प्रेम....
ईश्वराचं दुसरं नाव...राधेचं कृष्णावर, तुलसीचं रामावर, संतांचं पांडूरंगावर...प्रेम हे एक शाश्वत चिरंतन सत्य....अखिल विश्वाला एकसंध ठेवणारं तत्व...प्रेमाची व्याख्याच करायची झाली तर जिथं तुझं ते तुझंच आणि माझं तेही तुझचं...गम्मत ना प्रेमाच्या व्याख्येत मी गळून जातो फक्त तू रहातो... म्हणजेच समोरचा महत्त्वाचा...माझ्यापेक्षाही..हा प्रेमाचा निस्सिम, निसंदेह असलेला आविष्कार सार्या विश्वाचाच हुंकार आहे... विश्व हा मायेचा अर्थात परमेश्वराच्या शक्तीचाच एक भाग आहे...नीट विचार केला तर लक्षात येईल की या जगात कोण कोण एकमेकांवर प्रेम करतं... कुसुमाग्रजांच्या पृथ्वीचे प्रेमगीत वाचलं तर लक्षात येईल ही आपल्या सार्यांची लाडकी वसुधा सुर्यावर निस्सिम प्रेम करते, अहो म्हणूनच तर दिवस रात्र त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत असते...जणू प्रेमाच्या आणाभाका घेत स्वतःही उन्हाळे पावसाळे अनुभवत बहरत जाते नी त्या तेजस्वी रवीभास्कराची मनधरणी करत रहाते... चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह तोही या वसुंधरेच्या प्रेमात पडून तीची मनधरणी करतोय...पण आपली वसुधा मात्र सुर्याचेच प्रेमगीत गातेय युगानुयुगे...
प्रेमावतार म्हणवला गेलेला श्री कृष्ण म्हणजे जणू प्रेमाच्या अनेक रूपांना आपल्या अवतारातुन जन्माला घालतो...यशोदेचं वात्सल्य, गोपींची भक्ती, राधेचा श्वास, गोपांची मैत्री, अर्जुनाचं सख्यत्व, द्रौपदीचा कृष्ण, अखिल विश्वाचा बंधू.. श्रीकृष्ण... परमस्नेही कृष्ण
प्रेम हाच जगाचा सारांश जो कधी मिटत नाही मिटवला जाऊ शकत नाही...प्रेमासाठीच प्राणी जन्माला येतो आणि मरण पावतो...चराचर सृष्टि हे प्रेमाचेच प्रतिबिंबित रूप आहे...जणू ईश्वराचा आभास नव्हे त्याचेच स्वरूप...प्रेमाची व्याप्ती ही शब्दातीत, काळातीत आहे...आईचं बाळावर, पतीचं पत्नीवर, प्रेयसीच प्रियकरावर,आजोबांचं नातवंडांवर, भावाचं बहिणीवर,सैनिकाचं देशावर, भक्ताचं ईश्वरावर असलेलं निरलस प्रेम अशी त्याची मोठी व्याप्ती..
निसर्गतःच असलेली ही प्रेमाची ओढ कधी माणसाची माणसावर तर कधी या चरीचरातील सजीव सृष्टीवर...निसर्गतःच मानवाला लाभलेली सहसंवेदना, नाजूक भावना त्याला निराळं सौंदर्य प्रदान करतात...खरतरं मानवाची उत्पत्तिच मुळात ईश्वराने प्रेमासाठीच केली असावी...कारण निसर्गाने जन्मतःच मानवाला मन,बुद्धी,देह,शक्ति,सौंदर्य,कला,सद्गुण दिले आहेत...नीट विचार केला तर लक्षात येईल की हे सारे कशासाठी तर स्वतःचा शोध घेण्यासाठी...मी कोण ?हा तो शोध... प्रेमाचे आगार असणार्या त्या परमचेतनेचा आपण एक अंश आहोत हा तो खरा शोध....तो शोध एकदा लागला की मनुष्य अंतरबाह्य फुलून जातो नी नव्या प्रेरणेने स्फुर्तीदात्या ईश्वराला धन्यवाद देतो...तो प्रार्थना करतो, 'हे परमदयाळू ईश्वरा, मी तुझे तान्हे लेकरू...मला पोटाशी घे नी माझा उद्धार कर, मला मक्ती दे' ....
भावावीन देव भुकेला म्हणूनच हे मानवा तू तुझ्या मुळ रूपाचा कधिही विसर पडू देऊ नकोस तू त्याच परमस्नेहाळू परमेशाचाच पुत्र आहेस...सदैव याची जाण ठेव नी प्रेम करत रहा..स्वतःवर, ईतरांवर नी भगवंतावर...शुभास्ते पन्थानःसन्तु...हे मानवा तुझ्या प्रवासाला शुभेच्छा...
- स्वरूपा
Comments
Post a Comment