प्रोजेक्टची ऐशीतैशी...
✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी
माझं सगळं शिक्षण औरंगाबादला झालं.. मी माझं B. Sc., S. B. College मध्ये केलं...S.B.अर्थात सरस्वती भूवन महाविद्यालय... औरंगाबादमधिल नावाजलेलं कॉलेज नी संस्थाही.. मी थर्ड ईयरला असतांना आम्हाला कम्प्युटर या विषयात प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन याचं जाम टेन्शन असायचं... ओरॅकलमध्ये किंवा कुठल्याही डेटाबेसमध्ये प्रोजेक्ट बनवायचा.. त्यात व्हिज्युअल बेसिक्स ची मदत घ्यायची... प्रोजेक्ट खूप अवघड असायचे... माझा कम्प्युटर हा विषय मनापासून आवडता होता... मार्क्स पण चांगले असायचे.. तेंव्हा मी शिक्षकांची लाडकी विद्यार्थीनी होते... प्रेझेंटेशन तर मी अनेकवेळा दिले होते, ते पण सक्सेसफुली डन!!
वर्षभर मेहेनत केली... अभ्यासही मन लावून केला.. परिक्षा जवळ आली.. तसं तसं टेन्शन वाढू लागलं.. आमच्या प्रोजेक्ट चे सुपरव्हिजन चिटणीस सरांकडे होते... जाम भिती होती कारण चुकीला माफीच नव्हती... तो प्रोजेक्ट रन होणं फार फार महत्त्वाचं होतं.. प्रोजेक्ट नुसता असून उपयोग नव्हताच... जर ऐनवेळी कम्प्युटरने किंवा सिस्टीमने लोचा केला तर चिटणीस सर प्रॅक्टिकल मध्ये फेलही करू शकत होते..
मी हॅंगिंग मॅनचा प्रोजेक्ट करायला घेतला... त्यात दहशतवादी व्यक्तींना फाशीची शिक्षा कशी देतात ते २ मिनिटाचं व्हिज्युअल बेसिक्स मध्ये चित्र काढलं.. त्याचं प्रोग्रामिंग केले.. प्रोग्राम लिहिल्याशिवाय चित्र हलू शकत नसे... याचा डेटा बेस मी ओरॅकलमध्ये केला होता.. ओरॅकल ही खूप कठीण डेटाबेस सिस्टीम आहे.. प्रोग्राम रन करून बघेपर्यंत एक्झाम जवळ येऊन ठेपली... पण न जाणे का बरं शेवटच्या दिवशी प्रोजेक्ट रनच होत नव्हता...हॅंगिंग मॅन फक्त दिसत होता पण त्याच्या स्टार्टींग ते एन्ड पर्यंतच्या मुव्हमेंट काहीच होत नव्हत्या...मी हवालदिल झाले..मला घाम फुटला..काय करावे सुचेना...माझी अवस्था त्या हॅंगिंग मॅनसाऱखी होणार असं वाटायला लागलं..संकटकाळी आठवण होते मैत्रीणींची..मी फोन केले...त्या आधिपासूनच रिलॅक्स होत्या कारण त्यांचे प्रोजेक्ट रेडी होते...काही जणींना तर जाम कॉन्फिडन्स होता की येव्हड्या मुलांचे प्रोजेक्ट ऐनवेळी कोणी चेक करत बसणार नाही..आपण प्रोजेक्ट नसला तरी बिनधास्त परिक्षेला जायचं😄😄कॉलेज डेज खरंच विसरता येत नाहीत त्याचं कारण ही अतिआत्मविश्वासू मंडळी...मला या काय मदत करणार हा विचार करून संपूर्ण प्रोजेक्ट सीडीवर घेतला व एक्झामच्या दिवशी कॉलेजला गेले.. अगदी पोटात गोळा आलेला.. सगळ्यांच्या सिडीज एक एक करत रोल नंबरप्रमाणे गोळा झाल्या.. मी भितभितच सिडी दिली... त्यात प्रोजेक्ट होता पण तो न रन होणारा, म्हणजे असून नसून सारखाच... 😀परिक्षा हॉलमध्ये गेले.. ओरल झाली.. कशी झाली ते चिटणीस सर व देवालाच माहीत.. पण ते चेहर्यावरून बरे दिसले म्हणून थोडा जिवात जीव आला... ते सगळ्यांची कडक परिक्षा घेत होते... वेळ मिळाला की मुलांवर भरपूर तोंडसुखही घेत होते... प्रेझेंटेशन माझं चांगलच झालं... पण एव्हडं होऊनही मनात धाकधूक होतीच... मी पाहिलं खरंच शेवटच्या सेशनला प्रोजेक्ट होता तेंव्हा सीडीजचा खच होता.. प्रत्येक सिडी चेक करणं खरंच त्यांना मुश्किल होतं ...दोन सिडीज त्यांनी पाहिल्या असतिल नसतिल तर लाईट गेले...मी हुश्श केलं....मी व माझ्यासारखे अनेक वीर जाम खूश झाले, कारण आता सिडी चेक होणार नव्हत्या... माझा जीव भांड्यात पडला...
शेवटी रिझल्ट आला तेंव्हा कम्प्युटर प्रॅक्टिकल मध्ये ९० मार्कस होते... मी प्रेझेंटेशन मुळे वाचले नाहीतर सीडी पाहिली असती तर मी सरांचे खूप बोलणे खाल्ले असते... वर्षभर केलेली मेहनत वेळेवर मार खाते असं झालं असतं.. पण ते निभावलं होतं...
आताही ते सगळं आठवलं तरी आम्ही मैत्रीणी असे किस्से सांगून खूप हसतो... चिटणीस सर व S. B. कधिच विसरता येणार नाही हे अगदी खरं....
Comments
Post a Comment