माझे बाबा
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
आपल्या मनात लहानपणापासुन काही नाती किती निशःब्दरित्या एखाद्या गुपिताप्रमाणे लपलेली असतात,जणू त्या नात्यांच अस्तित्व आपलं संपूर्ण जग व्यापूनही परमेश्वरासारखं लक्षातही न येण्यासारखं अदृश्य असतं....माझे बाबा...हो खरंच, या व्यक्तिचं माझ्याबाबतीत अगदी तस्सच नातंय...फार नाजुक,स्नेहार्द,मायेचं,अलवार जपणूक करणारं,फार निरागस ...
माझे बाबा माझ्यावर रागावले का कधी?असं आठवण्याचा प्रयत्न केला तर फारच कमी वेळा..कारण मी त्यांची लाडकी रेणुका...पहिली मुलगी,माझ्या आधी एक मुलगा जन्मला नी काही दिवसातच निमोनियाने गेला...त्यामुळे त्याच्यानंतर जन्मलेलं मी पहिलंच अपत्य....मी जन्मल्यानंतर बाबांना सर्वात जास्त आनंद झाला होता असं आई सांगते...मलाही बाबाच आईपेक्षाही जास्त आवडायचे व आजही आवडतात...त्यांचा संपूर्ण स्वभावच "सालस" या एका शब्दात सांगण्यासारखा आहे...त्याबरोबरच हुशार,देवभक्त,प्रेमळ,अतिशय मृदू व शालिन स्वभावाचे माझे बाबा आईचे मनापासुन सर्वकाही ऐकणारे प्रिय जिवनसाथीही आहेत...
मुलगी तशी नकळतच बाबालाच आपला आदर्श मानत असते..तिचे हट्ट,लाड बाबाच तर पुरवतो..किती ते प्रेम , ती माया...धरती वरचा स्वर्ग म्हणजे बाबाचे निरागस प्रेम,लाड...बाहेरच्या कोणीही थोडसं जरी आपलं कौतुक केलं तरी जीव सुपासारखा होणारा बाबाचा स्वभाव कसा वर्णावा?...आई ही प्रेम करेलच पण बाबाची मुलीविषयीची तळमळ,संवेदना फारच वेगळी...मुलीच्या डोळ्यात अश्रु येतांना तो काहीकेल्या पाहू शकत नाही...इतकं गाढ प्रेम..शब्दांच्याही पलिकडचं...पाठीवर लहानपणी केलेली साखरेच्या पोत्याची सैर विसरताच येणार नाही...भलेही मुलगी कितीही मोठी असो...लहानपणी बाबांनी आणलेली चॉकलेट,ड्रेस,खाऊ सगळं आजही लक्षात रहातं...का?आज नवरा कौतुक करत नाही का? ती स्वतः कमवत नाही का?तर हो नवरा कौतुक करतो,लाडही करतो पण ,पण..शब्द इथे अडखळतात...बाबांनी आणलेली ती चॉकलेट,खाऊ,ड्रेस या सगळ्यांना जो मायेचा परिमळ असायचा ना त्यात निष्पाप,निर्भेळ,खोल खोल प्रेमाचं एक अनोखं वेष्टण होतं...ती वस्तू केवळ वस्तू नसुन आनंदाचं कोंदण असायचं...बाबांनी फक्त माझ्यासाठीच आणलेल्या गोष्टीची किंमत स्वर्गीच्या अमृतालाही नसणार असं तेंव्हा वाटायचं...
माझे बाबा स्टेट बैंकेत नोकरीला होते...सगळी नोकरी त्यांनी अत्यंत निष्ठेने, मध्ये आजारपणं असुनही नेटाने सांभाळली...कितीही त्रास झाला तरी बैंक सोडून दिली नाही..आमचा विचार होताच !माझे बाबा आईप्रमाणे देवावर भोळेपणाने प्रेम करणारे कधीच नव्हते व नाहीत...त्यांची अध्यात्मिक बैठक मोठी आहे..मी स्वत्ःही ती समजायला पात्र नाही...बाबा संतत्व घेऊनच जन्माला आले आहेत असं नेहमी वाटतं...उच्च दैवी आदर्शवाद व ईश्वरनिष्ठा हे त्यांच्या जीवनाची सुत्र आहेत..एव्हडं असुनही अतिशय साधी रहाणी व साधा सरळ स्वभाव ही त्यांची ओळख..
त्यांनी व आईने खरंच जगण्याचं सुत्र समजुन घेतलं कारण मानवी कर्तुत्व हे परमेश्वरी अधिष्ठाण असल्याशिवाय पूर्णत्व मिळवू शकत नाही हे सत्य आहे...मलाही ते गवसतंय...हे त्यांचेच आशिर्वाद..
त्यांना रडतांना मी फार कमी वेळा पाहिलंय...एकदा माझे आजोबा वारले तेंव्हा,एकदा माझ्या आत्याचे मिस्टर गेले तेव्हा व शेवटचं मला सासरी पाठवतांना...काय नी कशी अवस्था झाली त्यांची..धड रडताही येत नसलेले माझे प्रिय बाबा नुसते स्फुंदत होते...ते रडले तर मीही रडेल या भितीमुळे स्वतःला नामुष्कीने सावरत होते..ही त्यांची अवस्था पाहुन मीही स्तब्ध झाले..त्यांना त्रास होतोय हे ओळखून स्वतःला सावरत होते...त्या १०-१५ मिनीटात ते किती बोलून गेले...नाही सांगता येणार..बापच तो..न बोलता येणार निशःब्द, वेदना देणारे भाव आपल्या अश्रुतून सांगुन रिता झाला..पहिल्यांदाच व शेवटचं..मी आजही त्या आठवणीने शहारते की बाबा कसे व्यक्त झाले...बापरे नको तो प्रसंग आठवायला,असं होतं...
माझ्या सगळ्या शैक्षणिक,साहित्य,कला या क्षेत्रात लहानपणापासुनच बक्षिस मिळवल्यावर सर्वात जास्त खूश होणारे बाबा आजही मला प्रोत्साहन देतात...त्यांना खोटा,नाटकी अभिनिवेश कधिच जमला नाही,ते कायमच पारदर्शक स्वभावाचे आहेत..जसं मनात तेच तेच चेहर्यावर व बोलण्यात...कोणाची निंदा नाही की अपशब्द नाहीत..ते नेहमीच माझे आदर्श पिता राहीले आहेत..माझा भाऊ मात्र आधिपासुनच आईचा लाडका ..लहानपणी खोडकर होता..बाबा त्याला बर्याचदा बोलायचे,रागवायचे,मारायचे सुद्धा पण मी,मी मात्र कायम लाडच अनुभवले..न बोलताही बाबांना रागवता यायचं,त्यामुळे त्यांचा आजचा अवतार ओळखूनच वागायचे..पण ते काही जास्तवेळ नसायचं,ते परत लगेच पुर्वपदावर यायचे...मी कमीवेळा बोलणी ऐकली हे खरं असलं तरी बाबा आपल्यावर चिडले हे समजलं तरी डोळ्यात गंगाजमुना गोळा व्हायच्या व आजही होतात..
आई व बाबांसारखे दैवत सार्या जगात नाही हे खरंच शब्दशः खरंय...परमेश्वराने एव्हडे प्रेमळ आई बाबा दिले आहेत की त्याची सर त्यालाही नाही असं म्हणेन व परत जन्माला घातलंस तर त्यांच्याच पोटी घाल अशी मनोमन प्रार्थना करेन...Love you BABA...😘
Comments
Post a Comment