🌸🌷जय श्री राम🌸🌷


 🌸 मनुष्याचं दैवत - राम🌸


 या पृथ्वीवर येऊन मानवाला किती वर्षे झाली याचा थांग कदाचित विज्ञान लावेल पण सर्वसामान्यपणे करोडो किंवा अगणित वर्षे ़झाली असतिल जेंव्हा पहिला मानव अस्तित्वात आला. धार्मिक ग्रंथातही हा उहापोह आहेच. पण खरंच मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर त्याचे येथे येण्याचे प्रयोजन काय किंवा तो मुळात कोण आहे हे फार कमी जणांना उमगले. राम किंवा कृष्ण यांच्या अवताराचे मुख्य प्रयोजनच हे होते की माणसातील माणूस जागा करणे. त्याला त्याच्या माणुसपणाची, जबाबदारीची जाणिव करून देणे. रामाचं चरित्र घ्या. राम कायम सत्पथावरच चालला. धर्म, न्याय, निती, चारित्र्य, सत्य, जय या आणि अशा कितीतरी   आयामांचा त्यात विचार केलाय, ज्यात माणसाचं मनुष्यत्व उजळून दिसतं. माणसातील मनुष्यत्वाची ती शक्ती, त्याच्यातील ते तेज रामाने आपल्या धनुष्यबाणांनी सर्वांसमोर आणलं. रामाचा प्रवास किती खडतर, किती बिकट पण ध्येय किती अटळ, मन किती स्थिर. त्याने कुठलीच गोष्ट इतरांवर प्रभाव पडावा, मोठेपणा मिळावा म्हणून केली नाही. तो सदैव उच्च गुणांचा अधिपती होता. कर्म, न्याय,निती, अनुशासन या गोष्टींची सांगड घालून त्याने किती सुंदर राज्य चालवलं. तो कायम निस्वार्थ जगला. तेजस्वी जगला. माणसात देवाचाच अंश आहे हे सांगणारा तो कर्तुत्ववान राजा होता. 

     साध्या, सोज्वळ त्याच्या मुर्तीला पाहिलं की डोळे नकळत ओले होतात. खरंच जगावं तर रामासारखचं. असच तेजस्वी, सुंदर, शालीन. इतरांच्या ह्रदयाचा ठाव घेणारं. रामाचं साधं असुन गगनाला गवसणी घालणारं चरित्र पाहिलं की खरोखरच त्यापुढे लोटांगण घालावसं वाटतं. कुठल्याही व्यर्थ अहंकाराला तो आयुष्यभर शिवला नाही. विवेक, वैराग्याला कधी सोडलं नाही. एव्हडं असून वर उत्कृष्ट राज्य त्याने केलं. आपण भारतीय आजही रामराज्याचीच कल्पना मांडतो. एकाच आयुष्यात अनेक घाव सोसून आणि नंतर राज्य लाभूनही राम मात्र कमळासारखा निर्लेप राहिला. त्याच्या गुणांचं वर्णन गायला ब्रम्हाही थकेल पण ते गुणगान थांबणार नाही. 


     रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। 

रघुनाथाय नाथाय सिताया पतये नमः।। 



।।सियावर रामचंद्र की जय।।


✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न