माझिया मना...
✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी
सर्रकन तिने खिडकीचा पडदा बाजूला केला...आता बेडरूममधला प्रकाश वाढला... मोबाईलवर तिचे आवडते आशाबाईंचे गाणे चालू होते, माझिया मना, जरा थांबना, पाऊली तुझ्या माझिया खूणा.....'
नुकतेच न्हयल्यामुळे ओले झालेले तिचे लांबसडक, काळेभोर केस तिने अलगद समोर घेतले... तीने आरशात बघितले... लग्न झाल्यानंतरचे तिच्यातिल बदल तीला जाणवले...गोरापान सुंदर, टवटवीत चेहरा, सुंदर मोठे डोळे, गुलाबी ओठ,कोणीही प्रेमात पडावं असं गोड हसू...मग तिचं लक्षं गेलं, कपाळावरील थोडीशी मोठी टिकली., सोन्याचे कानातले, गळ्यातलं मंगळसुत्र.. नविनच शिकलेली नी सावरायला थोडी कठीणच वाटणारी साडी, त्याचा सुंदर पदर, नविन लग्न झालेल्या तिच्या चेहर्यावरील नवी नव्हाळी ...ती हे सगळं भान हरपून पहात होती...लग्न झालेल्या सईचं हे नवं रूपडं बघून ती स्वतःशीच हसून लाजली... मनात विचारांची गर्दी झाली...लग्न होऊन एक महिनाच झालेला पण अजय तिला फुलासारखं जपत होता.. सासरही तीला जपणारं होतं.. प्रेमळ, समजुतदार माणसं... मोठं घर, नोकचाकर, घर सुखवस्तूच.. ती तशी माहेरची एका शिक्षकाची मुलगी... परिस्थिती ठीकठाकच.. पण लाडाकोडात वाढलेली... आई-बाबांचा जीव की प्राण असलेली... ती घरात मोठी...पाठीवर एक भा़ऊ .. लग्नात पाठवणीच्या वेळी स्फूंदून स्फूंदून रडणारे तिचे बाबा तिला आठवले नी ती क्षणभरात हमसून हमसून रडू लागली... माहेरच्या आठव़णीने तीला गहीवरून आले..आता 'माझिया मना' हे गीत तिला सहन होईना...सई मुळातच मनाने हळवी अन् बाबांच्या आठवणीने अजूनच हळवी झाली... आई -बाबांचे प्रेम आठवून तीला अधिकच दाटून आले... आता मात्र न रहावून ती तोंड झाकून आरशासमोर रडू लागली .... खोलीत इतक्यावेळ तीच होती.. खोलीचा दरवाजा पूर्ण लावलेला नव्हता...तिच्या नकळत 'माझी सईराणी' म्हणत अजयने दोन्ही हात पूढे करून मागूनच तिला विळखा घातला... पाठीमागून झालेला त्याचा स्पर्श तिला शहारून गेला... तिने तशाच अवस्थेत डोळे पुसले...कसेबसे स्वतः ला सावरत असतांना तीला तिच्या सुस्नात रूपात पाहून अजय अगदी खलास झाला...तिचा मुळचा गोरा रंग त्याच्या धसमुसळेपणाने अधिक गुलाबी झाला.. तीची अवस्था क्षणभरात बदलली... ती मोहरली कारण तिला मनापासून जपणारा तो तिच्यी पाठीमागून मिठी मारून तसाच उभा होता...तिचं रूप आरशातून बघत..अगदी तन्मयतेने... ती सावरली... लाजली... तो अधिकच खूश होत तीला आरशात बघत 'सई, प्लिज दे ना... एकदाच' त्या क्षणाला ती त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत होती... अधिकच ती मिठी आवळली जात होती... त्याला कसं आवरायचं या विचारात पडलेली ती अन् 'स ssss ई' हॉलमधून आवाज आला...ती कच्चकन त्याच्या हाताला चावली...