पृथ्वीचे प्रेमगीत-
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतिची याचना!
नव्हाळीतले ना ऊमाळे, उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझूनी आता यौवनाच्या मशाली
उरी राहीले काजळी कोपरे.
परी अंतरी प्रीतिची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती.
न जाणे न नेणे कुठे चालले मी
कळे तू पूढे आणि मी मागुती मी
दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्का-
फुले
परंतु तुझ्या मुर्तिवाचून देवा,
मला वाटले विश्व अंधारले.
तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचुनिया दिव्य तेजःकण
मला मोहावया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारूनी दारूण.
पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी याचना प्रीतीची लाजुनी लाल-
होऊनिया लाजरा मंगळ.
निराशेत संन्यस्त होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रूव
पिसाटापरी केस पिंजारूनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव.
परी भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तूझी दूरता त्याहूनी साहवे.
तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येती कधी अंग, तुझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर.
गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनिया गळा
तुझ्या लाल ओठातील आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हावा कळा.
अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धूलिकण
अलंकारण्याला परी पाय तुझे
धुळीचेच आहे मला भूषण.
-कविश्रेष्ठ कुसुमाग्रज
विशाखा काव्यसंग्रह
पृथ्वीचे प्रेमगीत- रसग्रहण
आपल्यापैकी बर्याच जणांना ही कविता आठवत असेल, कारण शाळेत असताना ही कविता तेंव्हा अभ्यासक्रमात होती.थोडीशी पार्श्वभूमी सांगते, ही कविता विशाखा काव्यसंग्रहातील आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या अत्यंत सुंदर निर्मिती पैकी "विशाखा" हे फार अप्रतिम ,सर्वांग सुंदर काव्य शिल्प आहे. अत्यंत तरल, कुठलाही शब्दजंजाळ किंवा शब्दबंबाळ न करण्याची त्यांची हातोटी केवळ लाजवाब. कुणीही याच्या प्रेमातच पडेल असे शब्दलावण्य. पु. ल. देशपांडे तर फार समर्पकरित्या बोलतांना म्हणतात, माझं जन्म नक्षत्र कोणतं हे मला आठवत नाही, परंतु कुसुमाग्रजांनी जेंव्हा साहित्य विश्वात " विशाखा" हे काव्यसंग्रह प्रकाशित केलं तेच माझं जन्म नक्षत्र.. "
पैकी यातील पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता फारच सुंदर व प्रेमाची अभिव्यक्ती करणारी एक प्रकारे याचनाच आहे. खरं तर पृथ्वी, सुर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र ही सगळी भूगोलातील मंडळी... यांची सुर्यमाला व त्यांचा एकमेकांभोवतीचा मार्गही अतूट व अखंडपणे चालणारा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या भौगोलिक घटनेचा फार सुंदर उपयोग कवीने केलाय. कवी या पृथ्वाला प्रेमिका व सुर्याला तिचा प्रियकर याचं रूप देतो. तसेच चंद्र पृथ्वीचा उपग्रह तो तिच्याच आसात फिरतो, त्याला तिचा प्रेमाची याचना करणारा प्रियकर तसेच शुक्र, मंगळ या ग्रहांनाही तीच भूमिका कवी देतो. कवितेच्या एकेक कडव्यात पृथ्वी सुर्याविषयी असलेल्या आपल्या पवित्र प्रेमाचे दाखले देत सुर्याला मनवतिये. पृथ्वी जात्याच सहनशील, सहिष्णु, प्रेमळ, पतीव्रतेसारखी एकाच पुरूषाचा आयुष्यभर विचार व सेवा करणारी, प्रसंगी जीव देईल परंतु प्रेमात समर्पीत असणारी असे तिचे वर्णन यातून व्यक्त होते. आणि ती कडवी वाचतांना ते पटतही जातं. युगामागुन युगं गेली पण सुर्य व पृथ्वीची भेट कधी झाली नाही कारण त्यांच्या कक्षा भिन्न आहेत. हा भौगोलिक स्थिती चा धागा पकडून कवी सांगतो की पृथ्वी अत्यंत आर्ततेने प्रियकराला विनवतिये की तू मला येवढी युगं तरसत ठेवलयस किती वंचना (अन्याय) केलायेस. तु़झ्यामागे धाऊन मी नजाणे कुठे नी किती अंतर कापलय. परंतु तू भेटत नाहीस.
Comments
Post a Comment