फुलला प्राजक्तं...
✍🏻सौ. स्वरूपा कुलकर्णी
पहाटेची थंड हवा, आकाशात सुर्योदयाची चाहूल, चंद्र-चांदण्याना निरोप देत सुरू झालेला पक्ष्यांचा किलबिलाट, स्वतःची कोटरं सोडून दानापाण्यासाठी उडणारे त्यांचे थवे... हवेतला गारवा उबदार भासत असतांनाच अचानक मंद सुगंध यावा नी आपली पावलं त्या दिशेने वळावीत... तोच परिचित सुवास... धूंद,मंद ,मनाला आल्हाद देणारा नाजूक दरवळ...अन् प्रतिक्षा संपते..समोरच दर्शन होतं त्या नित्य सुगंधी, नाजूक, सुकोमल, सात्विकतेचा परिसस्पर्श लाभलेल्या दैवी लेण्याचं.. अर्थात पारिजातक... प्राजक्त...
पुराणात कथा सांगतात,एकदा समुद्रमंथनात लक्ष्मी, कौस्तुभ,ऐरावत, चंद्र अशी एकामागून एक सुंदर रत्न बाहेर पडत असतांना जे अकरावं रत्न बाहेर पडलं ते होतं पारिजातक वृक्ष... त्यानंरची कथा सांगतात की सत्यभामेने एकदा हा वृक्ष बघितला नी कृष्णाजवळ हट्टच धरला, 'नाथ, मला हा वृक्ष हवाच' तिच्या हट्टापायी कृष्णाने प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध करून हा वृक्ष पृथ्वीवर आणला... आता तो लावला सत्यभामेच्या उद्यानात... इकडे खबर गेली रूक्मिणीच्या कानावर.. मग काय महाराणी रूसली...हे कळताच कृष्ण लगबगीने तिच्या महलात गेला... रूक्मिणी म्हणाली, 'मी नावाचीच पट्टराणी, तुमचं मात्र खरं प्रेम भामेवरंच', कृष्णच तो, तोही काही कमी चतुर नव्हता... तोही खट्याळपणे हसत, 'उद्या बघशीलंच गम्मत'.. इकडे रात्रीतुनच पारिजातक फुलला व सकाळी फुलं पडली रूक्मिणीच्या अंगणात... झालं राणीची कळी खुलली नी कृष्णाला हसू आलं... 😃..एका दगडात दोन पक्षी मारले म्हणून.. .
माझ्या माहेरी दारासमोरचा रस्ता ओलांडला की पारिजातक होता... त्याचा केशरी देहदंड, नाजूक पांढर्या पाकळ्या... त्या पाकळ्यांचीही सुंदर नाजूक ठेवण... पारिजातक जितकं नाजूक तेव्हडंच कोमल... त्याचा सुवास नशा आणत नाही तर सरळ देवघरात नेतो.. त्याला जन्मतःच सात्विकतेचं देणं आहे... रात्री फुलतो नी सूर्योदयापूर्वीच झाडावरून टपटप करत गळतो.. ते गळणं पहात रहाव वाटतं..त्याचा सडा पहाणं तर जणू नक्षत्राची चादर अंथरली की काय असा भास होतो. . पहाटेचे दवबिंदू त्याला लपेटतात नी तो गारठून जातो... इवढूस फूल अगदी नाजूकपणे हाताळावं लागतं.. सुर्य उगवायच्या आत फुलं जमा केली तर ती कोमेजत नाहीत.. वातावरण उष्ण झालं की ही फुलं कोमेजतात.. म्हणूनच पारिजातकाला इंग्रजीत night jasmine म्हणतात...त्यांचं आयुष्य किती लहान पण आपल्याला दान मात्र कैवल्याचं!! इतकं छोटंस आयुष्य पण जगण्याचा महामंत्र देउन जातं... तु फुलत रहा, उमलत रहा, जगाला सुगंध देत रहा!!
जीवन जगावं तर प्राजक्तासारखंं.... क्षणभंगुर जगात परमेश्वराने घडवलेल्या सौंदर्याची साक्ष पटवून देणारं..!!
Comments
Post a Comment