एक वेगळा दिवस

 ह्या विषयावर खूप विचार केला नी मनातल्या बंद कुपितून एक मोरपीस बाहेर पडावं तशी एक सुंदर आठवण बाहेर पडली.म्हणलं तुम्हालाही हे मोरपीस द्यावं ..या माध्यमातून ते तुम्हाला सहजस्पर्श करून जाईल व क्षणभर आपणही तिथेच जाऊन आलो असा भास होईल...आठवण आहे माझ्या तरूण वयातली..मी B.sc.च्या पहिल्या वर्षाला होते तेंव्हाती..अचानक एक दिवस हैद्राबाद,तिरूपती असा दक्षिण भारतात फिरण्याचा योग आला.माझे (आईचे वडिल)आजोबा म्हणजे सतत फिरण्याची हौस असलेलं व्यक्तिमत्व...त्यांच्या हास्य क्लबने ही सहल आयोजित केली होती..नाही हो करता करता ५५ जणांची बस ठरली.माझी आजी व मावशी पण येणार होते..मलाही फिरण्याची हौस असल्यामुळे  ही सुवर्णसंधीच वाटली व घरूनही सहज परवानगी मिळाली...मग काय जय्यत तयारी झाली...सहलीचा पुरेपूर आनंद अनुभवत आमची सहल हैद्राबादमध्ये चारमिनार, नेहरू झुऑलोजिकल गार्डन,मुझियम,रामोजी फिल्म सिटी,बिर्ला टेंपल असे सगळे अनोखे,सुंदर,प्रशस्त स्थानं पहात होती.. पहातांना मंडळी जणू घरच विसरून गेली. या सगळ्या ठिकाणांबद्दलचे अनुभव लिहायचे झाले तर एक पुस्तक तयार होईल इतकी भारी ती सहल झाली..

        त्यानंतर आम्ही तिरूपतीच्या दिशेने कुच केला...तिरूमलाच्या डोंगरावर तिरूपती हे अत्यंत मोठे व भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे..ती रात्र कोजागिरीची रात्र असल्याने चंद्र आपल्या सर्व कलांनी धरतीवर शूभ्र चांदीसारखा प्रकाश पसरवून आकाशात स्थानापन्न झाला होता...आमची सर्व मंडळी दुसर्या दिवशीच्या बालाजीच्या दर्शनासाठी फार उत्सुक होती...सगळे खाली सतरंजी टाकून गोलाकार रिंगणात बसून गाणी,गप्पा,मसाले दूधाचे प्राशन करत आनंदात मश्गुल होते...मीही उद्या दर्शन कसे होणार ह्या विचारात एकीकडे गप्पात असून मनाने मात्र अतिशय उत्सुकतेने उद्याची वाट पहात होते...

     अखेर तो दिवस उजाडला..आम्ही "उत्तीष्ठनरशार्दुला कर्तव्यम् दैवम्हानिकम्"या पहाटे बालाजीला उठवणार्या पद्याने जागे झालो...एम .एस.सुब्बूलक्ष्मीचा तो आवाज ऐकल्यावर एका सुवर्णदिवसाची ती मंगल सुरूवात म्हणजे आमच्या भाग्याची सुवर्णमोहोरच होती.त्या मंगल भूपाळीनंतर आम्ही सर्व आवरून बसमध्ये बसलो.तिरूमला-तिरूपती देवस्थानमची ती बस आम्हाला बालाजी दर्शनासाठी वर नेणार होती.एकंदरीतच दक्षिण भारतातली मंदिरांची सुबत्ता,स्वच्छता,टापटीप सगळीकडे जाणवत होती..मदिरांच्या आसपासचा परिसरही कमालीचा स्वच्छ व निटनेटका...आमची बस अनेक वळणं घेत मंदिराजवळ पोहोचली..मंदिर भव्य ,विशाल व कळस सोन्याचा...अतिशय लांबून लांबून येणारे भाविक बालाजीच्या क्षणभराच्या दर्शनासाठी दिवस दिवस रांगा लावतात..इतकी भक्तप्रियता मिळवलेला हा अनोखा देव  भुतळीच्या वैकुंठभूमित चिरकाल वास्तव्यास आहे...ही शेषाद्रीगिरी भगवान विष्णू अर्थात तिरूपती(तिरू म्हणजे लक्ष्मी व तिचा पती म्हणजे बालाजी ) भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करतो असे मानतात...मी मुळातच भाविक वृत्तीची असल्याने दर्शरांगेत उभी राहून मनोमन बालाजीला तूझे दर्शन लवकर होऊदे म्हणून आळवत होते...त्या दर्शन रांगेत 'वेंकटरमणा गोविंदा' गोविंदा 'गोविंदा चा जयघोष चालला होता...आम्हीही आत्यंतिक प्रेमाने त्या घोषात आवाज मिसळून विलक्षण आनंद अनुभवत होतो...२ अडिच तासाच्या त्या प्रतिक्षेत मंदिराचा बराचसा भाग जवळून पहाता आला..मुख्य मंदिराच्या आवारात नोटा,नाणी विलगिकरण स्थानं आहेत,तिही काचेच्या पडद्यात जी बाहेरूनही सहज बघता येतात..केव्हडी सुबत्ता..जणू लक्ष्मीचा वरदहस्तच...मंदिराचा कळस सोन्याचा...मंदिरातही बर्याच गोष्टी सोन्याने मढवलेल्या...तिथला तो काही मिनीटांचा अनुभव थक्क थक्क करणारा...दर्शनात ताटकळणार्यांची सर्व खाण्यापिण्याची सोय मंदिर व्यावस्थापकांनी अतिउत्क्रूष्ट पद्धतिने सांभाळलिये..अखेर तो क्षण जवळ आला मंदिराच्या अनेक बाजू पाहून अखेर दर्शन रांग बालाजीच्या समोर आली...तो एक क्षण..नि सगळे परिश्रम सार्थकी लागले..अनेक रत्न,हिरे,माणिक यांनी तसेच सोन्याने मढवलेली ती दिव्य मुर्ती पाहून 'याचीदेही याची डोळा' असा थक्क करणारा देवाचा तो सगुण मूर्तीचा देखावा मन तृप्त करून गेला...गोविंदा गोविंदा...बालाजीला मंद प्रकाशात ठेवलेले असले तरी त्या हिरे माणकांनी जो प्रकाश परावर्तीत होतो त्यामुळे सगळा गाभाराच सोनेरी भासतो..चंदनाचा परिमळ साठलेला ,विष्णुप्रीय तुळसमंजिरीच्या माळा अहाहा...अतिशय सुंदर नयनरम्य सोहळा...पुढचे कितीतरी दिवस मी त्या क्षणातच जगले...मी खरोखर भाग्यवान, ज्याचे दर्शन मिळने हे  सौभाग्याचे लक्षण,ते मोक्षपुरी वैकुंठधामच साक्षात अनुभवले..

      सख्यांनो तो दर्शनसोहळा म्हणजे अनेक जन्मीच्या पुण्याची उतराई..भगवान विष्णुंचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा मी अनुभव घेतला...देवाचिया द्वारी उभा क्षणभरी असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतेच...तीच अनुभूती म्हणजे ते बालाजी दर्शन..त्या दिवसाला ज्ञानेश्वरांची ती ओवीच साजेशी..आजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु ,आजी सोनियाचा दिनु'....

  असा हा 'एक वेगळा नव्हे नव्हे आगळा वेगळा दिवस'अनुभवण्याचे भाग्य लाभले..मी धन्य झाले!!

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न