या पऱ्याच आहेत असे फार वाटते..जग निर्माण करणाऱ्यालाही अवकाशाच्या भव्य पोकळीत असंख्य तारे निर्माण करतांना पाहून देवाला म्हणावे वाटते-
घरात हसरे तारे असता ,पाहू कशाला नभाकडे।माझ्याच घरी बागडती-हसती तुझे चंद्र तारे।।
Comments
Post a Comment