वटसावित्री-सख्याची
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
विसरू कसा मी तुझ्या पैंजणांना
जयांचा नाद होतो नित्य माझ्या घरी,
झंकारतो निशःब्द सोहळा मन्मथांचा,
कसा घेरू गे तुला बाहुंनी।
भरूनी हिरवा चुडा चांदण्यांचा,
नेसुनी भरजरी शालू अंगावरी
आलिस हळूवार मम जीवनी तू
दरवळला सुगंध केवड्याचा सखी।
किती आले अन् जातिल गे हे
ऋतु सप्तरंगी,इंद्रधनुष्यापरी
मी तुझा जाहलो नी माझीच तू गे
सहजस्पर्श होता तुझा मखमली।
नसे फिकीर तुला यौवनाची,
न उरले मला भान तव लाजण्याचे,
ऋतू प्रणयगंधी वेगळा तो
कोवळा सोहळा भावनांचा।
रवी चंद्र नक्षत्र चांदणे फिके गं
तव लोचनांची रक्तिमा लाजरी,
जवळी उभा मी तुझ्या सौदामिनी गे
बांधुनी चिरस्वप्ने तुझ्या संगती।
मला भासले हे हसणे तुझे गं
जणू कामबाण रतीचा हा खुळा
मम ह्रदयाची स्पंदने सांगती ही
तू बावरी माझी प्रेयसी चंचला।
असे थाट आपुला रमामाधवाचा,
असे साथ जन्मजन्मांतरीची जुनी,
सत्यवान मी माझी सावित्री तू गे,
मला भावली तू सखी स्वामिनी...
Comments
Post a Comment