परिमळ... 



✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी




 आपण लहानपणापासून कितीतरी गंधांच्या सहवासातून मोठे होत असतो... जन्म होतो तेंव्हापासून ते मृत्युशय्येपर्यंत वेगवेगळे गंध आपलं जगणं व्यापून असतात.. तुम्ही कधी जन्मलेल्या बाळाला जवळ घेतलंय? त्या बाळाला ज्या दुपट्यात गुंडाळलेले असते त्याचा वास, तसेच त्या अख्ख्या खोलीचा वास मनात घर करून जातो... त्या वासाचा परिमळ मनभर पसरतो व काहींना खूप छान वाटतं तर काहींची नकारात्मक प्रतिक्रिया येते... त्या सव्वा महिन्यात बाळंतपणात घरात ओव्याच्या धुरीचा वास, शेक शेगडीचा वास मनाच्या आत खोलवर रूतून बसतो.. नंतर पूर्ण वर्षभर त्या बाळाचा वेगवेगळ्या तेलांच्या मालिशने, साबणांमुळे वेगळाच वास दरवळत रहातो.. मी माझ्या डिलिव्हरी नंतर हे सगळे वास खूप सहज स्विकारू शकले thanks to God ....याचं कारण काहीजणांना याचा त्रास होऊ शकतो... मी पहिल्यांदा ओवीला जन्म झाल्यावर पाहिलं तेंव्हा ती फार काही रडली नाही उलट टूकूटूकू सिस्टरकडे पहात होती.. तिचं दुपटं मी आजही सांभाळून ठेवलंय.. तीच्या सगळ्या कपड्यांना जो वास होता तो मनाला तिचा स्पर्श देऊन जायचा.. ती दुसऱ्या खोलीत गेली तरी माझ्या खोलीत ती आहे असा भास त्या गंधामुळे असायचा.. ते सु़क्ष्म वास, कधी उग्रही असायचे पण त्यात तीचा सहवास सुखावून टाकायचा... तीला जवळ घेतलं की तिच्या टाळूला लावलेल्या तेलाचा मस्त वास यायचा... ती त्यामुळे अजुनच हवीहवीशी वाटायची... 

         पुढे पुढे ते वास येणं बंद झालं , ती मोठी झाली...आर्याच्या डिलिव्हरीलाही तसेच अनुभव येत गेले... आता मनात जेंव्हा जेंव्हा त्यांच्या बाळ असतांनाच्या आठवणी येतात तेंव्हा आधी स्मरतो तो नाजूक परिमळ, त्यांच्या नाजूक अस्तित्वाचा, माझ्या नाजूकशा परिंचा...अलगद तो परिमळ माझ्या मनभर पसरतो नी त्या पुन्हा माझ्या कवेत येतात परत तेव्हड्याच छोट्या होऊन.... ओवी व आर्या जणू बागेत नुकतीच पहिली कळी उमलावी तशा भासतात आजही... हा सगळा जादूचा खेळ घडतो तो या गंधामुळे.. परिमळामुळे.... 


        मला भासलेले ते सुगंधी स्पर्श काळाचे अंतर कापून परत मला त्यांच्या खोलित घेऊन जातात...माझ्या आईच्या साडीने बांधलेली झोळी, कॉटनच्या सा़डीची दुपटी, सगळ सगळं आठवत जातं... परमेश्वराने दिलेल्या घ्राणेंद्रियाचा हा एक चमत्कारच म्हणूयात , कारण त्यात न सांगता येणारी खूप खूप गंमत आहे.. ते आई व बाळाचे न उलगडता येणारे क्षण या परिमळाच्या सहवासाने दृढ होत जातात.. ते सांगुनही समजणार नाही... ते गुपित आई व ते बाळच जाणोजाणे...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न