वटसावित्री
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
रंगबावरी स्वप्ने पेलित आले सखया तुझ्या घरा..
मत्त बावरी,अल्लड मधुरा
विसरले माहेर पळभरात या..
स्वर्गच भासे जणू हे अंगण,
जिथे पेरला आनंद खरा ।
पदर सावरीत गेले सदा,
तुळसमंजिरी पुजाया...
किती रे सांगू गंध नवे मज स्पर्शूनी गेले लक्ष पहा,
जेंव्हा जेंव्हा मिठीत घेशी मोहरले क्षण दरवळले सदा..
सहवास तुझा लक्ष चांदण्यांचा,
दिप जणू अवकाशीचे।
घट्ट बिलगते सर्व चांदण्या,
मिटलेल्या माझ्या पापणीत ह्या..
किती आले अन् किती गेले ,
क्षण हळवे एकांताचे।
तुझा हसरा चेहरा दाखवी,
मम भाग्याचे दर्पण हे...
लाघवी लोभस हळवा मोहक किती गुंतले तुझ्यात रे,
नको खंड मज नित्य असू दे
प्रेम आपुले नित्य नवे....
शतजन्मीची ओळख आपुली
वटसावित्री पहाते आहे,
पैठणीचा रंग खूले बघ
तुझ्या स्पर्शाची अलवार मिठी...
रंगवैभवी,मत्तमयुरी चाल साजरी मधूर क्षणांची,
तुझी नि माझी सदैव राहू दे गाठ रेशमी ,
सप्तसुरांची...
हिरव्या चुड्याची सप्तपदीची, आठवण आहे तुझ्या साथीची।
मी अन् तू श्वास एकच
भाव मन्मनी गुंजत राही...
लाभो साथ जन्मोजन्मी,
रमामाधव ही आपुली जोडी..
जरा थांबू दे पळ हे देवा
क्षण प्रीतीची धूंद सुखाची...
Comments
Post a Comment