कृष्ण
✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी
सगळ्या देवदेवतांमध्ये वेगळी छाप सोडणारा देव म्हणजे कृष्ण.. कन्हैय्या, गोपाळ, नंदनंदन... खरंच किती नावं नी किती रंगीबेरंगी आयुष्य लाभलेला हा देव... कृष्ण म्हणजे रंगवैभवी मोरपीस, कृष्ण म्हणजे घननीळ मेघश्याम, कृष्ण म्हणजे राधेचा श्वास, कृष्ण म्हणजे गोपाळांचा मेळा, कृष्ण म्हणजे यशोदेचा कान्हा... किती लिहावं नी किती वर्णावं त्याचं व्यक्तीत्व.. असा हा अवर्णनीय परमेश्वरी अवतार सर्व मानवजातीचा नव्हे तर सर्व प्राणीमात्रांचा लाडका देव आहे.. कृष्णाची रसमयी, निळी सावळी , नटखट मूर्ती बघणार्या प्रत्येकाला वेड लावते.. तो आहे सगळ्यांचा पण "नाही" सगळ्यांचा... त्याला सर्वात राहूनही कोणाचच नसण्याचा एक विलक्षण खेळ खेळता येतो.. आत्तापर्यंत माझा वाटलेला कान्हा बघता बघता माझा नाहीच मुळी अशा वेगळ्याच जगात नेतो.. म्हणजे मी त्याचा अनन्य भक्त म्हणवणारेही त्याला नीट समजू शकले नाहीत.. तसा तो सहज समजून येणारा देवच नाही... एकटी राधाच काय ते समजो जाणे त्याचं अफाट कर्तुत्व... तो निःसंशय अचाट, अफाट आहे.. ते कृष्णजाळ प्रत्येकजण समजू शकत नाही... तो बर्याचदा गुंतागुंतीचा वाटतो.. परंतु, ज्याने एकदा त्याला पूर्ण समर्पण केलं तो मात्र कायमसाठी त्याचाच झाला.. जणू राधाच झाला... कारण, राधा या शब्दाचा अर्थ होतो मोक्षासाठी तळमळणारा जीव.. जो कृष्णमय होतो तो राधाच बनलेला असतो..
कृष्णाचं मोरपीस, त्याचं कपाळीचं गोपीचंदन, त्याची बासरी, त्याची वनमाला, त्याचं पिवळं पितांबर ह्या सगळ्या कृष्णमय वस्तूतही राधा राधा हाच ध्वनी येतो... इतका तो भक्ताभिमानी, भक्तीसाठी तहानलेला, प्रेमाचा भूकेला, नेहमी कृपेचा वर्षाव करणारा गिरीधारी भक्ताचा सच्चा पाठिराखा आहे..
माझ्या मना लागो छंद गोविंद। नित्य गोविंद।।
अशा या कृष्णाचा जन्म प्रत्येकाच्या मनात व्हावा हीच आज गोकुळाष्टमी निमित्त वासुदेव कृष्णाच्या चरणी प्रार्थना 🙏🏻
जय श्री कृष्ण।।
Comments
Post a Comment