मला समजलेला पांडूरंग


- सौ. स्वरूपा कुलकर्णी


      विठ्ठल, पांडूरंग, पंढरीनाथ, विठू, सावळा, अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा विठोबा म्हणजे आपलं आवडतं दैवत!! किती सहजपणे आपण त्याला अरे विठ्ठला, सख्या पांडूरंगा अशी साद घालतो.तोही तितक्याच तत्परतेने भक्ताच्या हाकेला ओ देत आलाय.अगदी युगानुयुगे कमरेवर हात ठेवून दर्शन देत राहणारा विठ्ठल म्हणजे आपल्या सुखदुःखांचा साक्षिदार!त्यातून सोडवणारा सखाही तोच..मानवाला त्रस्त करणारी ती माया म्हणजे त्याची अखंड दासी! माणसाला कर्मबंधनातुन विठ्ठलाचे स्मरण करून देणारी ती मायादेवी म्हणजे त्याची चरणदासी! देवाच्या तालावर नर्तन करणारी ही माया ही आपली परिक्षाच घेत असते.पण त्याला एकदा आपलंसं करून घेतलं की माया नष्ट होते.उरतो तो फक्त भगवंत! सगुण- निर्गुण परमात्मा कळायला भाग्य लागतं.संतांनी ते जाणलं..हे पंढरीचं सावळं ध्यान त्यांनी तनमनात मुरवलं..सखा पांडूरंगाला कडकडून मिठी मारली नी ऋषीमुनींनाही दुर्लभ ते परमात्म तत्व याची देही याची डोळा अनुभवलं..कसं होतं ते रूप? सावळे चरणकमल..त्यावर चंदनाची उटी, पायघोळ पितांबर नेसलेला, निळंशार उत्तरीय घेतलेला, नाभी  अतिशय सुंदर, वक्षस्थळावर वत्सचिन्ह, बाहूंना बाजूबंद,  हात कमरेवर,कानात मकरकुंडले,सावळ्या देहावर चंदनाची उटी, गाल आरक्त वर्णाचे, ओठ लाल जास्वंदी , डोळे तर सर्व जगातील तेज जणू एकत्र कोंडलं तर समजेल असे परमतेजस्वी नेत्रद्वय...लांबसडक पापण्या, कपाळी उभं कस्तुरीतिलक, गळ्यात कौस्तुभमणी, अंगावर जाणवं, कोटीकोटी सुर्यांची आभा सर्वत्र पसरलेली.खरंच त्याच्या रूपाचं वर्णन शब्दात बांधणं कधी शक्य आहे का?तो  कधी विचारांना, बुद्धीला संपूर्ण कळू शकणारा आहे का? तर खरोखरंच नाही..पण साधूसंतांनी त्याला आपल्यापर्यंत आणलं..अगदी हात धरून!..तो जगाचा पालनकर्ता , मायबाप, सर्वांचा गुरू..त्याला साधं सोपं केलं ते ह्या संतांनीच..त्याच्या भक्तांनीच! 

          देव माझा वाटतो ते त्याच्या लीलांनीच...त्याच्या अवतारातुन गवसलेला तो म्हणजे सर्व भक्तांच्या जिव्हाळ्याचा विषय.. पांडूरंगाची मुर्ती पंढरीच्या देवळात आहे पण खरा पांडूरंग तर सृष्टीच्या चराचरात, कणाकणात व्याप्त आहे.तो नाही अशी जागाच नाही..माया हे त्याच्याच शक्तीचं रूप..त्याने मांडलेला हा खेळ रंजक नी अखंड चालणारा..भक्ताला जाणवणारा देव विठ्ठल मंदिरापुरताच संकुचित नसून  तो संपूर्ण विश्वात सामावलेला परमात्मा आहे हे सत्य आहे..ही मेख समजून घेणाराच खरा त्याचा भक्त किंवा संत..बाकीच्यांसाठी हा मायेचा बाजार म्हणजे प्रपंच हेच सत्य आहे.त्यांना परमात्म्याचे खरं रूप समजू शकत नाही. 


       देवं देव्हाऱ्यात नाही।

       देवं नाही देव्हारं।।


    देव समजून घेण्यासाठी गेलेला प्रत्येक पुण्यात्मा पुढे देवरूपच झाला हे देव व भक्ताचं अद्वैत आहे..देव रंग, रूप, गुण याहून निराळा पण भक्तासाठी सावळं, सुंदर रूप धारण करणारा पांडूरंग आहे.आषाढी- कार्तिकीला पांडूरंगाचे दर्शन केलं की कृतकृत्य वाटणारे पुष्कळ आहेत.पण चराचरात पांडूरंग पहाणारे भक्त विरळच...देव समजला असं वाटता वाटता तो मनाच्या व बुद्धिच्या कक्षेबाहेर कधी जातो ते कळतंच नाही हीच खरी गंम्मत आहे..मी मी म्हणवणारे लोक त्याचा अनुभव आल्यावर गप्प होतात..खरंच तो किती अनंत, अफाट, अमर्याद..पण छोट्याशा देवळातील समईतही मंद मंद तेवत असतो...संपूर्ण विश्व ज्याचे वसतिस्थान तो माझ्या ह्रदयातही रहातो हे किती विलक्षण सत्य आहे..जगाचा मालक माझ्या ह्रदयाचही संचलन करतो..किती मोठा त्याचा संसार व पसारा..तरीही कुठेही जा जग निरंतर कार्यमग्नच सापडतं..चलनवलन करणारं..

  म्हणूनच वाटतं हा विठ्ठल काही साधासुधा नाही..त्याला अनन्य भावाने शरण जावं व त्याच्यातच एकरूप व्हावं..

          बोलावा विठ्ठल।

           पहावा विठ्ठल।

           करावा विठ्ठल।

           जिवभावं।।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न