कविता क्रमांक २- कोलंबसाचे गर्वगीत


हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या

समुद्रा, डळमळू दे तारे! 

विराट वादळ हेलकावुदे पर्वत पाण्याचे

ढळूदे दिशाकोन सारे! 


ताम्रसुरा प्राशून मातुदे दैत्य नभामधले

दडूद्या पाताळी सविता

आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला

कराया पाजळुदे पलिता! 


की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान

मिळाला प्रमत्त सैतान

जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती

करी हे तांडव थैमान! 


पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे

फुटूदे नभ माथ्यावरती

आणि तुटूदे अखंड उल्का वर्षावात अग्नी

नाविका ना कुठली भीती! 


सहकार्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा

झुंजण्या अखंड संग्राम

नक्षत्रापरी असीम नीलामध्ये संचरावे

दिशांचे आम्हाला धाम! 


काय सागरी तारू लोटले परताया मागे

असे का हा आपुला बाणा

त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी

जपावे पराभूत प्राणा! 


कोट्यवधी जगतात जिवाणू जगती अन् मरती

जशी ती गवताची पाती, 

नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली 

निर्मितो नव क्षितिजे पुढती! 


मार्ग आमुचा रोधू शकती ना धन, ना दारा

घराची वा वितभर कारा

मानवतेचे निशाण मिरवू महासागरात

जिंकुनी खंड खंड सारा! 


चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती

कथा या खुळ्या सागराला

"अनंत अमुचा ध्येयासक्ती अनंत अन् आशा

किनारा तुला पामराला! "

 ही कुसुमाग्रजांची  कविता. त्याच काव्यसंग्रहातील आहे. आणि ही सुद्धा शालेय अभ्यासक्रमात होऊन गेलेली कविता. कोरोनाच्या ह्या गंभीर परिस्थितीला तोंड देणारे आपण आज त्या कोलंबसासारखे ताठ मानेने व झुंजार होऊन ह्या कोरोनाला टक्कर देऊ. कोलंबसाला समुद्राच्या रौद्र लाटांचे आव्हान होते अन् आपण कोरोनाच्या लाटांना तोंड देतोय. परिस्थिती कितीही गंभीर असो मनाची ताकद, आत्मविश्वास, इच्छा शक्ती ह्या बळावर आपण आयुष्यातील कोणतीही लढाई लढू शकतो हे या गर्वगीतातून शिकण्यासारखं आहे. 

      कोलंबस हा तो खलाशी आहे ज्याने सर्वप्रथम अमेरिका खंड शोधून काढला. त्याच्या अथक परिश्रमामुळे ते शक्य झाले. कोलंबस प्रथम सागरालाच आव्हान देतोय की आमच्या प्रचंड इच्छाशक्तीपुढे तुझा हा लाटांचा तांडव फिका आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे फिरणार नाही. हा अजेय वीर समुद्राला नामोहरम करण्याच्या उद्देशाने कठोर शब्दांत त्याची अवहेलना करतोय. जणू जीवनात एखाद्या मनुष्याला असाध्य रोग झाला तरी तो हिमतीने त्याला तोंड देतो तसे हे कोलंबसाच्या तोंडी आलेले शब्द जणू एखादा अंगार बरसावा तसे बरसतात. 

कोलंबस या गीतात इतर खलाशांना चेतना देतोय की भलेही हे सागराचे रौद्र रूप अवघड असेल परंतु खलाशाचा धर्म कोणता. पळपुटेपणाने मागे फिरणे नक्कीच नाही. समोर पर्वतासारख्या लाटा जरी आल्या तरी तुम्ही महापर्वत होऊन स्थिरच रहा. 

संपूर्ण कविता रौद्र रसाने ओतप्रोत भरलेली आहे. कवी सांगतो आपण मानव

शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं सारे दिशाकोन म्हणजेच दाहीदिशांना नमवायचं. त्यांच्याही पुढे आपलं धाम (घर) आहे. आम्ही या इच्छा शक्तीच्या जोरावर आख्खी पृथ्वी धुंडाळू, सातही खंड पादाक्रांत करू. त्यासाठी आम्हाला धन, बायको, घरचे लोकही अडवू शकत नाही. जगात कितीतरी लोक जन्मतात व मृत्युमुखी पडतातपण आम्ही मात्र वनक्षितीजे बनवू व काळाच्या पडद्यावर स्वतः चे नाव कोरू. 

  शेवटी तर कवी  कवितेचा कळस गाठतांना म्हणतो, अनंत आमुची ध्येयासक्ती म्हणजेच आमची ध्येयावरील श्रद्धा अखंड टिकणारी असून, आमची आशा चिरकाल टिकणारी आहे,त्याला मर्यादा नाही, परंतू हे समुद्रा,तुला मात्र या किनाऱ्याची मर्यादा आहे. तू काही त्याच्याबाहेर येऊ शकत नाहीस.... किनारा तुला पामराला... 



धन्यवाद🙏🏻

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न