कोव्हिड १९ :एक वेगळा अनुभव


       ✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी



  हा अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्याचा उद्देश एव्हडाच की परिस्थिती कशिही येवो आपला कस पाहिला जात असतो, पण आपली सकारात्मकता या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढते. झालं असं की १० -१२ दिवसांपुर्वी मी, माझे मिस्टर व सासूबाई आम्ही घर आवरायला घेतलं. २ दिवसांत २ बेडरूम आम्ही आवरल्या व मिस्टरांनी स्वयंपाकघर आवरलं. नंतर संध्याकाळी मला कणकण वाटायला लागली म्हणून मी विक्स अॅक्शन ५०० ची १ गोळी घेतली पण त्यामुळे मला अशक्तपणा वाटू लागला.. मग दुसऱ्या दिवशी मिस्टरांनी पॅरासिटॅमॉल दिली ताप कमी जास्त होत होता.. नंतर मी संध्याकाळी डॉक्टरांकडे गेले, त्यांनी सर्दी तापेच्या गोळ्या दिल्या... मला एव्हाना अशक्तपणा जाणवतच होता... मनात शंका येत होत्या.. त्या रात्री सासूबाई पण तापल्या.. मग सकाळी त्यांना चेक केलं... ब्लड टेस्ट मध्ये सीपीआर जास्त होतं.. रॅपिड टेस्ट करायला सांगितली... रिझल्ट पॉझिटीव्ह.. मग मी व मिस्टरांनी पण टेस्ट करून घेतली मी पॉझिटीव्ह मिस्टर निगेटिव्ह... मनाची तशी तयारी झाली होती... पण माझ्या दोन्ही मुलींचा प्रश्न उभा राहिला... आर्या २ वर्षाची तर ओवी ५ वर्षाची... काळजीच काळजी... पण सद्गुरु पाठीशी असतात.. माझी नणंद खंबीरपणे उभी राहिली.. तिने आम्हाला नगरला बोलावून घेतले.. मग मी व सासूबाई नगरला कोव्हीड सेंटर वर अॅडमिट झालो.. बाकी सगळे नणंदेकडे राहिले... आम्ही जेंव्हा त्या सेंटरवर आलो तेंव्हा तिथल्या वातावरणामुळे थोडं रिलॅक्स झालो.. भरपूर झाडं,...आंबा, वड, उंबर, नारळ, अशोक अशा वातावरणात आपण पेशन्ट आहोत हा विचारही हळूहळू मावळला... खूप फ्रेश वातावरण त्यामुळे मूडही चांगला झाला.. दोन दिवसांतच माझी सगळ्या नर्सेस, इतर पे़शन्ट महिलांशी चांगली ओळख झाली.. कॉलेजवयीन मुलीही होत्या.. ते कोव्हिड सेंटर महिलांसाठी असल्याने आमचा वावर मूक्तपणे होऊ लागला.. दोन दिवसातच मला सिस्टरने योगासने व प्राणायाम घेण्यास सांगितले.. मला पुर्वी कधी योगासने शिकवण्याचा अनुभव नव्हता पण मी सहजपणे होकार दिला... माझा शाळेतला अनुभव कामी आला.. सगळ्यांना मी शिकवलेलं आवडलं व दररोज मला तुम्हीच योगासने घ्या अशी मागणी होउ लागली... माझं ऑक्सिजन लेव्हल, बीपी, ताप सगळं नॉर्मल असल्याने मी सहजपणे योगासने व प्राणायाम करू शकले व शिकवूही शकले... हा अनुभव खूप काही देऊन गेला... वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या त्या महिलांमध्ये सहकार्य भावना खूप चांगली होती... मुख्यतः डॉक्टर व नर्सेस काळजी घेणारे होते.. मी व सासूबाई (त्यांना बीपी व डायबिटिस) असुनही लवकर बर्या झालो..ही किमया निसर्गाची होती... तेंव्हा वाटलं झाडांनी, पशुपक्ष्यांनी, भरपूर सूर्यप्रकाशानी मानवाला दिलेलं हे दान कधिही न संपणारं व भरघोस आहे परंतु माणुस निसर्गाला ( व  स्वतः लाही) न समजून घेता निसर्गावरच घाला घालतोय... ऑक्सिजन साठी धावाधाव करणारा माणूस त्याच्या खर्या दोस्तांना विसरलाय... किती घेशील दो कराने असे दान देणारा निसर्ग असतांना आपण मात्र स्वार्थी विचार करत त्याच्यापासून दूर होतो... मग असे अनुभव देऊन तो आपल्याला लाखमोलाची शिकवण देतो... 

        आता घरी आल्यानंतरही तिथल्या आठवणी येत रहातात... बरं झालं निभावलो म्हणण्यापेक्षा खूप काही शिकलो असं म्हणावसं वाटतंय... 

चला अशा अनुभवातुन जागरूक होऊयात व झाडे, पशूपक्षी, माती , पाणी या सार्यांची जोपासना करूयात... हाच संदेश मनात रूंजी घालतोय...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न