तो त्या अनाहूत वेदनेने क्षणभर विव्हळत मागे सरकला...सासूबाई हाक मारत होत्या... तशी धावतच ती खोलीतून बाहेर पडली.. 'आले आई' म्हणतच पायर्यांवरून खाली आली..सासूबाई तिची वाट पहात दाराशीच उभ्या होत्या... 'अगं तुझं कुरिअर आलंय रत्नागिरीहून' ते शब्द कानावर पडताच तिची कळी खूलली... माहेरहून काहीतरी आलंय हे कळताच ती आनंदली...ते पाकीट फोडून पाहिलं तर तिच्या बाबांनी तिचा लहानपणीचा अल्बम पाठवला होता... काही मिनीटांपूर्वी बाबांची आलेली आठवण व आता हातात असलेला अल्बम तीला विलक्षण योगायोगाचं वाटलं... जणू बिनतारी संदेशच बाबांना मिळाला... 'काय आलंय गं? ' सासूबाईंच्या चौकशीने विचारलं..भांबावून वर बघत ती अडखळतंच 'अल्बम' असं म्हणत रडवेली झाली.. तशा तिच्या प्रेमळ सासूबाई जवळ येत तिला डोक्यावरून हात फिरवत 'आई बाबांची आठवण आली होती का? बघ त्यांनाही तुझी आठवण आली किनी?'...'तिने रडतच त्यांना मिठीच मारली... 'रडू नकोस'त्या समजवत होत्या... इतक्यात 'अच्छा म्हणजे मॅडमच्या घरून काही खास आलंय वाटतं? ' मनातले भाव चेहर्यावर न आणता अजय बोलला... तशा सासूबाई'हो तिचा अल्बम पाठवलाय तिच्या बाबांनी' तेंव्हा हसतच तो अल्बम तिच्याकडून हिसकावून घेत तो सोफ्यावर जाऊन बसला... तिच्याकडे मुळीच लक्ष न देता अल्बम उघडून बघत तो खो खो हसू लागला.. कारण पहीलाच फोटो तीचा लहानपणीचा, रडका चेहरा असलेला... तो तिच्याकडे फोटो दाखवत 'बघ तु लहानपणी रडूबाई होतीस तशीच आजही आहेस... ' सासूबाई 'बघू' म्हणत अल्बम पाहू लागल्या.. 'अगं, खरंच की'त्याही हसू लागल्या... सई मात्र कांडकोंडी झाली.. कारण तिला हसता येईना व रडताही... मग ते दोघेही शांत झाले... अजय तिला सॉरी म्हणत तिच्याकडे गंभीरपणे बघू लागला... ती संकोचून 'हो आहे मी अशीच रडूबाई'असे म्हणत अजून रडू लागली... यावर अजय हसू दाबत असतांना सासूबाई मात्र तिला सावरतांना तीची बाजू घेत ' काय रे, का तिला चिडवतोस, तू पण लहानपणी रडूबाईच होतास' आई आपल्याबद्दल चुकीचं बोलतिये हे ऐकून अजय 'आई, काहीपण बोलतेस, मी कधी रडूबाई होतो' यावर सासूबाई मोठ्ठे डोळे करून ' हो तर, कीती रडका होतास, खेळण्यांसाठी रडायचास तो' यावर 'हो हो, होतो मी पण रडका'अस म्हणत अजय सईकडे बघू लागला.. त्या दोघांचा तो संवाद ऐकून तीला खळखळून हसू आलं... तीचा तो चेंज मूड बघून अजयही हसू लागला नी ते पाहून सासूबाईही त्यांच्यात सामिल झाल्या...
सई विचार करत होती, माझे वेडं मन विनाकारण दुःखी झालं ..इथेतर माझी काळजी करणारे सगळेच आहेत...मी माहेरच्या आठवणी उरभर जपू शकेन.. जणू सासर माहेर एकच .. तिला मनात अतिशय समाधान दाटून आलं ...जणू वाटलं माझिया मना, तू आता निर्धास्त रहा, मी इथे खूश आहे..तू विनाकारण काळजी करू नकोस...बाबांची लाडकी परी तिच्या संसारात सुखी आहे....
Comments
Post a Comment