आठवणी  सुखदुःखांच्या..


-सौ. स्वरूपा कुलकर्णी


   आठवणी ह्या कधी कधी फार चिवट असतात.मनाच्या कुपीत घट्ट घट्ट रूतून बसतात नी आपल्या परवानगीशिवाय मनावर अधिराज्य गाजवतात.मन त्यामुळे अस्वस्थ सैरभैर होतं.टचकन् डोळ्यात पाणी येतं.काहूर करणारे वादळ वाहू लागतात.मनाची नौका त्या वादळात आधार शोधू लागते.तो आधार त्याला नेहमीच मिळतो असेही नाही.. मिळाला तर एखादी कलाच मदतीला धावत येते..संगीत, नृत्य, नाट्य,  चित्र, लेखन, गायन...कितीतरी..कला हाच बऱ्याचदा आधार होतो.बैचेन मन आपल्या कलेला साद घालते.तेंव्हा त्यातुन नवनिर्मिती होते.या आठवणी कडू गोड कशाही असल्या तरी जेंव्हा कलेतून मनाला आधार शोधला जातो तेंव्हा कलेच्या प्रांगणात अनेक चमत्कार होतात.

      आठवणींनी मनात घरोबा केला की पावसाळा नसतांनाही मन पावसात भिजतं, थंडी नसतांनाही हुडहूडतं... किंवा उन्हाळा नसतांनाही चटका बसावा अशी अवस्था होते.मनाला आठवणींचा विरंगूळा कधीकधी हवासा वाटतो.पण नकोशा आठवणी मात्र अजूनच कठोर परिक्षा पहातात.दुःखद आठवणींपेक्षाही नकोशा स्मृती अजूनच अस्वस्थ करतात.मनुष्य कायम या विरहाच्या किंवा मृत व्यक्तींच्या आठवणीत अश्रू ढाळतो.तो स्मृतींना घातलेला अभिषेकच म्हणेन मी.!!किती नी काय व्यक्त होतं त्या सलणाऱ्या दुःखात...अबोल, ह्ऱदयात खोलवर दडपून ठेवलेली वेदना आपल्या जखमा लपवत ती व्यक्ती कसेबसे संयमाचे बांध घालून स्वतःशीच संवाद करत सावरत रहाते.हे तिचे सावरणे म्हणजे प्रेमाची जहरी जखम फूंकरणे असते किंवा जुन्या घटनांचे घट्ट आवरण बाजूला करणे असते..

     आठवणी कुठल्याही छोट्या गोष्टीतून प्रगट होतात..एखादा छोटा कागदाचा तुकडा, जुनी ओढणी,जुनी पत्रं,अल्बम, आईने दिलेली साडी, बाबांचा आवाज, चित्रांतील व्यक्ती, फोटोतील प्रसंग एक ना अनेक ..स्मृती ह्या मानवी मनाला भूतकाळात घेऊन जातात.पण वर्तमान त्यांना परत जागेवर आणण्याचे पाश टाकतात.या रस्सीखेचमध्ये बऱ्याचदा स्मृती जिंकतात.मन मागेच रेंगाळतं..जनू अधूंच होतं...त्याची उमेद गायब होते..मनाचा हा पाडावा नेहमीच होतो असे नाही पण आठवांची ताकदच एव्हडी प्रचंड असते की भल्या भल्यांनाही जगणं संपवून टाकावं वाटतं.जगणं नकोसं होतं..

      सुखद आठवणीही क्षणभर डोळ्यात पाणी आणतातच.कारण कदाचीत ती गोष्ट परत कधीच मिळणार नसते...ती आठवण मनातूनच जपून ठेवावी लागणार असते..त्यातच समाधान मानावं लागणार असतं..

     मन हे वेडं कोकरूच जणू...आठवणींच्या हिंदोळ्यावर हिंदकळत रहातं..


     यादे मधलं हे गीत माझं फार आवडतं..


 नगमें है , शिकवे है,


 किस्से है, बाते है।


बाते ...भूल जाती है।


यादें ....याद आती है।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न