श्री उपासनी बाबा व कन्याकुमारी स्थान
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
माणसाच्या आयुष्यात जे अनुभव दुर्मिळ ,सुंदर,सुखद असतात त्यांना तो पुनःपुन्हा अनुभवण्यासाठी तरसत असतो.माझ्या आयुष्यात साकुरीचे उपासनी बाबा स्थान अशाच काही दुर्मिळ अनुभवांपैकी एक आहे.इथे पहिल्यांदा आलेला माणुस स्थानाच्या प्रेमातच पडतो .खरं सांगायचं तर यात काही विशेष नाही,कारण स्थानात दररोज पाळली जाणारी दिनचर्या,तिथे नेहमी होणारे यज्ञयाग,व्यावस्था,स्वच्छता व टापटीप खरोखरच अवर्णनीय.सद्गुरू उपासनी बाबा व सती गोदावरी माताजी या २ विभुती येथिल कार्याचे अध्वर्यु आहेत.या दोन महान दैवी विभुतीमत्वांनी केलेले कार्य खूप मोठे आहे.भारतभरच नव्हे तर जगभरही त्यांचे साधक पसरलेले आहेत.उपासनी बाबांनी कुमारीकांसाठी कन्याकुमारी स्थानाची निर्मिती केली.इथे कुमारिकांसाठी वेद वेदांतांची ओळख व्हावी म्हणून शिकवण्यास प्रारंभ केला.त्यासाठी पंडितांची व्यावस्था केली.या मुली बाबांनी व माताजींनी निवडून पारखून घेतलेल्या होत्या.त्यामुळे या ईश्वरधिष्ठीत मार्गावर त्या न घाबरता,न कंटाळता चालत राहील्या.जरी हा मार्ग कठोर नियमांचा असला तरी न डगमगता त्या कन्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पीत केले.भारतात अशी स्थाने खूप कमी असतील जिथे लहानपणापासुनच कुमारीकांनी आपले पूर्ण जीवन सद्गुरू सेवेसाठी समर्पित केले.
बाबांच्या या तपोभूमीमध्ये यज्ञाला विशेष महत्व दिले गेले आहे.वर्षभरात त्या त्या देवतांप्रित्यर्थ यज्ञ केला जातो.अत्यंत निष्ठापुर्वक हे कार्य दरवर्षी या कन्या व भक्तमंडळी करत असतात.आपली ऋषीमुनींची थोर व उज्ज्वल परंपरा येथे निष्ठेने चालू असलेली बघायला मिळते.येथे कर्म,भक्ती,ज्ञान यांचा त्रिवेणी संगम बघायला मिळतो.बाबा व माताजींची अमृतवचने हा या भीमकार्याचा कणाच आहेत.जागोजागी पावलोपावली अतिशय सुंदर,सजीव देवाधिकांचे साधुसंतांचे फोटो हा खरोखर बाबांनी जतन केलेला खजिनाच आहे.हे फोटो केवळ त्या देवतेची छबी नसुन भक्तीमार्गावर चालणार्या प्रत्येक आर्त,अर्थार्थी,जिज्ञासु,ज्ञानी या सार्या उपासकांसाठी अनमोल ठेवाआहे.ही चित्रे पाहणारा कोणीही स्वतःला भाग्यवानच समजेल इतकी ही चित्रे बोलकी,सुंदर आहेत. तसेच आईंची,बाबांची अमृततुल्य वचने वाचतांना मन सद्गतीत होते.ती वचने मनात अलगद सुवचनांची पेरणी करतात व आपण नेहमीच त्या विचारांना आठवत रहातो व तसे वागण्याचा प्रयत्न करतो.हा भक्तीमार्ग सुलभ व्हावा म्हणून या २ विभुतींनी जे परिश्रम घेतले आहेत ते स्थानाच्या कणाकणात जाणवतात.बाबा माताजींनी त्या काळी घालुन दिलेली दिनचर्या आजही तितक्याच तन्मयतेने राबवली जाते,हे खरे कन्यांचे यश आहे.आरती, स्तोत्र, मंत्र, पाठ ,नैवेद्य ,
विविध सणांचे व्यवस्थापन,सकाळ,दुपार,सायंकाळ चालणारी गुरू उपासना ही अव्याहतपणे चालू असलेली सत्कर्म ही या स्थानाची ओळख आहे.
मी पहिल्यांदा इथे आले ते २०१३ साली,पण खरं सांगु पहिल्यांदा आले असं वाटलच नाही.इथला नी आपला काहीतरी जुना अनुबंध आहे असे वाटले.मला माहेरच्या वाड्याची आठवण झाली.बाबांच्या झोपडीत गेल्यावर बाबांची ती मुद्रा चित्तवेधक भासली.त्यांच्या शेजारीच असलेल्या माताजी तर जणू महालक्ष्मीचच सात्विक रूप आहे अशा भासल्या.स्वर्गात देवदेवतांनी गर्दी करावी तशी भिंतीवरच्या फोटोतील देवदेवतांनी गर्दी केलेली जाणवत होती.जणू ते सारे या महान तेजस्वी महापुरूषाला व सती साध्वीला वंदन करण्यासाठीच जमले असावेत.किती नी काय भाव दाटून आले कसे सांगू?मन तर सद्गुरूला सहज शरण गेले.हीच या स्थानाची खासियत.येथे आलेला कोणीही सहजतेने भक्तीमार्गाकडे खेचला जातो व बाबा व माताजी त्याची पुर्ण जबाबदारी घेतात.पहिल्यांदा जेंव्हा मी आम्रवेलीचे दर्शन घेतले तेंव्हा 'मी माझी न राहिले' हे बाबांच्या दर्शनाने मला जाणवले.काय दिसलं,काय मिळवलं,काय गवसलं कश्शाकशाचेही भान तिथे मला राहिलं नाही. ही आम्रवेली जगावेगळे अत्यंत साधी तरी वैभवशाली गुरूमाहेरघर आहे.मी शब्दातही वर्णन करू शकत नाही इतकं हे स्थान अनुपमेय आहे.म्हणायला येथे बाबांची पादत्राणे,फोटो ,खुर्ची व आसन आहेत परंतु शेणाने सारवलेल्या या छोटेखाणी घराला वैकुंठ का म्हणू नये असे मला सतत वाटत राहिले.बाबा स्वयमेव तिथे वास करून आहेत हे प्रकर्षाने जाणवते.ती जागाच अवर्णनीय आहे. मी अनुभवलेल्या बाबांच्या या स्थानाला शब्दांनी न्याय देऊ शकणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं.ती जागा पुर्वी एक स्मशान होतं हे ऐकुन कोणी विश्वासच ठेऊ शकणार नाही.संतांच्या पदस्पर्शाने त्या स्मशानाचंही सोनं झाल्याचा अनुभव प्रत्येक अभ्यागत घेतो.या तपोभुमीला माझे कोटी कोटी वंदन जेथे शब्दातीत अनुभव मिळतो व मन क्षणात निर्गुण निराकार परमेश्वराला भिडते,शांत होते.स्थानातुन बाहेर पडतांना प्रसन्नपणे "जय सद्गुरू" म्हणत पुन्हा जीवनातील संघर्षाला तोंड द्यायला तयार होते.
।। जय सद्गुरू।।
Comments
Post a Comment