स्त्रीचा जन्म हा कधी साधासुधा नसतोच!कारण ती जन्मतःच सहनशील, संवेदनशील,पुरूषाच्या तुलनेत नाजूक,सुंदर म्हणूनच जन्माला येते.ती निसर्गतःच फुलासारखी कोमल असते.मनाने समजुतदार अशी ती घरातही भावंडांना आधार असते.तिचा घरभर वावर म्हणजे जणू चैतन्याचा अनुभव असतो.किती किती स्वप्न उराशी बाळगुन ती शिक्षण घेते.पण बर्याचदा लग्न करायचं म्हणून शिक्षण थांबवलं जातं किंवा तिला मनासारखं शिकता येत नाही.लग्न या गोष्टीसाठी करिअरला तिलांजली द्यावी लागते.ती घरातली परिस्थिती पाहून स्वतःची स्वप्न गुंडाळून ठेवते.लहान भावंडांसाठी ती स्वतःच्या आकांक्षांना मागेच ठेवते.तिचं ह्रदय शेवटी मातेचच ती लग्नाच्या आधी व एका पुरूषाची बायको झाल्यानंतरही स्वतःच्या  मनाला मूरड घालून संसार करत रहाते.मुलबाळ झाल्यावर एक आई म्हणून अनेक बाबतीत त्याग,समर्पण करतच रहाते.आता तर काय समाजही तिच्याकडून गृहकर्तव्यदक्ष असण्याची अपेक्षा ठेवून असतो.भलेही त्यात तिच्या स्वातंत्र्यावर,मोकळेपणावर बंधन येतात तरी ती सुखी संसाराची स्वप्ने रेखत जाते.खरंच काय मिळवते ती स्वतःची स्वप्न मारून?दुसर्यासाठी प्रत्येक पावलावर मरण?का असं?तिला स्वतःचं म्हणून अस्तित्वच नाहीये का?ती एक शरीर व  मन असलेली  माणूसच आहे ना?तिच्या भावना तिचे विश्व याला समाज कधी समजुन घेणार?तीला जगायला एक पुरूषासारखंच स्वातंत्र्य समाज केंव्हा देणार?ती स्वार्थी नाही पण म्हणून तीच्या मुक्ततेवर गदा येणं याला काय म्हणावं?

                  समाज जोपर्यंत तीला एक व्यक्ती म्हणून स्विकारत नाही तोपर्यंत तीची फरपट होतच रहाणार...तरीही जमेची बाजू ही की काल पेक्षा आजचा समाज स्त्रीकडे वेगळ्या द्रृष्टीने बघायला लागलाय.म्हणजे केवळ एक उपभोगाची किंवा दुर्लक्षित घटक न रहाता तिची बौद्धिक उंची,तिची सहनशिलता,तिचे मात्रृत्व,तिचीविविध क्षेत्रात पुरूषांना आव्हानं देणारी प्रतिमा आता जवळजवळ सर्वच क्षेत्रात समाजाला पहायला मिळत आहे.ती एक स्त्री म्हणजे परावलंबी,पुरूषाची दासी न रहाता आजचा समाज तिला समजून घेतो आहे.हे सगळं घडतंय ते केवळ तिच्यातल्या शक्तीस्वरूपामुळेच...ती दुर्गा ,ती रणचंडिका तीच सीता,तीच सावित्री,तिच झाशीची राणी,तिचं जिजीऊ...इतिहास तिला ओळखून आहेच व आता भविष्यही तिलाच घडवायचंय,कारण मनुष्य समाज तिच्याशिवाय अपूर्ण आहे.ती नसेल तर कोणताही जीव जन्माला येऊ शकत नाही,कोणतेही सुंदर स्वप्न तिच्याशिवाय पाहिले जाऊ शकत नाही.ती म्हणजे या सृष्टीचे सौंदर्य,या सृष्टीचे मांगल्य ती माता,बहिण,मुलगी,सुन,सासू खरंच ती म्हणजे आनंदाचा स्त्रोत!!सृजनाची ती स्वामिनी..पुरूषाची गृहस्वामिनी...घराघरातील समईतील वातीसारखी शांतपणे स्वतः जळून प्रकाश देणारी दिपीका ती..खरंच ती वंशाची दिप च नव्हे तर इतर वंशांचे भाग्य उजळवणारी दिपावली आहे..ती लक्ष्मी बनुन सौख्य घरात आणते..ती शिवशंकराची शक्ती स्वरूपा आहे..नवचैतन्य व शक्तिचा अवतार आहे.तिला विसरून या जगातला कुठलाच सोहळा परिपूर्ण नाही.ती आदिमाया,आदिशक्ती..तिचा परिचय हा तिच्या कर्तुत्वातून आहे,वात्सल्यातुन आहे..तिला पुरूष जेंव्हा खर्या अर्थाने समजून घेईल तेंव्हाच सर्व समाज उज्वल भविष्याकडे वाटचाल करू लागेल.

ती सक्षम आहे तोपर्यंत ही खडतर वाट चालायला...तीच आहे उद्याचा भविष्यकाळ...मानव्याचे पूर्णत्व!!

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न