*गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला


गणनायका तू महागणपती

विघ्नेश्वरा तू मंगलमूर्ती,

भक्तांची तू इष्टदेवता

मोरेश्वरा मी नमीले तुजसी।।


जास्वंदीची फुले वाहिली

वरी दुर्वांकुरे शोभली,

मोदक प्रिय बहू तूजला देवा

मखरी बैसला तू गणराया।।


विनायका तू घरा येसी

दहा दिवस ती आनंदाची,

भक्ती-सुमने तुला वाहिली

लंबोदरा तू विघ्ने हरशी ।।


आरती पुष्पांजली गाती सारी

नवचैतन्याची सळसळ झाली,

मने ही सारी भक्तीत नाहली

बाप्पा आगमने चिंब भिजली।।


भक्ती शक्ती दाता गणपती

रिद्धी सिद्धी वरदायक तुची,

लक्ष्मीदेवी तुझ्या संगती

विद्यादेवी प्रसन्न हसली।।


वंदितो महागणेशा तुजसी

तुझी छत्रछाया मजवरी,

वरदहस्त राहो माथी

गणराया हे आशिष देशी।।


जागर तुझ्या नामाचा अन्

घरोघरी गीतगायने,

आबालवृद्ध रंगून गेले

कसे कळेना दिस हे सरले।।


तू निघाला परतण्यासी

किती कासाविशी मजला होई,

मन झाले अनावर आता

आठवण ठेव बाप्पा आमुची ।।


तू आला धूमधडाक्यात

तू चाललास धूमधडाक्यात,

निरोप देतांना मात्र तुला

बाप्पा गलबलले मी मनात।।


पाऊस हजर तुझ्या समोरी

जणू भेटण्या आतूर तोही,

कसे नी किती गुंतलो देवा

ताशा नी वाद्ये नाचती समोरी।।


तू भक्तवत्सल देवा गणेशा

सोडून आम्हा निघालास गावा,

मन लागले चरणांशी तुझिया

अश्रू अनावर होती आता।।


तुझी लेकुरे आर्त सारी

नको विरह आम्हा जराही,

तू निघाला दुःख होते जीवाला

रिकामा मखर उदास पाही।।


चैन मजला नसे जराही

तू चालला आपुल्या रे गावी,

पुन्हा लवकर ये भेटण्यासी

विरही मन व्याकूळ होई।।


नयनी दाटले अश्रू किती

बाप्पा विसरू नको मजसी,

वाट पाहू तुझी पुन्हा पुन्हा

आनंद वाटतोस तू अनोखा।।


आभाळ भरलं तू येतांना

डोळे भरती तू जातांना,

निरोपाला समुद्र उचंबळे

कशी ही लीला बाप्पाची।।


तुझ्या आगमने कार्यसिद्धी

तुझ्या निरोपात कार्यपूर्ती,

नको रे विरह वर्षाचा देवा

लवकर लवकर भेटीस येसी।।


जाण्यास निघाला गणेश माझा

खिन्न मनाने नमितो तुजला

गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या।।


-सौ. स्वरूपा कुलकर्णी,राहाता, अहमदनगर

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न