शाश्वत प्रेम
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
खरं तर प्रेम करायला कुठल्याही एका दिवसाची गरज नाही किंवा प्रेम काही एकच दिवस किंवा आठवडाभर करायची कवायत नाही ती तर जन्मजन्मांतरी अनुभवत रहाण्याची गोष्ट आहे..प्रेम समजायला आपण कधीपासून लागलो? तर आपली सर्वात जवळची प्रिय व्यक्ती म्हणजे आई,तिचे निष्पाप,निर्व्याज प्रेम,वात्सल्य तिचे तिच्या बाळाप्रती असणारे अतुट नातं , यासाठी एकच नव्हे अनेक जन्मही खर्च झाले तरी उतराई होणार नाही..दुसरं प्रेम करतो तो आपला पिता!वरून वरून कठोर पण आतुन पिकलेल्या रसाळ गर्यासारखा!बाबा म्हणजे लेकिचा सर्वात आवडता व लेकाचा सर्वात जवळचा मित्र!..तिसरी महत्वाची व्यक्ती बहिण किंवा भाऊ ..भांडून भांडून प्रेम करणारे असे जिवलग! सख्खी बहिण आणि प्रेमळ भाऊ..यांच्यासोबतची मजा दुसरं कोणासोबतच येणार नाही...एकमेकांसाठी जीव की प्राण असणारी तसेच वेळ पडली तर मनसोक्त भांडणारी ही मंडळी आंबट गोड लोणच्यासारखी...मैत्रीच्या जवळ जाणारी...यानंतर चौथं प्रेम करतात ती सगळी मित्रमंडळी...दिलखूलास व थट्टामस्करी करणारी...यांच्याशिवाय जगणं अधुरंच...पाचवी महत्वाची व्यक्ती म्हणजे आपला जीवनसाथी...नवरा किंवा बायको..यांचं प्रेम म्हणजे सप्तकातले सगळे सुर...कधी कधी सुरेल तर कधी कधी बेसूर... पण तरीही विलक्षण ओढ असलेले..एकमेकांच्या नकळत समर्पित झालेले...आठवणीने अश्रू ढाळणारे...पहिले पहिले कच्चे,मग हळूहळू पिकत जाणार्या फळासारखे...उतारवयात एकमेकांच्या पिकल्या,सुरकुतलेल्या हातांनी,भिजलेल्या डोळ्यांनी आयुष्याची संध्याकाळ अनुभवणारे... पक्व नात्यात रूपांतरीत झालेले असे सुमधूर प्रेमी..
प्रेम कळायला कधीकधी खूप वेळ लागतो तर कधीकधी एका क्षणात प्रेम कळतं अगदी झटकन विजेच्या क्षणभराच्या लखलखाटासारखं...सुंदर,चकीत करणारं..आयुष्याच्या तरूणकाळात मन मोरपीस होतं,कुणीतरी कृष्ण भेटतो तर कूठे राधा !..जणू जन्मजन्मांतरीचे साथी एकमेकांनाच शोधत होते...हे प्रेम गवसणार्यालाच गवसतं बाकीचे मात्र हात हलवत माघार घेतात,कारण त्यांना पहिलं प्रेम कळत नाही किंवा त्याची खरी ओळख पटत नाही...अर्थात ते गवसणं सगळ्यांसाठी सोप्प नाहीच ती तर एक विलक्षण गोष्ट आहे...नशिबवंतांनाच सापडणारी...सुंदर,निष्पाप,निरागस,स्वप्निल,अनाकलनिय,गुढ अशी...राधाकृष्ण हे युगूल त्याच चिरंतनतेचं प्रतिक...दोन शरीर एक आत्मा ...अद्वैत म्हणजे प्रेमच... परमेश्वर व माझ्यात वेगळेपणा नाही..आम्ही एकच...अध्यात्म यापेक्षा वेगळं काय शिकवतं?
लताचं एक सुंदर गाणं ,
ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता...
फार सुश्राव्य नी अंगावर रोमांच उभं करणारं...
प्रेम जेंव्हा वासनाहीन, दिव्य बनतं तेंव्हा ते शाश्वताला जाऊन भिडतं...अथांग आकाशासारखं..कृष्णाच्या मुरलीसारखं...स्वतः भोके सहन करूनही सुंदर सुरावट देणारं..आर्त ..अविनाशी.... शाश्वत चिरंतन टिकणारं...
Comments
Post a Comment