माझी आठवण🇮🇳
प्रजासत्ताक दिन किंवा स्वतंत्रता दिन असो मनात आठवण ताजी होते ती हटकून शाळेतल्या दिवसांची. आपली शाळा, त्याचा मनात असलेला अभिमान, ती शिस्त, शिक्षकांबद्दलची रास्त भिती व तितकाच आदर, प्रभातफेरीची केलेली तयारी, डम्ब बेल्स, लेझीम, कवायत याची केलेली कस्सून तयारी सारच भरभर डोळ्यासमोर आलं. मन परत तेथेच रूंजी घालू लागलं. शाळेतल्या दिवसांची मजा खरंच काही औरच होती हे प्रकर्षाने जाणवतं. पहाटेची थंडी, कडक ईस्त्रीतील युनिफॉर्म, स्वच्छ धुतलेले सॉक्स, बूट, रिबिनने कच्च आवळलेल्या वेण्या, खरंच तो अनुभवच वेगळा. ती नशाच वेगळी.
देशासाठी बलिदान केलेल्या महात्म्यांची नावे ऐकून, त्यादिवशीच्या राष्ट्रगीताला उठलेला काटा आजही आठवतो. मनात निर्माण होणारे चैतन्य, स्फुर्ती हे त्या दिवसाचे महात्म्य. तो सुट्टीचा दिवस असे न बघता राष्ट्रप्रेम जागराचा दिवस आहे ही भावना टवटवीत होती. त्या दिवशी प्रमुख पाहुण्याकडून ज्यांना बक्षिस मिळायचे त्यांचा रूबाब काही और असायचा. सगळ्यांमध्ये चर्चा व्हायची. तेंव्हा पाय दुखेपर्यंत केलेली कवायत नेहमीच लक्षात राहील. कार्यक्रमाच्या शेवटी मिळणारा बिस्किटांचा पुडा आजही गालावर हसू आणतो.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. 🙏🏻🇮🇳
✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी
Comments
Post a Comment