"व्यक्तीमत्व "
✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी
आपण जेंव्हा जन्माला येतो तेंव्हा एक निरागस, आईवर पूर्णपणे अवलंबून असलेला एक सजीव , मांसाचा गोळा असतो. आसपासच्या जगाला आपल्या त्या अवस्थेचे विलक्षण कुतुहल असते.आपण कसे पहातो, कसे हसतो, कसे रडतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. खरंच तेंव्हा नामकरणही न झालेला तो जीव वेगवेगळ्या नावांनी पुकारला जातो. कोणाचा कान्हा, कोणाचा बबड्या, कोणाचा पिल्लू किती नी काय. सगळे आपलं कौतूक करण्यात, आपलं नाक कसंय, आपले डोळे कसे आहेत हे एकमेकांना सांगण्यात मश्गुल असतात. आपण मात्र या सगळ्या गोष्टींपासून पूर्णतः अनभिज्ञ असतो. तेंव्हा आपल्या डोक्यात विचारही नसतात. मग विचारांचे ओझे ही दूरची गोष्ट. आपण अगदी मुक्तपणे हातपाय हलवत पहुडलेलो असतो. कधी आईची मांडी, कधी बाबांचा खांदा, कधी ताई दादांची मस्ती असे करत करत आपण मोठे होतो. मग हळूहळू हे आसपासचं जग आपल्याला शिकवायला लागतं. जेथे आई बाबांशिवाय जग माहिती नव्हतं तेथे नातेवाईक, मित्र कंपनी यांनी नव्या जगाशी ओळख होते. मग त्यांच्या सहवासात येऊन आपण आपल्या बुद्धीनुसार, आकलनशक्तीनुसार नविन नविन गोष्टी शिकत रहातो.
जगाच्या बहुरंगी पसार्यात आपण स्वतः ची वेगळी ओळख जपून असतो. कळत नकळत आपण स्वतः ला व त्याबरोबर जगालाही समजू लागतो. ही प्रोसेस प्रत्येक जण अनुभवतो. मानवी मन, बुद्धी, स्वभाव प्रत्येकाचे भिन्न भिन्न स्वरूपाचे असतात, पण त्यांचे कार्य सगळ्यांमध्ये सारखेच. मन विचार करते, बुद्धी विचारांवर अंकुश ठेवण्याचे कार्य करते, स्वभाव हा चिवट असतो, तो प्रत्येकात वेगळा नी समजायला बर्याचदा कठिण असतो. ही व्यक्तीमत्वाची महत्वाची अंगं आहेत. ती प्रत्येक व्यक्ती घडण्याची खरी प्रयोगशाळा आहे. माणुस वरून वरून चांगला वाटला तरी आतुन तसा असेल असं सांगता येत नाही. हीच खरी गम्मत आहे. मनुष्याचे गुणावगूण त्याने अनुभवलेल्या, शिकलेल्या, आत्मसात केलेल्या गोष्टींवरही बर्याचदा अवलंबून असतात. व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व हे त्याच्या दिसण्यापेक्षा असण्यावर जास्त अवलंबून असते. उदाहरणच द्यायचं झालं तर माझी मैत्रीण शुभा बोलायला गोड आहे, पण स्वभाव मात्र कठोर आहे किंवा माझ्या शिक्षीका स्वभावाने खूप छान आहेत पण दिसायला तितक्याशा छान नाहीत. बघा म्हणजे आपण जेंव्हा व्यक्तीला ओळखायला लागतो तेंव्हा कधीकधी अंतर्बाह्य ओळखू शकतो तर कधी समजणे अवघड जाते. याचं कारण, आपली जडणघडण ही मानसिक, बौद्धिक तसेच शारिरीक पातळीवर भिन्न भिन्न असते. समाजात एखादे व्यक्तिमत्त्व खूप प्रभावशाली असते याचे मुख्य कारण ती व्यक्ती स्वतःचे उत्तम समायोजन करून जगू शकते. तीचे कलागुण, तीची समाजातील अभिव्यक्ती, स्वभाव, कार्यकुशलता, हे गुण प्रकर्षाने सामोरे येतात. तीचे दिसणे जास्त महत्वाचे कधिच नसते कारण व्यक्तीमत्व हे व्यक्तीच्या अंतरंगावर जास्त अवलंबून असते. बहिरंग हे तात्पूरता प्रभाव टाकते.
व्यक्तीमत्व सुंदर म्हणजे अंतरंग सुंदर, व्यक्ती आतुनबाहेरून सुंदर म्हणजे बर्याचदा दैवी देणगी लाभलेला पुरूष किंवा स्त्री. हे निसर्गतः च असते की आपण दिसायला कसे असू, परंतू व्यक्तीच्या जीवनपटात व्यक्ती जर चांगली कर्म करत गेला तर तो दिसायलाही सुंदर होत जातो. फक्त दृष्टी हवी. नुसतं दिसणे हा व्यक्तीमत्व सुंदर असण्याचा निकष असू शकत नाही. त्यासाठी आपल्याला आत काम करावं लागेल. आपलं बोलणं, चालणं, वागणं, विचार करणं, समाजात वावरणं, इत्यादी गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. यासाठी मनाची मशागत, बौद्धिक विकास, कृतिशील वृत्ती हे सगळं खूप महत्त्वाचे आहे. यासोबतच सामाजिक वातावरणही खूप महत्त्वाचे आहे. यातुनच एक सुजाण, परिपक्व, परिपूर्ण व्यक्ती घडते. अशा व्यक्तीची कुटुंबालाच नव्हे तर देशालाही आवश्यकता असते.
Comments
Post a Comment