गीताजयंती
✍🏻 सौ.स्वरूपा कुलकर्णी
आपल्या भारतीय ग्रंथांमध्ये अनेक गीता आहेत.जसे रामगीता, लक्ष्मण गीता,गणेशगीता,उद्धवगीता वगैरे.परंतु या सर्वांत सर्वाधिक लोकप्रीय नाव आहे ते म्हणजे श्रीमद्भगवतगीता !! खरंच हे नाव इतके लोकप्रिय का?तर ही गीता प्रत्यक्ष भगवंताने रणांगणावर हतबल झालेल्या अर्जुनाला सांगितली म्हणून.आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांना निराशा येणे,हतबल होणे ही काही नविन गोष्ट नाही.त्यामुळे कुरूक्षेत्राच्या रणांगणात मोहग्रस्त,निराश अर्जुनाला पुन्हा लढायला उभं करणारा कृष्ण आपला खरा नायक बनतो.खरंच गीतेचा उपदेश केवळ एकट्या अर्जुनासाठी होता का?तर नाही.अर्जुन त्या प्रत्येक जीवाचं प्रतिनिधित्व करतो जो आयुष्यात चुका करतो,निराश होतो, माघार घेतो, रडतो,मोहग्रस्त होतो.जगणं जेंव्हा थांबल्यासारखं वाटतं तिथे गीतेतला कृष्ण परत कंबर कसुन कामाला लावतो.कृष्ण केवळ शाब्दिक डोस पुरवत नाही तर त्यात जीवनाचे मर्म सांगतो.हे मर्म जीवाला परब्रम्हापर्यंत घेऊन जाते.कृष्ण एकाच गीतात सगळं वेद वेदांत पटवतो,इतकंच नाही तर मनुष्याने कर्म कसे करावे व कसे करू नये हे सुत्रबद्धरित्या समजावतो.गीतेचा वक्ता अर्थात श्रीकृष्ण मानवी मनाची चंचलता हेरून अर्जुनाला मनावर विजय मिळवायला सांगतो.अचुक कर्मसिद्धांत सांगुन त्यास परत लढण्याची उमेद देतो.आता जीवन संपवावं असं वाटत असतांना कृष्ण ज्या उमेदीने अर्जुनाला उभं करतो ते सर्वात मोठं यश मानलं पाहिजे.कारण आता सर्व संपलं मानणारा अर्जुन कृष्णाच्या तेजस्वी शब्दांनी अंतरबाह्य पेटून उठतो ते परत कधिच न हारण्यासाठी.खर्या हरण्यात जेवढं नुकसान होतं त्यापेक्षा मनाने खचण्यात जास्त हानी होते.म्हणुनच गीतेतला कृष्णसखा अर्जुनाला,उत्तिष्ठत,जागृतप्राप्य वरान्नीबोधत। असे ठणकावून सांगतो.जणु त्याला आदेशच देतो.
जीवन जगण्याचे मोठे बळ कृष्णाची ही गीता आपल्याला देते.कृष्णगीता ही प्रेममाधुरी आहे.भक्तीचे,कर्माचे,ज्ञानाचे भंडार यात आहेत.कृष्ण कर्म मार्गाचे समर्थन करतो,परंतु त्याबरोबरच केले जाणारे प्रत्येक कर्म ईश्वरी अधिष्ठाण ठेवुनच केले पाहिजे हेही सांगतो. भक्ती ही परमेश्वराकडे जाण्याची नौका आहे हेही ठामपणे सांगतो.ज्ञानाला पवित्रतम मानणारी गीता समस्त जीवांना उद्धरण्याचा मार्ग सांगते.भक्ती व ज्ञान एकमेकांशी बांधलेले आहेत हेही गीताच आपल्याला सांगते.
आज गीताजयंतीच्या निमित्ताने परत एकदा त्या जिवलग सख्याला आळवुयात की हे भगवन्, आम्हाला गीता समजण्याचा अधिकारी बनव व ही जीवननौका पैलपार ने.आम्ही तुझे पाईक आहोत,आमचा उद्धार कर!!गीता अखेरपर्यंत आम्हाला मार्ग दाखवत राहो व आमचे अंतीम ध्येय मोक्ष आम्हाला प्राप्त होवो.
।।जय गीतामाता जय श्रीकृष्ण।।
Comments
Post a Comment