सुर्य


सूर्य

✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी


     या समस्त चराचर विश्वात सूर्य ही सर्वात जूनी व अधिष्टात्री देवता आहे.जग कसं निर्माण झालं हे बघण्यासाठी ज्या निर्मात्याने आपल्या डोळ्यांनी या विश्वाकडे पाहिलं ते डोळे म्हणजे सूर्यदेवता.सूर्याचा जन्म प्रत्यक्ष परमात्म्याच्या गर्भात झाला आणि हे समस्त विश्व निर्माण झाले.सूर्य हे चराचर विश्व त्याच्या निर्मितीपासून बघत आलाय.म्हणजेच तो आपल्या सर्वांचाच पिता आहे.हा सर्वसाक्षी ईश्वर समस्त सृष्टीचे संचलन करतो.जगाचा व्यावहार,चलन वलन या सूर्यदेवामुळेच घडून येतं.थोडक्यात जगाचा मालक परमात्मा असेलही परंतू या जगावर जी परमात्म्याची दृष्टी लक्ष ठेवून आहे ती दृष्टी म्हणजेच सूर्यदेव!

      सूर्यवंश हा आर्यावर्तातील सर्वश्रेष्ठ वंश मानला जातो.भगवान श्रीरामचंद्रांनीही ह्या दिव्यकुळात जन्म घेतला.सूर्यनारायण ही भारतीयांची प्राचिन देवता आहे.आद्यशंकराचार्यांनी पंचदेवतांमध्ये सूर्यालाही स्थान दिले.याचे कारण सूर्य नसेल तर केवळ अंधाराचे साम्राज्य.आणि जेथे अंधार तेथे प्रकाश नाही.ज्ञान नाही.अज्ञान हेच अस्तित्व.म्हणूनच आपले पूर्वज सूर्याला आपली प्रमुख देवता मानून तिची पूजा करत आले.समर्थांनीही सुर्यनमस्काराचे महत्व आपल्या मनावर ठसवले.ते स्वतः ११०० सुर्यनमस्कार नित्यनियमाने घालत. सूर्यस्तवननिरूपणात समर्थ स्पष्टपणे सांगतात की सूर्याची थोरवी इतकी मोठी आहे की ती वर्णन करणे मनुष्याच्या आवाक्याबाहेरचे आहे.सूर्य ही भारतियांची प्रधान देवता असण्याचे कारण म्हणजे दिवस व रात्र यांचे संचलन सूर्याच्या अस्तित्वामुळे होते.सूर्य प्रकाश देतो म्हणून सजिव सृष्टी जगू शकते.मनुष्याला नुसती दृष्टी असून उपयोग नाही,त्यामागे सूर्यप्रकाशाचे महत्व अनन्यसाधारण आहे.प्रकाशाशिवाय नजरेसमोर फक्त अंधाराचेच  साम्राज्य असते.समुद्राचे पाणी वाफ होऊन पावसाच्या रूपात  जमिनीवर येते.त्यामुळे जलचक्र अव्याहत चालू आहे.या जलचक्रावरच समस्त सृष्टी आपले व्यावहार चालू ठेऊ शकते.जगाच्या या व्यावहारामुळेच सूर्याची थोरवी लक्षात येते.

             सूर्याचं एक नाव मित्रही आहे.खरंच तो या समस्त सजिव सृष्टीचा मित्रही आहे.त्याच्या निस्वार्थ व निर्व्याज प्रेमामुळे तो आपला मित्रही आहे.जगच्चालक असा हा सजिव प्राणिजगताचा साथी आहे म्हणूनच पृथ्वीवर जिवन शक्य आहे.

    म्हणूनच हा सूर्य मानव समाजासाठी प्रातःस्मरणीय आहे

आज रथसप्तमीनिमीत्त सूर्यस्मरण करूया🙏

   


ॐ आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर।

दिवाकर नमस्तुभ्यं आदिदेव नमोस्तुते।।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न